कडधान्यांची उसळ आणि सांबार हा कोकणस्थांचा आवडीचा विषय!
आठवड्यातले किमान 3 दिवस तरी कार्यक्रम ठरलेला , कडधान्ये भिजवणे , चाळणीत काढणे किंवा आजीच्या जुन्या नऊवार सुती साडी मधून कापलेल्या चौकोनी कापडात बांधणे! म्हणजे चविष्ट उसळ खाण्यासाठी ही एवढी खटपट अगदी मनापासून केली जाते. आताशा मोड आलेले कडधान्ये किराणा दुकानापासून ते रस्त्यावर गोणपाट टाकून विकले जाते. नोकरदार महिलांसाठी हे सोइस्कर असले तरी मला वैयक्तिक रित्या स्वतः कडधान्यांचे मोड काढायला खूप आवडते. नैसर्गिक रित्या वाढणारी प्रत्येक गोष्ट मनाला भावून जाते, मग ते आपले बाळ असो , कुंडीतली जास्वंद असो की हे कडधान्यांचे मोड 🙂
आपल्या पैकी बर्याच लोकांना माहीत असावे पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आज मी इथे सांगू ईच्छीते की कुळीथ किंवा हुलगे हे कोकणात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे कडधान्य आहे , स्पेशली नाचणीच्या भाकरीबरोबर ! नाचणीची भाकरी आणि कूळथाची गरगरित भाजी हे एक प्रोटीन आणि फाइबर पॅक्ड अन्न आहे. वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी! मी ग्लोबल सूपर फुड च्या विरोधात नाही परंतु भारतात विशेषतः प्रांतीय खाद्य संस्कृतीत अनेक सूपर फुड्स आहेत , गरज आहे ती फक्त आपल्या आहारात त्यांचा कसा वापर करता येईल याचा विचार करण्याची! जास्त दूर नको हो जायला ,डोळे बंद करून एकदा आपले लहानपण आठवा की आजी आणि आई आपल्या साठी काय काय पौष्टिक बनवायच्या ते!
चला तर तुमच्यासाठी खास कोकणातली कुळथाची भाजी!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Cook time:
Total time:
Serves: 4-5

- 1 कप=200 ग्रॅम्स कुळीथ/हुलगे (horse gram)
- 2 मध्यम आकाराचे टोमॅटो 150ग्रॅम्स बारीक चिरून
- 3½ टेबलस्पून मालवणी मसाला
- 8-10 कढीपत्ता
- ¼ टीस्पून हिंग
- 1 टीस्पून हळद
- मीठ चवीप्रमाणे
- 2 मोठे कांदे 180 ग्रॅम्स लांब चिरून
- ½ कप ताजी कोथिंबीर
- ½ कप=50 ग्रॅम किसलेले सुके खोबरे
- 10-12 लसणीच्या पाकळ्या
- तेल
- सर्वप्रथम आपण कुळथाचे मोड काढून घेऊ. त्यासाठी कुळीथ थोडे साफ करून त्यात जर खडे असले तर काढून वेगळे करू. त्यानंतर कुळीथ 8 ते 10 तास पाण्यात भिजत ठेवू. कुळीथ पूर्णपणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालू. 10 तसानंतर पाणी काढून एका मलमल किंवा सूती कापडात कुळीथ घट्ट बांधून घेऊ. एका उबदार जागी हे बांधलेले कुळीथ किमान 24 तास ठेवावेत जेणेकरून त्यांना छान लांब मोड येतील.
- त्यांना मोड आले की कापडातून सोडवून एका ताटलीत पसरवून ठेवावेत जेणेकरून त्यांना थोडी हवा लागून ते कोरडे होतील. नाहीतर एक विचित्र आंबूस वास येतो कडधान्यांना !
- आता आपण मसाल्याचे वाटण करून घेऊ. सुके खोबरे तव्यावर कोरडे खरपूस करड्या रंगावर भाजून घेऊ . जवळ जवळ 3-4 मिनिटे लागतात मध्यम ते मोठ्या आचेवर. एका ताटात काढून थंड होऊ देऊ.
- त्याच तव्यात 2 टेबल स्पून तेल सोडू. तेल गरम झाले की लसूण घालून चांगली खरपूस रंगावर तळून घेऊ.
- साधारण 2-3 मिनिटांत लसूण तळली गेली की त्यात लांब चिरलेला कांदा तळून घ्यायचा आहे. मंद ते मध्यम आचेवर कांदा करडा होईपर्यंत 10 मिनिटे लागतात. कांदा चांगला तळला गेला तरच या वाटणाला एक खमंगपणा येतो. आता कोथिंबीर घालून मिसळून घेऊ. सगळ्यात शेवटी भाजलेले खोबरे घालून मिश्रण एक सारखे करून घेऊन गॅस बंद करावा. एका ताटात काढून पूर्ण थंड होऊ द्यावे.
- मिश्रण थंड झाले की मिक्सर मधे अगदी बारीक वाटून घ्यावे. वाटताना जवळजवळ ½ कप पाण्याचा वापर करून अगदी बारीक वाटावे.
- एका प्रेशर कुक्कर मधे 3 टेबल स्पून तेल गरम करून घ्यावे. तेल तापले की त्यात कढीपत्ता, हिंग, हळद घालून घ्यावी. जरा परतले की मालवणी मसाला आणि वाटण घालावे. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा परंतु जर कोरडा पडत आला तर वेळोवेळी 1-2 टेबल स्पून पाणी घालून परतावा जेणेकरून करपणार नाही.
- मिनिटे आपण मसाला परतला आहे. तेल सुटू लागल्यावर बारीक चिरलेले टोमॅटो घालावे, कुळीथ आणि मीठ घालून एकत्र ढवळून घ्यावे.कुळथाची भाजी शिजण्यासाठी 2 कप गरम पाणी घालावे. फार जास्त पाणी घालून भाजी पातळ करू नये. ही भाजी मसालेदार आणि घट्ट चांगली लागते. गरम पाणी घातल्याने भाजीच्या तापमानात फरक न पडता चव छान टिकून राहते. या भाजी ला मोठ्या आगीवर एक उकळी फुटू द्या. नंतर प्रेशर कुक्कर बंद करून शिट्या येऊ देणे.
- मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या येऊ देणे. कुक्कर पूर्ण थंड झाल्यावरच उघडणे आणि गरमा गरम कुळथाची भाजी तयार आहे. नाचणीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी उत्कृष्ट लागतेच पण भातासंगे खाताना बोटे चाखायला ना लागली तरच नवल!

Leave a Reply