
कोकण किनारपट्टी देशाच्या पश्चिमेकडची एक सुंदर हिरवीगार झालर .. गर्द वनराईने नटलेली , निळ्याशार समुद्राच्या उंच उंच लाटांचे तुषार झेलत किनाऱ्यावर वसलेली कौलारू टुमदार घरे ..
कोकण हा विस्तृत भाग गोव्यापासून , महाराष्ट्रातून ते कर्नाटकापर्यंत पसरलेला ! दर चार मैलागणिक भाषा बदलते तसेच पाणी देखील ! म्हणूनच खाद्यसंस्कृती एकच असली तरी पदार्थ बनवण्याची तर्हा , त्यात वापरले जाणारे घटकपदार्थ , हे त्या जागी पिकल्या जाणाऱ्या गोष्टींवर अवलंबून ! कुठे चिंच , कोकमांचा वापर जास्त तर कुठे कैरीची सुकली फोड जिभेवर आंबटपणा देऊन जाते ! नारळाचा वापर मुक्त हस्ताने आणि अंगणातला शेवगा सुद्धा ताटाची लज्जत वाढवतो ! पोर्तुगीज , सारस्वत , ब्राह्मण , भंडारी , मराठा , कुणबी , वाडवळ , कोळी , आगरी अशा न जाणो कितीतरी समाजांनी या कोकणरूपी हिऱ्यात कोंदण केले आहे !या प्रत्येक खाद्यसंस्कृतिचे संशोधन करायचे म्हटले तरी जन्म अपुरा आहे !
संगीता मराठे या उत्कृष्ट लेखिका , त्यांनी पाककलेवर अनेक पुस्तके लिहिली आहेत , एका मनोगतात त्यांनी स्वतःला आणि कोकणी माणसाला ” मत्स्यगोत्री” असे संबोधले आहे. अगदी चपखल उपमा ! कोकणी माणसांचे माशांवर किती प्रेम हे सांगायला नकोच … माझा बाबा तर गावातल्या मित्रांसोबत गप्पा मारायला बसला की नेहमी म्हणतो , ” इस्टेट गेली तरी बेहत्तर , ताटात माशाची तळलेली तुकडी दिसूंकच हवी , नायतर घास काय घशाखाली उतराचो नाय !”
खोटे नाही सांगत , पितृपक्षात माझी आई देवाज्ञा झालेल्या सासू सासर्यांना आणि तिच्या आईवडलांना देखील वाडी ( पितरांसाठी बनवले जाणारे सुग्रास जेवण ) बनवते . हे मुद्दाम सांगते , कारण ही गोष्ट मला कौतुकास्पद वाटते ! या वाडीत शाकाहारी पक्वाने बनवली जातात , परंतु कोकणात आमच्याकडे शाकाहारी वाडीसोबतच दुसरे ताट तयार होते त्यात आपल्या देवाघरी गेलेल्या माणसांना आवडणारे नॉन व्हेज देखील वाढले जाते , आणि तुम्हाला सांगायला नकोच यात माशांची तळलेली तुकडी , लाल चुटूक ताज्या माशांचे कालवण आणि भात वाढलेच जाते . कितीतरी वेळा माझा बाबा त्या काक महाराजांना किंवा महाराणींना जेवताना , स्वतःच्या आईबाबांचा उल्लेख करीत ” ताई सावकाश गिळ गे , अडकलं काटा घशात , ए शारदा ( माझ्या आईचे नाव ) अप्पांनी बघ कालवण भाताक तोंड लावलेन ” असे म्हणत आपल्या गंजीने डोळे पुसतो ! इतका हा कोकणी माणूस मत्स्यप्रेमी !
मला तर पहिल्यापासूनच रविवारची ओढ लागायची , आमची कोळीण मावशी सुरमई , पापलेट , कर्ली , तारली , बोयरे ,बोंबलाची भरलेली टोपली घेऊन आदल्या रात्री स्वप्नात यायची ! दुसऱ्या दिवशी रविवारी साडेनऊला येणारी कोळीण मावशी उशिरा आली तरी घड्याळाचा एकेक ठोका काळजाचा ठोका चुकवायचा !
