
गणेशोत्सव हा महाराष्ट्रात जितक्या आनंदात साजरा होतो तितकाच तो, देशाच्या इतर भागांतही धूमधडाक्यात साजरा होतो . कारणही तसेच आहे … सान -थोर , गरीब- श्रीमंत , जाती-धर्म , साम्य- भेद या पलीकडे जाऊन ज्या देवाशी मानवाने आत्यंतिक जवळीक साधली आहे , तोच हा शिव पार्वतीचा सुकुमार पुत्र !
कलेचा भोक्ता , बुध्दीदाता , वेळप्रसंगी उग्र रूप धारण करून दुष्टांचा संहार करणारा गजानन, खाण्यावर अतिशय प्रेम करणारा ! स्वतःच्याच हातातल्या मोदकांकडे आपल्या इवल्या डोळ्यांत हासू आणून पाहणारा आणि जे भक्तिभावाने त्याच्या पाहुणचारासाठी बनवाल, ते दिलखुलासपणे स्वीकारणारा ! हे माझे वर्णन वाचून गणपती हा देव आहे की माझा मित्र, असेही काही प्रश्न तुमच्या मनात उभे राहतील . होय , आहेच तो माझा मित्र ! जरी प्रत्यक्ष भेटत नसला तरी प्रत्येक आनंदाच्या क्षणी , कठीण समयी मनाशी हितगुज करण्यासाठी , माझे हक्काचे स्थान ! त्याच्याशी जोडल्या गेलेलया प्रत्येक कथेतून तो अवघ्या विश्वाला जगण्याचे सार सांगून जातो . जरी कर्मकांडाला माझा पाठिंबा नसला तरी ‘या कथा काल्पनिक आहेत , त्याला काही पुरावे नाहीत’, असा पवित्रा मांडणाऱ्यांपैकी सुद्धा मी नक्कीच नाही !

ऋषींनी दिलेला दैवी बुद्धिचातुर्याचा मोदक, दोघे भावंडे वाटून घेण्यास तयार नसल्यावर शिव – पार्वतीने एक शक्कल लढवली . जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा घालून लवकर परत येईल त्या बाळाला हा मोदक बक्षीस म्हणून मिळेल . बोलायचा अवकाश.. दादाराज कार्तिकेय बसले आपल्या लांब पिसारा असलेल्या मयूरावर अन उडत निघाले सुद्धा ! आपले जड शरीर आणि इवलासा मूषक घेऊन आता गणेश कसे काय कार्तिकेयाला टक्कर देणार , म्हणून पार्वतीने सुस्कारे टाकत महादेवांकडे पाहिले . भोळ्या सांबाने डोळ्यांनींच आपल्या शक्तीला धीर दिला . पळभर विचार करून या मूषकाधिपाने आपल्याभोवती आनंदाने गिरकी घेतली , आणि आपल्या आई वडिलांभोवतो प्रदक्षिणा घालायला सुरवात केली.

“माझे पूर्ण विश्व , माझे ब्रह्माण्ड हे माझे माता पिता आहेत” , असा गणपतीचा युक्तिवाद कैलासापासून पाताळलोक , इंद्रलोक सर्वांना चकित करून गेला . एके ठिकाणी हे बुद्धी चातुर्य , तर दुसरीकडे मिश्किल स्वभाव ! ब्रह्मदेवाने व्यासांना महाभारत लिहून काढण्यासाठी आग्रह केला . परंतु व्यासांच्या जिभेवरून एखाद्या प्रपातासारखी वाहणारी शब्दफुले कोणाची लेखणी सावरणार? विनायकाशिवाय कोण हो ! गणपतीने व्यासांनाही अट घातली की मी दोन्ही हातांनी लिहीन पण तुम्ही कुठे थांबलात तर माझी लेखणी थांबेल आणि मी तुमचा निरोप घेईन . गणपतीचे बुद्धीचातुर्य ओळखून , ‘आता महाभारत लिहून घेईन ते गणेशाकडूनच…’ , असा मनाशी चंग बांधून व्यासांनी देखील आपले म्हणणे समोर ठेवले , की “गणाधिपा तुम्ही वचन द्या, की माझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजल्याशिवाय तुम्ही ती लिहायची नाही .” म्हणजे एका तीरात दोन पक्षी … गणपती अर्थ समजून लिहीत राहिले नी व्यासमुनींच्या वाणीत खंड पडला नाही ! पाहिलेत ना.. दोन हुशार व्यक्ती एकमेकांना बोलण्यात अजिबात ऐकत नाहीत ! गंमतीचा भाग सोडला तर यात गणपती ची चिकाटी , सातत्य आपल्याला एक आदर्श देऊन जाते !
अशा अनेक कथा ज्यांनी आपल्या मनामनांवर संस्कार केले आहेत , वागण्याचे तंत्र नकळत शिकवले आहे . मग हा बाप्पा माझा मित्र म्हणून मी संबोधला , तर काय नवल !
मी आधी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर देशविदेशात सुद्धा साजरा होतो . तसेच ह्या बाप्पाचा आवडता मोदक सुद्धा आपल्याला निरनिराळ्या रूपांत पाहायला मिळतो . प्रदेशागणिक मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून पारंपरिक मोदकाचे गोड सारण बनवले जाते . आंध्रात या मोदकाला ‘कुडूमु’ , तामिळ भाषेत ‘कोलूकटई ‘तर कर्नाटकात ‘मोधक’ किंवा ‘कडबू ‘ म्हणतात .
आमच्याकडे गणेशचतुर्थीला न चुकता उकडीचे मोदक नैवेद्यात असतात तर विसर्जनाच्या दिवशी उकडीच्या मोदकांसोबत तळणीच्या मोदकांचा खाऊ सुद्धा गणपतीसाठी बनवला जातो . माझी आजी म्हणायची , ” गणपती बाळ आता आपल्या घरी जायला निघाला ना , तर वाटेत त्याला भूक लागली तर हा टिकाऊ मोदक हो बाप्पासोबत !” असे म्हणता म्हणता अगदी प्रेमाने तो कणकेचा मोदक वळायची . मला तर दादर चौपाटीला विसर्जनाच्या वेळी क्षणभर , बाप्पा मोदक खात खात निघाल्याचाच भास व्हायचा आणि हसत हसत नकळत हात उंचावून , भरल्या डोळ्यांनी बाप्पाला सदगदित स्वरात म्हणायचे , ” गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या !”


