मागच्या आठवड्यात जिम मध्ये एक मैत्रीण बऱ्याच दिवसांनी आली होती . दिवाळीपासून जी तिने बुट्टी मारली होती , ती जवळ जवळ दीड महिन्याने काल उगवली .
दोरी च्या उड्या मारताना ५० उड्यांतच तिची विकेट पडली, वाढलेले २-३ किलो थोडा तर त्रास देणारच ना! मग काय आम्हा बायकांचं पुराण सुरु झाले कि कस घरच्या आणि ऑफिस च्या कामांमुळे आपले स्केड्युल बिघडते आणि गाडी परत रस्त्यावर यायला किती कष्ट घ्यावे लागतात वगैरे वगैरे! त्यातच आमच्या महिन्याभराच्या गप्प्या साचलेल्या ! दिवाळीत केलेली मजा , कोणी कशी दिवाळी साजरी केली ह्याचे फोटो दाखवण्यात वर्क आऊट नंतर जवळ जवळ तासभर गेला. मला माझ्या ट्रेनर ने अक्षरश: डोळे वटारले तेव्हा आम्ही दोघी जिम च्या बाहेर पडलो! हसून हसून पुरेवाट झाली. या टाईम पास मध्ये एक गोष्ट मात्र अगदी छान झाली बरं का!
मला आठवले कि वसुबारसेच्या दिवशी आम्ही दिवाळी च्या कपडे खरेदीला गेलो होतो आणि आधीपासूनच ठरवून खरेदीनंतर घराजवळच असलेल्या “करोल बाग ” या हॉटेलात गेलो. शक्यतो मी आणि पार्टनर जेव्हा दोघेच असतो तेव्हाच निरनिराळ्या रेस्टॉरंट मध्ये नवीन नवीन पदार्थ खाऊन बघतो. या वेळी सासू सासरे बरोबर होते , आणि त्यांची आवडनिवड मला आता पक्की माहीत झालीये . आम्ही मेनूचा किस न काढता आणि पर्यायी वेटरच्या हि डोक्याचे केस न गळवता पटकन ऑर्डर दिली . आमचे ह्या हॉटेल मध्ये वारंवार येणेजाणे असल्यामुळे हॉटेलच्या मॅनॅजमेन्ट शी बऱ्यापैकी ओळख आहे. २ मिनिटांत सूप , स्टार्टर्स आणि मेन कोर्स ची ऑर्डर घेतल्यावर वेटरही किंचित गोंधळला , आणि म्हणाला ” मॅडम, आज काही नवीन ट्राय नाही करणार , अजून काही … ” आणि जणू मला खिजवल्यासारखे हसत निघून गेला. म्हणजे आता बघा हे असच झाले ना ” हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है ” .. फणकाऱ्याने घेतले मेनू कार्ड परत हाती , आणि हे काय अर्रेच्या मी तर भात किंवा बिर्याणी मागवलीच नव्हती. मग काय शोधता शोधता एक छान बिर्याणीची ऑर्डर दिली , जी मी या आधी कधीही दिली नव्हती . माझ्या सासूबाईंना पनीर खूप आवडते , त्यांना म्हटले ” मम्मी पनीर मखनी बिर्याणी खाणार ?” त्या लगेच हो म्हणाल्या. . मग काय परत माझ्या वेटर भावड्याला बोलावून त्याला म्हटले ” दादा घ्या हि बिर्याणीची ऑर्डर, तुम्ही एवढा आग्रह केलातच आहे तर नवीन काहीतरी !” त्यानेही अगदी खेळकर पणे एका गालात हसून ऑर्डर घेतली.
या बिर्याणी बरोबर मी दाल धुन्गार मागवली होती , काय सांगू तुम्हाला इतके परफेक्ट कॉम्बिनेशन बसले होते ना , मखनी मसाल्यातले लुसलुशीत पनीर , लांबसडक बासमती तांदळाचा सुगंधी दाणा आणि कोळशाचा हलका तंदूर सुगंध . छान जमून आली होती मैफिल. आम्ही सगळ्यांनी बिर्याणीचा फडशा पाडला , फक्त दोन घास उरली होती तीही मी पॅक करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी खाल्ली. दिवाळीच्या गडबडीत आणि इतर रेसिपीस शूट करण्यात बिझी झाल्यामुळे मी जवळ जवळ विसरून गेले होते. माझ्या मॆत्रिणीमुळे माझ्या मनावर परत या स्वादिष्ट बिर्याणी ने ताबा घेतला.
३० डिसेंबर ला माझ्या पार्टनर चा वाढदिवस आहे आणि आम्ही त्याच्या ऑफिस च्या सहकाऱ्यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले आहे. तर होऊन जाऊ दे हि बिर्याणी , लगेचच रेसिपी ट्रायल चा घाट घातला, आणि पहिल्याच फटक्यात इतकी छान जमून आली ना कि आमच्या विठा ताईंनी आणि माझ्या एका मित्राने खाऊन पसंतीची पावती दिली.
आता इतकी छान थंडी पडली आहे तर एखादया रविवारी गरमागरम वाफाळलेल्या बिर्याणीचा बेत तर हवाच , हो कि नाही! तर माझ्या खवय्ये मित्र मैत्रिणींसाठी चविष्ट पनीर मखनी बिर्याणी !

- साहित्य:
- • 400 ग्रॅम पनीर
- • 1 तमालपत्र
- • चुटकीभर हळद (1/8th टीस्पून )
- • 3-टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- • ½-टीस्पून गरम मसाला पावडर
- • 1-टीस्पून धणे पावडर
- • 1-टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर
- • मीठ
- • ½-टीस्पून साखर
- • 1-टीस्पून कसूरी मेथी
- • 2-टीस्पून तूप
- • 2-टेबलस्पून फ्रेश क्रीम
- • बटर /लोणी
- • तेल
- भात शिजवण्यासाठी :
- • 1½ कप =300 ग्रॅम्स लांबसडक बासमती तांदूळ -पाण्याने स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा
- • 4 हिरव्या वेलच्या
- • 3-4 लवंग
- • 1 तमालपत्र
- • ½-इंच दालचिनीचा तुकडा
- कांद्याच्या मसाल्याच्या वाटणासाठी :
- • 1 मोठा कांदा चिरलेला = १०० ग्रॅम
- • 5-6 लसणीच्या पाकळ्या
- • 1½-इंच आले
- • 3 हिरव्या मिरच्या
- • 2-टेबलस्पून ताजी कोथिंबीर
- काजूच्या मसाल्याचे वाटण:
- • ¼th कप =18-20 काजू -गरम पाण्यात ३० मिनिटे भिजवून ठेवावेत
- टोमॅटोच्या मसाल्याचे वाटण :
- • 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून २०० ग्रॅम्स
- • ¼th-टीस्पून लवंग
- • ¼th-टीस्पून काळी मिरे
- • 1 इंच दालचिनीचा तुकडा
- • 1-चक्रीफूल
- • 1-टीस्पून जिरे
- • 3 हिरव्या वेलच्या
- • ¼th-टीस्पून जावित्री
- बिर्याणीच्या थरांसाठी :
- • ¼th कप ताजी कोथिंबीर बारीक चिरून
- • ½ कप तळलेला कांदा
- • थोडे केशराचे धागे २ टेबलस्पून हलक्या गरम दुधात भिजवून
- कोळशाच्या धुनगार साठी:
- • 1 मोठा कोळशाचा तुकडा
- तयारीसाठी वेळ : 15 मिनिटे
- शिजवण्यासाठी वेळ : 45 मिनिटे
- किती जणांना पुरेल : 4 ते 5
- कृती:
- • सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी भात शिजवून घेऊ. मोकळा भात शिजवण्यासाठी आपण दीड कप तांदळासाठी सुमारे ५ पट पाणी म्हणजे ७ ते ८ कप पाणी उकळण्यासाठी ठेवू. पाण्याला उकळी आली कि त्यात लवंग, हिरवी वेलची, दालचिनी , तमालपत्र , २ टीस्पून मीठ , आणि १ टीस्पून तेल घालावे. तेलाच्या ऐवजी तूप हि घालू शकतो. तेल किंवा तूप घातल्याने भाताचा एकेक दाणा मोकळा राहतो आणि चिकटत नाही.
- • आता आपण पाण्यात भिजवलेले तांदूळ घालून घेऊ. मध्यम ते मोठ्या आचेवर तांदूळ ९० टक्के शिजेपर्यंत शिजू देऊ. भात शिजत आला कि चाळणीत काढून मग एका मोठ्या थाळीत किंवा परातीत पसरवून घेऊ. असे केल्याने भात मोकळा राहतो.
- • आता मसाल्यांच्या वाटण्याच्या तयारीला लागूया. टोमॅटो पेस्ट साठी एका कढईत टोमॅटोच्या फोडी घालून घेऊ. त्यातच हिरवी वेलची, जावित्री, जिरे, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, काळे मिरी घालून घेऊ. अर्धा कप पाणी आणि साखर हि मिसळून घेऊ. या मिश्रणाला मोठ्या आचेवर एक उकळी फुटू देऊ. उकळी आल्यावर याच मंद करून , झाकण घालून शिजू देऊ.
- • टोमॅटोंना १५ मिनिटे शिजवल्यावर ते अगदी नरम होतात. गॅसवरून उतरवून त्यांचे पाणी गाळून हा मसाला थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर याची अतिशय थोडे पाणी घालून घट्ट आणि अगदी बारीक पेस्ट वाटून घेऊ. ज्या पाण्यात टोमॅटो शिजवले होते त्याच पाण्यात पेस्ट वाटून घेऊ.
- • आता आपण कांद्याचा मसाला आणि काजूची पेस्ट करून घेऊ. कांद्याच्या मसाल्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कांडा, कोथिंबीर, आले, लसूण, आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक वाटून घेऊ. यासाठी आपण फक्त १ टेबलस्पून पाणी वापरले आहे. हा झाला कांद्याचा मसाला. काजूंना गरम पाण्यातून काढून त्यांचीही एक बारीक पेस्ट वाटून घेऊ.हि पेस्ट वाटतानाही आपण १ टेबलस्पून पाण्याचा वापर केला आहे.
- • तिन्ही पेस्ट्स तयार झाल्या आहेत. आता आपण कढईत ४ टेबलस्पून तेल घालून पनीर चे तुकडे तळून घेऊ. मंद ते मध्यम आचेवर १० मिनिटे तळल्यानंतर पनीरचा रंग सोनेरी होतो. पनीरला एका ताटलीत काढून घेऊ.
- • त्याच कढईत आणखी २ टेबलस्पून तेल घालून घेऊ. १ टेबलस्पून बटर घालू. हि मखनी ग्रेव्ही असल्यामुळे यात बटर वापरले जाते. तेल आणि बटर गरम झाले कि त्यात तमालपत्र, कांद्याचा मसाला , आणि हळद घालून परतून घेऊ.
- • हा मसाला आपण मध्यम ते मोठ्या आचेवर ५ मिनिटे परतून घेतला आहे. मसाल्याला तेल सुटू लागले कि त्यात लाल मिरची पूड,गरम मसाला , जिरे पावडर, आणि धणे पावडर घालून घेऊ. मसाला चांगला परतून घेऊ. परतताना मसाले करपू नये म्हणून थोडे पाणी घालून परतावेत.
- • ३-४ मिनिटे परततल्यानंतर टोमॅटो पेस्ट घालू. काजूची पेस्ट देखील घालून घेऊ. काजूची पेस्ट घालण्यापूर्वी त्यात २ टेबलस्पून पाणी घालून पातळ केल्यानंतरच घालावी नाहीतर मसाल्याच्या गुठळ्या पडतात . चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. हे सारे मसाले झाकून चांगले शिजवून घेऊ.
- • आपण तब्बल ६ मिनिटे मसाला परतून घेतला आहे . आता १/४ टीस्पून साखर घालून घेऊ. पनीर चे तुकडे घालून मसाल्यात मिसळून घेऊ. १/२ कप पाणी घालून मंद आचेवर २ मिनिटे शिजू देऊ.
- • २ मिनिटांनंतर झाकण काढावे. ह्यापेक्षा जास्त आपण हा मसाला शिजवणार नाही कारण बिर्याणी च्या थरांसाठी आपल्याला एवढ्या मसाल्याची गरज आहे. सगळ्यात शेवटी आपण घालू भाजलेली कसूरी मेथी पावडर आणि २ टेबलस्पून क्रीम . एकत्र मिसळून गॅस बंद करू.आता बिर्याणीचे थर लावून घेऊ.
- • एका मोठ्या बिर्याणी हंडीला तळाला आणि कडांना तूप लावून घेऊ. पनीर ची अर्धी ग्रेव्ही हंडीत घालू. त्यावर थोडा तळलेला कांदा घालू. भाताचा अर्धा भाग त्यावर पसरून घेऊ. भात शिजवताना घातलेले अक्खे गरम मसाले काढून बाजूला ठेवावेत जेणेकरून ते खाताना दाताखाली येणार नाहीत. थोडे केशराचे दूध घालून घेऊ. या भातावर तळलेला कांदा आणि चिरलेली कोथिम्बिर पसरवून घेऊ. हा झाला बिर्याणीचा पहिला थर तयार. अशाच प्रकारे दुसरा थर हि लावून घेऊ.
- • बिर्याणीचे थर लावून झाले कि आपण कोळश्याच्या धुन्गार ची तयारी करू. गॅसवर मोठ्या आचेवर कोळसा पूर्णपणे पेटवून घेऊ. कोळसा लाल झाल्यावर तो एका वाटीत ठेवून त्यावर १ टेबलस्पून तूप घालुन बिर्याणीच्या हंडीत वाटी ठेवून हंडी फक्त ३० सेकंद ते १ मिनिट झाकून ठेवू. त्यानंतर कोळशाची वाटी बाजूला काढून हंडीवर अलुमिनियम फॉईल पसरवून हंडी सीलबंद करून घेऊ. हवे असल्यास कणकेच्या गोळ्याने सुद्धा आपण हंडी बंद करू शकतो. झाकण ठेवून मोठ्या आचेवर ३ मिनिटे बिर्याणी शिजू द्यावी
- • एका बाजूला दुसऱ्या बर्नरवर आपण लोखंडाचा तवा मोठ्या आचेवर गरम करून घेतला आहे. ३ मिनिटे मोठया आचेवर बिर्याणी शिजवल्यावर आपण हंडी तव्यावर ठेवून बिर्याणीला दम द्यायचा आहे. मंद आचेवर बिर्याणी ७ मिनिटे दम वर शिजवावी.
- • गॅसवरून उतरवून गरम गरम बिर्याणी कोणत्याही रायत्या सोबत वाढावी. रायत्याच्या रेसिपींसाठी रायता प्लेलिस्ट जरूर चेक करा.

Leave a Reply