कोकणात फिरायला जाणारे सुद्धा तिथला मत्स्याहार चुकवायची भूल करीत नाहीत ! जसे तळलेले मासे फेमस तसेच तिथली वेगवेगळ्या माशांच्या चवीचे कालवण आणि रस्से प्रसिद्ध ! माझ्या कोळंबीच्या रस्श्याचा विडिओ हिंदी चॅनेल वर टॉप ५ व्हिडिओस मध्ये येतो आणि मराठीतही तो थोड्याच काळात जास्त प्रसिद्ध झाला ! तोच विडिओ पाहून मला बऱ्याच जणांनी सुरमईच्या कालवणाची रेसिपी शेअर करा म्हणून सांगितले.. तीच रेसिपी आज आपण बनवूया अगदी माझ्या घरात बनते तशीच !
टीप :
हळदीत अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे मासे व इतर कच्च्या मांसाला हळद नेहमी लावावी त्यामुळे जिवाणूंची वाढ होत नाही.
कोथिंबिरीच्या देठांत आणि मुळांत पानांपेक्षा जास्त चव असते म्हणून मसाला परतताना किंवा चटण्या , सूप्स बनवताना देठे चिरून घालावीत , भन्नाट चव आणि ताजेपणा येतो
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ५०० ग्रॅम्स सुरमई , स्वच्छ धुऊन , मध्यम आकाराच्या तुकड्यांत कापून
- अर्धा टीस्पून हळद
- १ कप = १०० ग्रॅम्स ओला नारळ खवलेला
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला
- १ मोठा टोमॅटो = ८५ ग्रॅम्स , मोठे तुकडे करून
- २ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- १०-१२ लसणीच्या पाकळ्या
- २ टीस्पून बडीशेप
- १ टेबलस्पून धणे
- ८-१० बेडगी सुक्या लाल मिरच्या
- १ टीस्पून मोहरी
- १०-१२ कढीपत्ता
- ४-५ कोकम
- पाव कप कोथिंबीर बारीक चिरलेली
- तेल
- मीठ
- सुरमईचे मध्यम ते मोठ्या आकारात तुकडे करून घ्यावेत , म्हणजे कालवणात ते जास्त शिजून पसरत नाहीत . डोक्याकडचा भाग , कडेचे भाग हे मांसल नसले तरी कालवणाला मस्त चव देतात .
- तुकड्यांना हळद आणि मीठ लावून १५ मिनिटे बाजूला ठेवावे , त्यामुळे माशाचा दर्प कमी होण्यास मदत होते .
- एका मिक्सरच्या भांड्यात सुक्या बेडगी मिरच्या , आले , लसूण , धणे , बडीशेप , कांदा , टोमॅटो , काश्मीरी मिरची पूड , खोबरे , आणि पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
- एका कढईत ३-४ टेबलस्पून तेल गरम करावे . मोहरी व कढीपत्त्याची ची फोडणी करावी . वाटलेला मसाला घालावा , त्यासोबत थोडे कोथिंबीरीचे देठ चिरून घालावेत म्हणजे कालवणाला अप्रतिम चव येते . मसाला झाकून मंद आचेवर परतून घ्यावा म्हणजे मसाला कढईच्या बाहेर उडत नाही . मधेमधे ढवळत राहावा म्हणजे मसाला करपणार नाही .
- मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे . साधारण ३ कप गरम पाणी घालून व चवीपुरते मीठ घालून कालवणाला मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी .
- नंतर मासे घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे . मंद आचेवर झाकण घालून शिजवावे . मासे नाजूक असतात म्हणून कालवणात सोडल्यावर त्यांना जोरजोराने चमच्याने ढवळू नये , तुटतात ! ४ मिनिटे शिजवल्यावर कोकम घालावीत , थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि झाकण काढून २ मिनिटे शिजवावेत .
- सुरमाईचे कालवण तयार आहे , गॅस बंद करून झाकण घालावे . माशाचे कालवण अगदी गरम असताना वाढू नये , जरा वाफ गेली की मुरल्यावर वाढावे , चविष्ट लागते ! हे कालवण ज्वारीच्या/ नाचणीच्या / तांदळाच्या भाकरीसोबत आणि गरम भातासोबत वाढावे .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply