दक्षिण भारतीय व्यंजन हे आपल्या सर्वांच्या आवडीचे . इडली , डोसा आणि मेदुवडा , ह्यात तर माझा जीव गुंतलेला ! आताही हा ब्लॉग लिहीण्याआधीच उद्याच्या नाश्त्यासाठी इडलीचे तांदूळ आणि उडीद डाळ भिजवूनच बसलेय . कितीही मोठ्या हॉटेल मध्ये गेले तरी मेनूकार्ड वर साऊथ इंडिया चे सेक्शन असतेच असते!
परंतु इडली डोशाच्या पलीकडे ही जग आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये. इतक्या विविध प्रकारच्या इडल्या, डोसे , लंबगोलाकार पुट्ट , आपल्या कुर्डयांसारखे दिसणारे इडीयप्पम आणि खास करून डाळींचा वापर करून बनवलेले वडे या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे .
कधी रस्त्यावर वडापाव खाताना त्या गाड्यावरच्या मेनूमध्ये नक्की एकदा पहा . वडापावसोबत, ब्रेड पॅटीस , कांदा / बटाटा भजी यांच्या सोबत डाळीचे चपटे वडे नेहमी विकायला असतात . हे डाळीचे वडे मुख्यतः चण्याच्या डाळीचे बनवले जातात , आणि काही रेसिपीस मध्ये मूग डाळ, उडीद डाळीचा ही वापर केला जातो! या वड्यांची नावेही , कर्नाटकात , केरळात आणि तामिळनाडूत वेगवेगळी आणि पाककृतीतही वैविध्य ! चटम्बडे , मसाला वडई , कड्लाबेले वडा अशा निरनिराळ्या नावांनी हा ओळखला जातो !
आपल्या महाराष्ट्रालाही डाळ वडे हे नवीन नाही . नागपुरी वडा भात ऐकलंच असेल तुम्ही . पुढे काही दिवसांत मी त्याचीही रेसिपी अपलोड करीन . नागपुरात आणि विदर्भात भातावर वडे कुस्करून वडे तळलेल्या तेलातच हिंग मोहरीची फोडणी देऊन कालवलेला भात दह्या-ताकाच्या कढीचे भुरके मारत आनंदाने फस्त केला जातो! दक्षिणेच्या मेदुवड्याप्रमाणे उडदाच्या डाळीचे वडे चिंचेच्या गोड चटणीसोबत आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात समाविष्ट असतात !
आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते पण जर जास्त उरले तरी चिंता करू नका . मी ना माझ्या उरलेल्या वड्यांना झणझणीत रस्स्यात घालून मस्त साजूक तूप लावून फुलक्यांसोबत वाढले होते. इतके चवदार लागले काय सांगू , तुम्ही छानपैकी कढी बनवून त्यात देखील हे वडे घालू शकता !
मग कधी घालताय डाळ वड्यांचा घाट ….
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- १ कप = २०० ग्रॅम्स चण्याची डाळ , स्वच्छ धुऊन , रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
- १/२ कप= १२५ ग्रॅम्स मूग डाळ , स्वच्छ धुऊन , रात्रभर किंवा किमान ४ तास पाण्यात भिजवून ठेवावी
- १ मध्यम आकाराचा कांदा = ७० ग्रॅम्स बारीक चिरून
- २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १ इंच आल्याचा तुकडा किसून
- १०-१२ कढीपत्ता बारीक चिरून
- १/४ टीस्पून हिंग
- १ टीस्पून जिरे
- १/२ टीस्पून लाल मिरची पूड
- मीठ चवीप्रमाणे
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
- तळण्यासाठी तेल
- डाळींचे पाणी पूर्णपणे काढून घ्यावे . एका चाळणीत १५ मिनिटे डाळ ठेवून पाणी निथळू द्यावे. दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सरमधून जाडसर वाटून घ्याव्यात . चण्याच्या आणि मुगाच्या डाळीचे अख्खे तुकडे राहिले तर ते वड्यांत दिसायला चांगले दिसतात !
- एका बाऊलमध्ये वाटलेल्या डाळींची पेस्ट , कांदा , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या , आले, लाल मिरची पूड, जिरे, हिंग, , कोथिंबीर आणि १ टीस्पून मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावे.
- डाळ वड्याचे मिश्रण तयार आहे . हाताच्या तळव्यांना तेल लावून आपल्याला आवडतील त्या आकारात गोल चपटे वडे थापून घ्यावेत. हे वडे चटकन तळावेत .
- वडे तळण्यासाठी तेल मध्यम आचेवर तापवून घ्यावे. आच मंद करून हे वडे कढईच्या बाजूने हलकेच तेलात सोडावेत. हा डाळीचे वडे असल्याने ते बाहेरून लगेच लाल होतात परंतु आतपर्यंत शिजत नाहीत. म्हणून हे वडे मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. एका किचन टिश्यू पेपरवर काढून घ्यावेत. अशाच प्रकारे सारे वडे तळून घ्यावेत.
- हे डाळ वडे गरम गरमच हिरव्या चटणीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत खावयास द्यावे!

Leave a Reply