- दीड कप = २२५ ग्रॅम्स , गव्हाचे पीठ
- २ कप = २०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
- पावणे दोन कप = १८० ग्रॅम्स किसलेला गूळ
- २ टेबलस्पून खसखस
- १ टेबलस्पून पांढरे तीळ
- १ टीस्पून वेलची पावडर
- २ टेबलस्पून तूप
- चिमूटभर मीठ
- तेल
- पाणी गरजेनुसार
- मोदकाचे सारण बनवण्यासाठी एका कढईत २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात किसलेला गूळ घालून पूर्णपणे मंद आचेवर वितळू द्यावा . ( गूळ विकत घेताना तो चिक्कीचा नसल्याची खात्री करावी आणि गूळ शक्यतो बारीक चिरावा म्हणजे लवकर वितळतो ) .
- ३ ते ४ मिनिटांत गूळ वितळला की त्यात खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे सारण शिजून जरासे घट्ट होऊ द्यावे .
- आता त्यात पांढरे तीळ आणि खसखस घालून सारण पूर्ण कोरडे होऊ द्यावे . फक्त ते कडक होऊ देऊ नये नाहीतर मोदकाची पारी फाटते .
- आवडत असल्यास सुक्या मेव्याचे काप घालू शकता . आता वेलची पावडर घालून एकत्र करावे आणि गॅस वरून भांडे उतरून सारण पूर्ण थंड होऊ द्यावे .
- सारण थंड होईस्तोवर पारीसाठी कणिक मळून घेऊ शकतो . २ टेबलस्पून तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यावे . एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि मीठ नीट मिसळून घ्यावे . या पिठात तेलाचे कडकडीत मोहन घालावे . तेल गरम असले की मोदकांची पारी खुसखुशीत बनते .
- साधारण पाऊण कप पाणी वापरून कणिक जराशी मध्यम सैल मळावी , फार घट्ट नाही आणि अगदीच सैल नाही . फार मऊ मळली तर मोदकाच्या कळ्या पसरतात आणि जास्त घट्ट मळली तर मोदक भेगाळू शकतो .
- कणकेच्या गोळ्यावर तेलाचा हात लावून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
- आपल्याला हव्या त्या आकाराचे मोदक हाताच्या साह्याने किंवा साच्यात भरून बनवून घ्यावेत . मोदक आकार बनवण्याची कृती तुम्ही व्हिडिओत पाहू शकता .
- मोदक तळण्यासाठी कढईत मोदक बुडतील इतके तेल गरम करण्यास ठेवावे , नाहीतर मोदक एक सारखे तळले जात नाहीत . मध्यम आचेवर तेल चांगले गरम करून घ्यावे . नंतर आच मंद ते मध्यम ठेवून कढईत सुटसुटीत रित्या तळता येतील एवढेच मोदक तळावेत . सगळ्या बाजूंनी फिरवून फिरवून मोदक एकाच रंगावर तळून घ्यावेत . एका ताटात काढून घ्यावेत .
- विघ्नहर्त्या विनायकाचा नैवेद्य हे तळणीचे खुसखुशीत मोदक तयार आहेत .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply