महाराष्ट्र हा पहाडांचा देश आहे आणि याच पहाडांचा कायापालट केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ! मराठ्यांचे स्वराज्य स्थापन झाले. शिवकालीन दुर्ग म्हणजेच किल्ले आजही महाराजांच्या पराक्रमाची इतिहास गाथा मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत.
महाराष्ट्रातले हे भव्य किल्ले बर्याच गिर्यारोहकांना भुरळ घालताना दिसतात. इथल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा साहसी ट्रेकर्सना खुणावतात ! खर्र सांगू का.. मला ही या किल्ल्यांना भेट द्यायला खूप आवडते. नाही हो गैरसमज करून घेऊ नका , ट्रेकिंग वगैरे काही माझा प्रांत नाही , आपल्याला बुवा गाइडला घेऊन इतिहासाच्या गोष्टी ऐकायला लईई भारी वाटते आणि मुख्य म्हणजे महाराजांचा गड म्हणजे खवय्यांसाठी सुवर्णसंधी!
गड चढायला सुरूवात करण्याआधीच तिखट मीठ लावलेल्या कैर्या आणि पेरू विकणारी एक आजी “ घे ग बायो माझी , घे ग बायो “ म्हणत आर्जव करते! मग काय आजी दिसली की आपला बाबा जीव पाघळतो, मग काय ..कमीत कमीत 3-4 पुड्या कैरी, चिंचा आणि पेरू हातात घेऊन , आमची स्वारी निघाली गड चढणीला! चिंचा चोखत चोखत गाइडरावांच्या मागे मागे फिरत पूर्ण किल्ले दर्शन होते ! महाराजांचा इतिहासच इतका रंजक आहे ना की गाइडरावांची जिव्हा थकत नाही बोलून बोलून आणि आमचे कानही तृप्त होत नाहीत ! मी खात्रीने सांगते जर खरच काही वर्षे महाराष्ट्रात असाल तर महाराजांच्या या किल्ल्यांना जरूर भेट द्या! आनंददायी अनुभव! जेव्हा हे किल्ले भ्रमण पूर्ण होते ना तोवर सपाटून भूक लागलेली असते आणि चिंचा कैर्यादेखील मटकाऊून झालेल्या असतात!
मग आमचा मोहरा वळतो एखाद्या छोट्याशा टपरीकडे . टपरी म्हणणे जरा चुकीचे आहे कारण गडावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या घरांच्या अंगणात मांडव आणि छप्पर घालून छोटी छोटी हॉटेल्स टाकली आहेत. हे जे हॉटेल व्यवसायिक आहेत किंवा गाईड सर्विसेस करणारे हे दुसरे तिसरे कोणीही नसून महाराजांच्या सैन्यदलात आणि दरबारात काम करणाऱ्या सरदार आणि मावळ्यांच्या वंशजांपैकी आहेत. याच लोकांनी गडाचे गडपण आणि इतिहास जपला आहे .तेही इतक्या उंचावर ,ऊन पाऊस आणि वाऱ्याची तमा न करता आपल्या कुटुंबीयांसमवेत गडांना जपण्याचं काम करीत आहेत . त्यांना सरकारी मदत किती मिळते हा वादाचा मुद्दा आपण वगळलेला बरा!
असो तर अशाच एखाद्या छोट्याशा अंगणात खाली मांडी घालून बसायचे आणि द्यायची ऑर्डर ….गरमागरम ज्वारी-बाजरीची भाकरी, तव्यावरच पिठलं आणि झणझणीत भरली वांगी ! गडावर जाऊन भरलं वांगं न खाता गड उतरलात तर परत गाडी वळवून जा आणि नक्की खा , काय आहे आयुष्यात काही गोष्टी मिस नसतातच करायच्या मुळी या पक्क्या मताची मी आहे!
आता भरलं वांग हे प्रत्येक महाराष्ट्रीयन घरात बनवल जात आणि चवीलाही वेगवेगळं असतं बरं का !पण गडावरल्या वांग्याची चवच न्यारी! मळ्यातील ताजी काटेरी वांगी, चुलीवर खमंग भाजलेले तीळ, खोबरं आणि पाट्यावर वाटलेल्या मसाल्याचा लाल चुटूक गोळा त्यात मिसळली गडावरची प्रदूषणमुक्त ताजी हवा…
बस काय लिहिता लिहिता डोळ्यात आणि जिभेला एकदम पाण्याची धार लागली ना राव! तूडुंब जेवून वर लोटा भर थंड ताक पिऊन आम्ही नेहमी गडावरच्या संग्रहालयाला आणि पुस्तक प्रदर्शनाला भेट देतो. शिवकालीन इतिहास तसा मी रणजीत देसाईंच्या कादंबऱ्यांमधून शालेय जीवनात वाचलेला आहेच, परंतु प्रत्येक गडावर एक तरी पुस्तक विकत घेतलेय माझ्या संग्रहासाठी! तर असा हा माझा खवय्यांचा महाराष्ट्र देश , आणि अशी ही माझी किल्ले भ्रमंती ! थोड्या फार फरकाने सगळ्या गडांवर असेच द्रुश्य असते परंतु तिथल्या खाद्यसंस्कृतीला एक वेगळीच चव असते तिथल्या मातीची, शिवरायांच्या शौर्य गाथांची आणि तिथल्या लोकांच्या डोळ्यांत साठवून ठेवलेल्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमी वारश्याची!
नक्की करून बघा ही भरली वंगी आपल्या आवडत्या भाकरी सोबत ! बघा नकळत कानात ह्या पोवाड्याचे सूर निनांदू लागतात “ जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! “
Prep time:
Cook time:
Total time:
Serves: 3-4

- 8 लहान ते मध्यम आकाराची काटेरी वांगी (250 ग्रॅम )
- 3 टेबलस्पून शेंगदाणे
- 2 टेबल स्पून पांढरे तीळ
- 2 टीस्पून जीरे
- 1 कप किसलेले सुके खोबरे ( 100 ग्रॅम )
- 3 मध्यम आकाराचे कांदे ( 150 ग्रॅम )
- 1 लहान आकाराचा टोमॅटो ( 70 ग्रॅम )
- 10-12 लसूण पाकळ्या
- 1-1.5 इंच आल्याचा तुकडा
- ¼ कप कोथिंबीर
- ½ टीस्पून हळद
- 2 टीस्पून लाल मिरची पूड
- 1 टीस्पून गरम मसाला
- 1 टीस्पून धणे पावडर
- तेल
- मीठ चवीनुसार
- सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत वांग्याचे देठ न कापता त्यांना तळापासून देठापर्यंत दोन उभ्या चिरा मारून घ्याव्यात जेणेकरून आपण त्यात मसाला भरू शकू. वांगी नंतर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावीत नाहीतर ती काळी पडतात.
- आता मसाल्याची तयारी करून घेऊया एक कढई मध्यम आचेवर तापवून घ्यावी त्यात शेंगदाणे घालून खरपूस भाजावेत . शेंगदाणे चांगले भाजले की एका ताटात काढून घ्यावेत.
- त्याच कढईत पांढरे तीळ भाजून घ्यावेत . तीळ करड्या रंगावर भाजून झाले की ताटात काढून घ्यावेत. नंतर जिरे घालावे आणि चांगले खमंग होइपर्यन्त भाजावे. अशाच प्रकारे सुके खोबरे भाजून घ्यावे आणि ताटात काढून घ्यावे .हे मिश्रण पूर्ण थंड होऊ देणे.
- वर कोरड्या भाजलेल्या साहित्यात आले, लसूण आणि अर्धा चिरलेला कांदा मिसळावा .बाकीचा अर्धा कांदा फोडणीसाठी राखून ठेवावा .अगदी थोडं पाणी वापरून या मिश्रणाचा घट्ट गोळा वाटावा. मात्र बारीक वाटावे जास्त जाडसर असू नये .मसाला वाटताना पाणी जास्त झाले तर मसाला पातळ होऊन वांग्यात भरला जाणार नाही. हे वाटण वाटताना मी जवळजवळ अर्धा कप पाणी वापरले.
- आता या मसाल्याच्या गोळ्यात सारे कोरडे मसाले जसे की हळद, लाल मिरचीची पूड , धणे पावडर , गरम मसाला आणि मीठ घालून घ्यावे . वांग्यात भरण्यासाठी हा मसाला तयार झाला
- वांगी मिठाच्या पाण्यातून काढून त्यात हा मसाला दाबून भरावा .उरलेला मसाला आपण भाजीत वापरणार आहोत .
- कढईत दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम होऊ द्यावे, तेल गरम झाले की त्यात उरलेला चिरलेला कांदा घालावा आणि चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा .कांदा परतून झाला त्यात वांगी घालून मध्यम आचेवर दोन-तीन मिनिटं परतून घ्यावी .वांगी हलवत राहावीत नाहीतर एका बाजूने करपू शकतात.
- नंतर बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि उरलेल्या मसाल्याची गोळी घालावी, छान एकत्र मिसळून घ्यावे. नंतर वांगी शिजण्यासाठी त्यात जवळजवळ दीड ते दोन कप गरम पाणी घालावे
- गॅस मंद करून ,झाकण घालून पंधरा ते वीस मिनिटं शिजू द्यावे . वांगी शिजली की गरमागरम पोळी ,फुलका किंवा भाकरी सोबत वाढावीत. अप्रतिम लागतात!

Leave a Reply