
मला नाटक , सिनेमे पाहायला प्रचंड आवडते , अगदी टुकार हाणामाऱ्यांपासून ते विनोदी , गंभीर वास्तववादी चित्रपटांपर्यंत ! श्रीदेवी, माधुरीच्या ठुमकेबाज नृत्यगीतांवर थिरकणारी पिढी माझी ते आताच्या बोल्ड विषयांवर बनणाऱ्या वेब सीरिजना सुद्धा स्वीकारण्याइतके मन मोकळे ठेवते !
काही चित्रपटांतील काही मजेशीर संवाद अगदी लक्षात राहतात आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार , कधी कधी आज खायला वेगळे काय करू या माझ्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर देतात . खोटे वाटत असेल तर सांगते हां , मागे एकदा दक्षिणेकडचा कुठलातरी पिक्चर टीव्हीवर लागला होता , त्या व्हिलन ने हिरोला रागात ,म्हटले ” मैं तेरा मार मार के भुरता बना दूंगा..” मी घेतले ना सिरिअसली , आणि फ्रिजमधले वांग्याच्या कापांसाठी राखून ठेवलेले वांगे काढून डायरेक्ट ठेवले निखार्यांवर , भरीत बनवायला हो !आजच्या रेसिपी चे सुद्धा तसेच झालेय ..

राजकुमार संतोषी माझा आवडता डायरेक्टर , त्यांचा ” अंदाज अपना अपना ” तर बॉलिवूडच्या इतिहासात उच्च प्रतीच्या खुमासदार विनोदशैलीचे झेंडे गाडून गेलाय ! त्यांनी दिग्दर्शित केलेला ” अजब प्रेम कि गजब कहानी ” माझा अत्यंत आवडता ! त्यातला वेंधळा रणबीर कपूर नी सुंदर बाहुलीसारखी दिसणारे क्युट कतरीना , काय अफलातून केमिस्ट्री जमलीय त्यांची ! गैरसमजातून रणबीर ला मारलेल्या थपडीचे प्रायश्चित्त म्हणून एका पावसाळी सीनमध्ये कतरीना त्याला उलटून तिला थप्पड मारायला आग्रह करते , किती तो निरागस पणा बाई ,अगदी लहान मुलांच्या खेळातला ! तो हे अर्थातच नाही करू शकत म्हणून शेवटी ती त्याला म्हणते , ” तो तुम मुझे खिलाओ मूंग दाल के पकोडे और पुदीने की चटनी ” आणि नंतर कोसळणारा पाऊस , रस्त्यावर खोमचे वाल्याकडे कढईत गरम गरम तळली जाणारी मुगाच्या डाळीची भजी , द्रोणात चटणीसोबत भजी बुडवून मिटक्या मारत खाणारी कतरीना आणि तिला प्रेमाने न्याहाळणारा रणबीर , आहा ! काय मस्त रोमँटिक जमलाय हा सीन !
हा सीन पाहून वळते ना वळते तोच पार्टनर किचनमध्ये काहीतरी खुडबुड करीत असल्याचा आवाज आला म्हणून डोकावून पाहिले तर पठ्ठया हातात मूगडाळीचे नवीन न उघडलेले पाकीट घेऊन उभा ! म्हणतो कसा , ” भिजवूया डाळ , रात्री जेवणाला सुट्टी नी फक्त मूग डाळ भजी नी पुदिन्याची चटणी नी वेळ मिळाला तर चिंचेची चटणी सुद्धा !”

लटका लटका राग दाखवत मी सुद्धा मनातून खुश होत केली हो तयारी मूग डाळीच्या कुरकुरीत भजींची ! तुम्हीही घ्या रेसिपी वाचून एकदा …
Prep time:
Cook time:
Total time:

- १ कप मूग डाळ - २०० ग्रॅम्स ,
- १ टीस्पून जिरे ,
- १ टीस्पून धणे ,
- पाव टीस्पून काळी मिरे ,
- अर्धा टीस्पून ओवा ,
- ५-६ लवंगा ,
- अर्धा इंच दालचिनीचा तुकडा,
- १ टीस्पून हळद ,
- पाव टीस्पून लाल मिरची पूड ,
- पाव टीस्पून हिंग ,
- १०-१२ कढीपत्ता ,
- १ इंच आल्याचा तुकडा,
- ४-५ हिरव्या मिरच्या ,
- पाव कप कोथिंबीर ,
- चवीनुसार मीठ ,
- तेल
- सर्वप्रथम मूग डाळ ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन ४ ते ६ तास पाण्यात भिजत घालावी . नंतर चाळणीत काढून १५-२० मिनिटे निथळत ठेवावी .
- वरील सर्व साहित्य ( तेल आणि मीठ सोडून ) आणि मूगडाळ मिक्सरमध्ये एकत्र पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे . वाटताना पाणी घालू नये .
- हे जाडसर मिश्रण एका बाउल मध्ये काढावे . त्यात चवीपुरते मीठ मिसळावे.
- कढईत मध्यम आचेवर तेल गरम करावे . आच मंद ते मध्यम ठेवून त्यात मिश्रणाचे लहान लहान गोळे अलगद सोडावेत . खरपूस एकाच रंगावर तळून घ्यावेत .
- ही भजी छान कुरकुरीत होते आणि गरम असतानाच पुदिन्याच्या चटणीसोबत आणि चिंचेच्या आंबट गोड चटणीसोबत खायला द्यावी
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply