आम्हा कोकणातल्या लोकांचे भातावर विशेष प्रेम! मी तर लहानपणापासूनच प्रचंड भात खाऊ आणि बिर्याणी म्हणजे माझा विकेस्ट पॉईंट! बिर्याणी खायचा योग कधीही कुठेही आला तर काटे चमचे बाजूला ठेवून अगदी चवीने , हाताची बोटे कोरडी होईपर्यंत चाखत मी बिर्याणी अक्षरशः चापते !
घरीसुद्धा वरचेवर मी निरनिराळ्या म्हणजे देशाच्या विविध प्रांतातल्या बिर्याणी बनवायचा प्रयत्न करते . माझे हे बिर्याणी प्रेम बघून पार्टनर ने मला प्रतिभा करन लिखित ” बिर्यानी ” हे अतिशय सुंदर पुस्तक भेट दिले . या पुस्तकात देशाच्या चारी दिशांकडच्या राज्यांमध्ये बनवल्या जाणाऱ्या बिर्याणींना खवय्यांसाठी संकलित केले आहे . लेखिका महोदयांनी किती खोलवर रिसर्च केला आहे ते या पुस्तकाचे एकेक पान वाचताना जाणवते . जर योग आला तर नक्की हे पुस्तक वाचा , आणि खरेदी करून तुमच्यासारख्या खवय्यांच्या संग्रही असणे यासारखा आनंद नाही !
बिर्याणी च्या बाबतीत हल्लीच एक इंग्रजी लेख वाचण्यात आला – Why Veg Biryanis must not be referred as Biryani ! लेखकाने यात आपले वैयक्तिक विचार मांडताना काही मुद्दे मांडले आहेत , जे माझ्या पचनी पडायला थोडे जड गेले . लेखकाच्या दृष्टीने व्हेज बिर्याणी असा प्रकारच अस्तित्वात नसून जास्तीत जास्त त्याला पुलाव असे म्हटले जावे , परंतु ” बिर्याणी नाही ” ! याच विषयाच्या धर्तीवर मला माझ्या वाचकांसमोर माझे विचार मांडायची ही संधी गमवायची नाही .
मला असे वैयक्तिकरित्या वाटते की , खाणे ही अशी एक बाब आहे की जी सर्व समावेशक असून तिला उगाचच कसल्याही बेड्यांमध्ये अडकू देऊ नये ! बिर्याणीचच उदाहरण घेऊ , चिकन आणि मटण असेल तरच तिला बिर्याणी म्हणावे, हा “Exclusive ” हट्ट धरण्यात काय हेतू आहे हे मला न उमगलेले कोडे आहे . एखाद्या शाकाहारी व्यक्तीने जर व्हेज बिर्याणी बनवली तर फक्त त्यात चिकन किंवा मटण नाही म्हणून त्या व्यक्तीचे कौशल्य दुर्लक्षित करणे मला योग्य वाटत नाही ! आपल्या आवडीनिवडीनुसर , खाण्यापिण्याच्या सवयीननुसार अन्न ग्रहण करण्याचे आणि त्याचा आस्वाद घेण्याचे स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच आहे. मग त्यात एखाद्या पदार्थाचे विशेषीकरण करून फक्त अमुक एका वर्गासाठीच बनवले जावे असा आग्रह ( “अट्टाहास” वाचलंत तरी हरकत नाही ) धरणे कितपत योग्य आहे.
हा मुद्दा जरा वादाचाच ,मला फक्त माझे मन मोकळे करावंसं वाटले इतकच! असो , आपण वळूया आजच्या माझ्या रेसिपी कडे! मी आज दम बिर्याणी बनवणार आहे जी आजकाल पार्टनरच्या ऑफिसमध्ये थोडी पॉप्युलर झालीये ! ही आहे “आलू दम बिर्याणी ” – ही रेसिपी मी बऱ्याच वेळा स्वतः च्या अंदाजाने इन्ग्रेडिएंट्स कमी जास्त करून डेव्हलप केली आहे . विश्वास ठेवा , ही बिर्याणी खरंच खूप चविष्ट बनते , नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे अभिप्राय कळवा खाली कंमेंट सेक्शनमध्ये!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- ३०० ग्रॅम्स बेबी पोटॅटो ( लहान आकाराचे बटाटे ) , साली काढून, धुऊन पाण्यात बुडवूं ठेवावेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत
- १ १/२ कप = ३०० ग्रॅम्स बासमती तांदूळ , ३-४ वेळा स्वच्छ धुऊन पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवावेत
- २ मोठे कांदे = १८० ग्रॅम्स . लांब चिरून
- २ मोठे टोमॅटो = २०० ग्रॅम्स बारीक चिरून
- १ कप = २०० ग्रॅम्स दही
- १ कप = १८० ग्रॅम्स तळलेला कांदा
- १ कप कोथिंबीर बारीक चिरून
- हिरवा मसाला वाटण = १ इंच आल्याचा तुकडा, १०-१२ लसणीच्या पाकळ्या , ५ हिरव्या मिरच्या
- तेल
- मीठ
- तूप
- २ तमालपत्र
- ४ हिरव्या वेलच्या
- ४ लवंग
- १/२ इंच दालचिनीचा तुकडा
- १/२ टीस्पून हळद
- १ टेबलस्पून लाल मिरची पूड ( तिखट आपल्या आवडीमुसार )
- १ टीस्पून गरम मसाला पावडर
- १/२ टीस्पून पिवळी मिरची पूड ( मी कॅच ब्रँड ची वापरली आहे , मिळत नसेल तर नाही घातली तरी चालेल )
- १ टीस्पून धणे पावडर
- थोडे केशराचे धागे १ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून
- सर्वप्रथम बिर्याणीचा तांदूळ शिजवून घेऊ. एका मोठ्या कढईत ५ कप = १. २५ लिटर पाणी उकळायला ठेवू. पाण्याला उकळी आली की पाण्यात मीठ घालू . हे अतिशय महत्त्वाचे आहे नाहीतर बिर्याणीत भात फिका लागतो. मी ३ टीस्पून मीठ घातले आहे .
- पाण्यात आता तमालपत्र, दालचिनी , हिरव्या वेलच्या , लवंग आणि १ टीस्पून तूप घालावे. तूप घातल्याने भात मोकळा शिजतो. तांदूळ भिजवलेले पाणी गाळून या उकळत्या पाण्यात तांदूळ घालून घ्यावा आणि तो ९० टक्के शिजेपर्यंत शिजवावा. तबदल्याच्या दाण्याचा एक कण कच्चा असेपर्यंत शिजवावा. मोठ्या आचेवर ५ मिनिटांत भात ९० टक्के शिजतो . गॅस बंद करावा , आणि भात एका चाळणीत काढून एका मोठया परातीत किंवा ताटात पसरून ठेवावा.
- एका कढईत ५ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे. बटाट्यांना एका फडक्याने कोरडे करून घ्यावे आणि त्यांना काट्याने टोचे मारून घ्यावेत म्हणजे ते तेलात फुटत नाहीत. गॅस मंद ते मध्यम ठेवून बटाटे छान परतून घ्यावेत . मी १७ मिनिटे बटाटे मंद आचेवर तळून घेतले आहेत . एक टूथपिक घालून बटाटे शिजले आहेत की नाहीत हे तपासून गॅस बंद करावा आणि बटाटे एका भांड्यात काढून घ्यावेत.
- बटाटे मॅरीनेट करण्यासाठी एका भांड्यात दही घालून फेटून घ्यावे. त्यात हळद, लाल मिरची पूड, गरम मसाला पावडर, पिवळी मिरची पूड, धणे पावडर, आणि कोथिंबीर घालून घ्यावी. त्यातच अर्धा तळलेला कांदा हाताने चुरून घालावा. उरलेला कांदा बिर्याणीच्या थरांसाठी वापरला जाईल. थोडे चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे. या मिश्रणात बटाटे घालून एकत्र करून घ्यावेत. १५ मिनिटे झाकण घालून एका बाजूला ठेवून द्यावेत.
- आता हिरवे वाटण बनवून घेऊ. आले,, लसूण आणि हिरव्या मिरच्या १ ते २ टेबलस्पून पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- बटाटे शिजवण्यासाठी ज्या तेलात आपण बटाटे तळले आहेत त्याच तेलाचा वापर करणार आहोत. तेल गरम करून त्यात कांदा घालून तो पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा. कांदा नरम झाला की त्यात हिरवे वाटण घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे.
- आता बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडे मीठ घालून झाकण घालून शिजवावेत . टोमॅटो ५ मिनिटे झाकण घालून शिजवल्यावर नरम होतात . आता त्यात मॅरिनेटेड बटाटे मिश्रणासकट घालून झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावेत.
- बटाटे १० मिनिटे शिजल्यावर मसाल्याला तेल सुटायला लागते . मसाला चांगला परतला की हा बटाट्याचा रस्सा फार पातळ किंवा घट्ट नसावा, आता गॅस बंद करून थंड होऊ द्यावा.
- एका हंडीत किंवा मोठ्या पसरट पातेल्यात किंवा कुकर मध्ये शिटी काढून त्यात बिर्याणी बनवू शकतो. हंडीला तळाला आणि बाजूंना तुपाचा हात लावून घ्यावा. त्यात पहिला थर बटाट्याच्या रस्स्याचा लावावा . अर्धा रस्सा दुसऱ्या थरासाठी बाजूला काढावा. त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि थोडा तळलेला कांदा घालावा. त्यावर अर्धा भाग भात घालून पसरून घ्यावा. केशराचे दूध, कोथिंबीर आणि थोडा तळलेला कांदा घालून पहिला थर पूर्ण करून घ्यावा.
- अशाच प्रकारे दुसरा थर लावून घ्यावा.
- हंडीच्या झाकणाला कणकेची लात लावून नीट हंडी दाबून बंद करून घ्यावी.
- मोठ्या आचेवर डायरेक्ट हंडी ठेवून ३ मिनिटे ठेवावी.
- दुसऱ्या आचेवर एक लोखंडी तवा गरम करून घ्यावा . ३ मिनिटांनंतर हंडी या लोखंडी तव्यावर ठेवावी आणि आच मंद करावी. १० मिनिटे अशा प्रकारे मंद आचेवर दम देऊन बिर्याणी शिजू द्यावी . बांधावी!
- १० मिनिटांनंतर हंडी तव्यावरून खाली उतरावी आणि तयार आलू दम बिर्याणी गरमगरम कोणत्याही रायत्यासोबत वाढावी !

Leave a Reply