” नेसली ग बाई मी, चंद्रकला ठिपक्यांची. बाई ठिपक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची….. “
निसर्गातल्या बदलांची , चंद्र-सूर्य-सागराशी , उत्तुंग आभाळाशी , पाने-फुले-गवताशी मानवी भावनांची गुंफण आपल्या साहित्यिकांनी , कवींनी अगदी सुरेख घातली आहे . पहा ना ,संत एकनाथांच्या या गवळणीत गोपिकेला सुद्धा कृष्णाच्या लाडिक तक्रारी करताना आपण नेसलेल्या चंद्रकळा साडीचे वर्णन करण्याचा मोह आवरत नाही ! एखाद्या षोडषेच्या सौंदर्याचा चढता आलेख , चंद्रकलेप्रमाणे दिवसागणिक निखरणाऱ्या तिच्या रूपाचे वर्णन करताना लेखकांनी आपले बोरू नी टाक झिजवले आहेत !
एवढेच काय , तर आपले पारंपरिक पदार्थ आणि निसर्ग यांच्या एकमेकांसोबत जोडलेल्या तारा तर मनातील भावना छेडणाऱ्या .. टम्म फुगलेली भाकरी , हाच आपला चंद्र मानणाऱ्या एका कष्टकर्याचे आर्त मनोगत नारायण सुर्वे आपल्या कवितेतून मांडताना दिसतात , दारातला मोत्या किंवा खंड्या कुत्रा चतकोर पोळीच्या इमानाला जागतो तर गोड सारणाने भरलेली अर्धचंद्राकृती करंजी सणासुदीच्या दिवशी शुभ मानली जाते !मागे मी खव्याच्या करंजी विषयी लिहिताना , निसर्ग आणि आपले पदार्थ यांविषयी थोडे विस्ताराने लिहिले आहे . तुमचा वाचायचा राहिला असल्यास , एकदा वेळ मिळाल्यास नक्की वाचून पहा : खव्याच्या/ मेव्याच्या करंज्या
खव्याच्या करंज्या ज्याला उत्तर भारतात गुजिया म्हणतात आणि पूर्ण चंद्राप्रमाणे बनवलेली गोल आकाराची करंजी ” चंद्रकला ” म्हणून ओळखली जाते . गुजिया नी चंद्रकला , पाकात बुडवून तसेच पाकाशिवाय सुद्धा बनवल्या जातात ! याचीच एक गम्मत सांगते हां तुम्हाला ..
काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉगसाईट् वर मालपुआच्या रेसिपीवर दूर देशी स्थित एका वाचक मैत्रिणीचा सुंदर अभिप्राय आला , तिने ब्लॉग वाचून हरखून मला एक गमतीशीर ओळख दिली , ” मराठीने केला उत्तर प्रांतीय भरतार , आणि त्यात रमलेली आमची मराठी मुलगी !” ,, वाचून असे खुद्कन हसू आले , फुलपाखरासारखे बागडतच मी आईला आणि सासूबाईना फोन लावला !
माझ्या सासरी उत्तर प्रदेशात , काय विचारलेत ,” कौन शहर ? ” अहो ” इलाहाबाद ” ( आपल्या सिनेसृष्टीचे दैवत ” श्री अमिताभजी बच्चन ” तिथलेच , “ह्यां “ .. त्यांच्याच इश्टाईल मध्ये ) धुळवड म्हणजे होळी फार मस्तीत मनवली जाते . गावदेवाच्या देवळातून पहाटे जो होळीचा आरंभ होतो ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत पाण्याने , पिचकाऱ्यांनी धुळवड साजरी होते. त्यानंतर अंघोळ करून रंगीबेरंगी कपडे घालून गावातील नातेवाईक , शेजारी पाजारी एकत्र कोणा घरी किंवा गावच्या पारावर . मंदिराजवळच्या मोकळ्या मैदानात येऊन फक्त गुलालाची होळी खेळतात ! गावातल्या स्त्रिया ढोलकी, डफलीच्या तालावर “फगुआ ” ही लोकगीते गातात ! होळी फाल्गुनातला सण म्हणून ही गीते ” फगुआ” .. आपण नाही का श्रावणातले झुले झुलताना श्रावणगीते गुणगुणतो , तस्सेच ! आता ह्या आनंदाच्या उत्सवात खाण्यापिण्याशिवाय थोडी ना मजा .. पाट्यावर वाटलेल्या ताज्या भांगेचा प्रसाद, थंडाई , मठरी आणि न विसरता खव्याच्या गुजिया म्हणजेच करंज्या! या गुजिया कधी पाकात बुडवलेल्या तर कधी नुसत्याच, खायला मात्र खूपच स्वादिष्ट !
होळी म्हणजे रंगोत्सव. एकमेकांविषयो प्रेम , माया , आपुलकी व्यक्त करण्याचा हा सुंदर सण ! नात्यांतील मिठास वृद्धिंगत करण्यासाठी साखरेच्या पाकात घोळवलेल्या , खव्याच्या सारणाने गच्च काठोकाठ भरलेल्या या चंद्रकला , होळीच्या दिवशी नक्की बनवा ! आम्हाला अभिप्राय कळवायला विसरू नका , खाली कंमेंट सेक्शन मध्ये !

- साहित्य:
- पारीसाठी साहित्य :
- • २ कप्स = २५० ग्रॅम्स मैदा
- • १ टेबल्स्पून रवा
- • पाव कप = ५० ग्रॅम्स तूप
- • २ टेबलस्पून दूध
- • पाणी
- सारणासाठी साहित्य:
- • अर्ध्या कपाहून थोडा जास्त खवा /मावा = १५० ग्रॅम
- • अर्धा कप = १०० ग्रॅम्स बारीक रवा
- • अर्धा कप = १०० ग्रॅम्स पिठीसाखर
- • पाव कप = २५ ग्रॅम्स बारीक किसलेले सुके खोबरे
- • १ टेबलस्पून बदाम
- • १ टेबलस्पून चारोळी
- • १ टेबलस्पून काजू
- • १ टेबलस्पून मनुका
- • ५-६ हिरव्या वेलच्या ( जाडसर कुटून )
- • तूप
- पाकासाठी साहित्य:
- • २ कप साखर = ४०० ग्रॅम्स
- • १ कप पाणी
- • थोडे केशराचे धागे
- कृती:
- • एका परातीत मैदा , रवा नीट एकत्र करून घ्यावा .
- • टीप : रव्यामुळे करंजीचे बाहेरील आवरण खुसखुशीत होते .
- • तूप हलके गरम करून घ्यावे . हे तूप पिठात चांगले दोन हातांच्या तळव्यांनी चोळून घ्यावे . यामुळे चंद्रकला अतिशय तोंडात विरघळतील इतक्या खुसखुशीत बनतात ! अर्धा कप कोमट पाण्याने पीठ घट्टसर मळून घ्यावे . एका भिजवलेल्या सुती कापडाने हा गोळा किमान अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा.
- • आता चंद्रकला करंजीचे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात रवा सोनेरी रंगावर येईपर्यंत साधारण १० मिनिटे भाजून घ्यावा .
- • त्याच पॅनमध्ये बदाम, काजू , आणि चारोळी साधारण २-३ मिनिटे भाजून घ्यावीत . थंड झाल्यावर मिक्सरमधून त्यांची जाडसर पूड करून घ्यावी .
- • नंतर सुके खोबरे हलका खमंग सुगंध दरवळेपर्यंत भाजावे , रंग बदलू देऊ नये . बाजूला काढून ठेवावे .
- • आता खवा हाताने कुस्करून ५ मिनिटे मंद आचेवर भाजावा . त्यात जरासा कोरडेपणा आला की आच बंद करावी .
- • एका मोठ्या भांड्यात खवा , रवा आणि सुके खोबरे एकत्र करून घ्यावे . त्यात सुक्या मेव्याचा जाडसर कूट , वेलची पावडर , आणि बारीक चिरलेल्या मनुका घालाव्यात . तसेच पिठीसाखर सुद्धा मिसळून घ्यावी . आपले करंजीचे सारण तयार आहे .
- • एका कढईत साखर आणि पाणी घालून मध्यम आचेवर साखर विरघळू द्यावी . त्यातच थोडे आवडत असल्यास केशराचे धागे घालावेत . साधारण २ मिनिटांत साखर विरघळते . त्यानंतर मंद आचेवर हा पाक अजून ४ मिनिटे शिजू द्यावा व एकतारी पाक बनवावा . पाक जास्त पातळ राहिला तर चंद्रकला मऊ पडू शकते आणि घट्ट झाला तर करंजीवर साखरेचे कण दिसू लागतात . पाक तयार झाला की जरा थंड होऊ द्यावा .
- • पीठ झाकून अर्धा तास झाला आहे . त्या पीठाचे ३ गोळे करून घ्यावेत . एक गोळा पोळपाटावर ठेवून , बाकीचे दोन गोळे रुमालाखाली झाकून ठेवावेत. म्हणजे कोरडे होणार नाहीत .
- • गोळ्याला पोळपाटावर दाब देऊन दोन्ही हाताने चांगले मळून लांब वळ्याचा आकार द्यावा . सुरीने त्याचे एकाच आकाराचे लहान तुकडे कापून घ्यावे आणि एकेक गोळ्याला व्यवस्थित दाबून मऊसूत करून घ्यावे .
- • एक चंद्रकला बनवण्यासाठी दोन पुरीच्या आकाराच्या पाऱ्या पातळ लाटाव्यात . जाड पारी खायला चांगली लागत नाही . अगदीच वेळ नसेल तर मोठा गोळा घेऊन मोठी पातळ पोळी लाटावी . रिंग कटर किंवा वाटीच्या साहाय्याने पुऱ्या काढून घ्याव्यात .
- • एका पारीवर कडांना दुधाचे किंवा पाण्याचे बोट लावावे . मध्यभागी चमचा भरून सारण घालावे . सारण अंदाजे कमी जास्त करावे . कडांपर्यंत पोहूचू देऊ नये . नंतर दुसरी पारी त्यावर ठेवून कडा नीट दाबून बंद कराव्यात .
- • करंजीच्या कडा व्यवस्थित मुरड घालून नक्षीदार कराव्यात .
- • एकेक करंजी झाली की कापडाखाली झाकावी म्हणजे वातड होत नाही .
- • करंज्या तळण्यासाठी कढईत करंज्या बुडतील इतके तूप घालावे . मध्यम आचेवर तूप तापवावे . तूप कडकडीत झाले तर करंज्या घालताक्षणीच करपतात .
- • आच मंद करून करंज्या उलटून पालटून सोनेरी रंगावर तळाव्यात . साधारण चार पाच करंज्या एकत्र तळताना ८ ते १० मिनिटे तळायला लागतात . तूप निथळून एका ताटात काढून घ्याव्यात .
- • चंद्रकला जरा थंड झाल्या की पाकात व्यवस्थित बुडवून घोळवाव्यात . पाक हलका एकदम कोमट असावा . नंतर एका ताटात काढून घ्याव्यात . वरून पिस्त्याचे काप आणि आवडत असल्यास खाण्याचा वर्ख लावून सजवाव्यात ! या करंज्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर आठवडाभर टिकतात .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply