माझा बाबा ना आईला कधीही अख्खे मसूर किंवा मसूर डाळी ची आमटी श्रावणात बनवू देत नाही , म्हणतो की मसूर डाळ आणि मसूर हे नॉन वेज आहे! तुम्ही पण गोंधळलात की नाही, आम्ही पण त्याला म्हणायचो की “अरे बाबा मसूर नाही आवडत तर तसे सांग ना उगाच शेंड्या लावू नको ! “ हे ऐकून माझ्याकडे बघून डोळे मिचकावतो ! माझा बाबा आहेच थोडासा खेळकर आणि विनोदी स्वभावाचा, स्वतःच्या नावाला जागलाय जणू “विनोद”!
तर माझ्या मित्र मैत्रिणींनो , आपल्याला झणझणीत खायला लईई आवडते, आणि अख्खा मसूर तर फॅवुरेट आहे, मसूरची आमटी , मसूर फ्राइ – ते पण झणझणीत कांदा लसूण किंवा सोलापुरी काळ्या मसाल्यातले … बस बस धार लागली तोंडाला ,,,
या लिस्ट मधे अजुन एक सामील झालीय पाककृती – अख्खा मसूर बिर्याणी ,ती पण मस्त कोळशाच्या धुनगार वाली! ऐकून एकदम जबराट वाटले ना , रेसिपी पण एकदम भारी आहे!! खात्रीने सांगते आवडेल तुम्हाला !
मला वाटले की आता हिवाळ्यातली गुलाबी थंडी सुरू झालीये तर स्वयंपाकघरात जास्त वेळ काढत बसण्यापेक्षा अशा वन पॉट डीशेस बनवा , प्लेट भरून घ्या आणि बसा की बाल्कनीत आवडते पुस्तक घेऊन , गरमागरम बिर्याणी खात.. !! कधीतरी दुपारी जर मित्र मैत्रीणींचा अड्डा जमवायचा असेल तरी पण ही बिर्याणी मस्त ऑप्षन आहे, भारी प्लान आहे ना.. काय म्हणताय ? घ्या तर मग ही रेसिपी चटकन !
Prep time:
Cook time:
Total time:
Serves: 4-5
- • 125 ग्रॅम्स अख्खा मसूर . मसूर २ तास किमान पाण्यात भिजवून ठेवावा.
- • 200 ग्रॅम्स लांबसडक दाण्याचा बासमती तांदूळ , किमान ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा.
- • 2 मध्यम आकाराचे कांदे लांब चिरून
- • 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून
- • 1 कप ताजी कोथिंबीर बारीक चिरून
- • 1 कप तळलेला कांदा
- • 4 बेडगी लाल सुक्या मिरच्या
- • 4-5 हिरव्या मिरच्या
- • 1-1/2 इंच आल्याचा तुकडा
- • 5-6 लसणीच्या पाकळ्या
- • 1 टीस्पून जिरे
- • ½ टीस्पून काळी मिरे
- • 1-1/2 टेबलस्पून धणे
- • 1 inch दालचिनी
- • 2 तमालपत्र
- • ½ tsp हळद
- • 4-5 लवंग
- • तूप
- • केशराचे धागे १/४ कप हलक्या गरम दुधात भिजवून
- • कोळशाचे २-३ तुकडे धुन गार साठी
- • तेल
- • मीठ
- • सर्वप्रथम बिर्याणीचा भात शिजवण्यासाठी एका कढईत १. ५ ते २ लिटर पाणी उकळत ठेवू . पाण्यात तमालपत्र, १ टीस्पून तेल, आणि पाण्याला खारट चव येईपर्यंत लागेल तेवढे मीठ घालून घेऊ जेणेकरून बिर्याणीत आपला भात फिका लागणार नाही. पाण्याला दणकून उकळी आली कि त्यात भिजवलेले तांदूळ घालून ते ९०टक्के शिजेपर्यंत शिजवावेत.
- • ४ ते ५ मिनिटांत मोठया आचेवर भात शिजतो. त्याचे पाणी गाळून एका चाळणीत भात निथळत ठेवावा आणि नंतर एका थाळीत किंवा परातीत पसरून थंड होऊ द्यावा.
- • मसूर शिजवण्यासाठी एका प्रेशर कुकर मध्ये मसूर, हळद , मीठ आणि मसूर बुडेल इतकेच पाणी घालून मध्यम आचेवर १ शिटी येईपर्यंत शिजवावेत.
- • कुकर थंड होईपर्यंत मसाल्याचे वाटण करून घ्यावे. एका मिक्सर च्या भांड्यात आले, लसूण, दालचिनी, जिरे, धणे , काळी मिरी , सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि लागेल तेवढेच पाणी घालून घट्ट आणि बारीक मसाला वाटून घ्यावा.
- • कढईत ४ ते ५ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. तेलात लांब चिरलेला कांदा घालून तो करड्या रंगावर येईपर्यंत परतून घ्यावा. मसाल्याचे वाटण घालून चांगले ३-४ मिनिटे परतून घ्यावा. मसाला परतला कि टोमॅटो आणि मीठ घालावे. टोमटो अगदी नरम होईपर्यंत शिजवावे. गरज वाटल्याड थोडे पाणी घालून हा मसाला परतावा नाहीतर कढईच्या तळाला लागून तो करपतो .
- • टोमॅटो शिजल्यानांतर मसूर घालून नीट मिसळून घ्यावे. गॅस बंद करून कढई खाली उतरवावी.
- • बिर्याणीचे थर लावण्यासाठी एका हंडीत तळाला आणि कडांना तूप लावून घेऊ. पहिल्या थरासाठी अर्धे मसूर, थोडा तळलेला कांदा , आणि अर्धा भात एका एकावर एक पसरवून घेऊ. थोडे केशराचे दूध घालून घेऊ, कोथिंबीर , तळलेला कांदा आणि थोडे तूप घालून घेऊ. हा झाला बिर्याणीचा पहिला थर तयार. अशाच प्रकारे दुसरा थर लावून घेऊ.
- • आता बिर्याणी ला धुन गार देऊ. गॅसवर मोठ्या आचेवर कोळसा पूर्णपणे पेटवून घेऊ. कोळसा लाल झाल्यावर तो एका वाटीत ठेवून त्यावर १ टेबलस्पून तूप आणि २-३ लवंग घालुन बिर्याणीच्या हंडीत वाटी ठेवून हंडी फक्त १ ते २ मिनीट झाकून ठेवू. त्यानंतर कोळशाची वाटी बाजूला काढून हंडीच्या झाकणावर मळलेली कणीक लावून सीलबंद करून घेऊ. हवे असल्यास अलुमिनिम फॉईल ने सुद्धा आपण हंडी बंद करू शकतो. झाकण ठेवून मोठ्या आचेवर २ मिनिटे बिर्याणी शिजू द्यावी.
- • एका बाजूला दुसऱ्या बर्नरवर आपण लोखंडाचा तवा मोठ्या आचेवर गरम करून घेतला आहे. २ मिनिटे मोठया आचेवर बिर्याणी शिजवल्यावर आपण हंडी तव्यावर ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे. मंद आचेवर बिर्याणी १० मिनिटे दम वर शिजवावी.
- • गॅसवरून उतरवून गरम गरम बिर्याणी कोणत्याही रायत्या सोबत वाढावी. रायत्याच्या रेसिपींसाठी रायता प्लेलिस्ट जरूर चेक करा.
Leave a Reply