Fried Modak recipe in Marathi-Talniche Modak- Ganesh Chaturthi- तळणीचे मोदक
Author: 
Recipe type: Dessert
Cuisine: Indian
 
Ingredients
किती बनतील : २० -२२
साहित्य:
  • दीड कप = २२५ ग्रॅम्स , गव्हाचे पीठ
  • २ कप = २०० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे
  • पावणे दोन कप = १८० ग्रॅम्स किसलेला गूळ
  • २ टेबलस्पून खसखस
  • १ टेबलस्पून पांढरे तीळ
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • २ टेबलस्पून तूप
  • चिमूटभर मीठ
  • तेल
  • पाणी गरजेनुसार
Instructions
कृती:
  1. मोदकाचे सारण बनवण्यासाठी एका कढईत २ टेबलस्पून तूप गरम करावे . त्यात किसलेला गूळ घालून पूर्णपणे मंद आचेवर वितळू द्यावा . ( गूळ विकत घेताना तो चिक्कीचा नसल्याची खात्री करावी आणि गूळ शक्यतो बारीक चिरावा म्हणजे लवकर वितळतो ) .
  2. ३ ते ४ मिनिटांत गूळ वितळला की त्यात खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे सारण शिजून जरासे घट्ट होऊ द्यावे .
  3. आता त्यात पांढरे तीळ आणि खसखस घालून सारण पूर्ण कोरडे होऊ द्यावे . फक्त ते कडक होऊ देऊ नये नाहीतर मोदकाची पारी फाटते .
  4. आवडत असल्यास सुक्या मेव्याचे काप घालू शकता . आता वेलची पावडर घालून एकत्र करावे आणि गॅस वरून भांडे उतरून सारण पूर्ण थंड होऊ द्यावे .
  5. सारण थंड होईस्तोवर पारीसाठी कणिक मळून घेऊ शकतो . २ टेबलस्पून तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यावे . एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि मीठ नीट मिसळून घ्यावे . या पिठात तेलाचे कडकडीत मोहन घालावे . तेल गरम असले की मोदकांची पारी खुसखुशीत बनते .
  6. साधारण पाऊण कप पाणी वापरून कणिक जराशी मध्यम सैल मळावी , फार घट्ट नाही आणि अगदीच सैल नाही . फार मऊ मळली तर मोदकाच्या कळ्या पसरतात आणि जास्त घट्ट मळली तर मोदक भेगाळू शकतो .
  7. कणकेच्या गोळ्यावर तेलाचा हात लावून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
  8. आपल्याला हव्या त्या आकाराचे मोदक हाताच्या साह्याने किंवा साच्यात भरून बनवून घ्यावेत . मोदक आकार बनवण्याची कृती तुम्ही व्हिडिओत पाहू शकता .
  9. मोदक तळण्यासाठी कढईत मोदक बुडतील इतके तेल गरम करण्यास ठेवावे , नाहीतर मोदक एक सारखे तळले जात नाहीत . मध्यम आचेवर तेल चांगले गरम करून घ्यावे . नंतर आच मंद ते मध्यम ठेवून कढईत सुटसुटीत रित्या तळता येतील एवढेच मोदक तळावेत . सगळ्या बाजूंनी फिरवून फिरवून मोदक एकाच रंगावर तळून घ्यावेत . एका ताटात काढून घ्यावेत .
  10. विघ्नहर्त्या विनायकाचा नैवेद्य हे तळणीचे खुसखुशीत मोदक तयार आहेत .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/fried-modak-recipe-in-marathi/