
माझ्या अमेरिकेतल्या ऑनसाईट ट्रीपमध्ये बऱ्याच रेस्टॉरंट्स ना भेट द्यायचा योग आला . तसे माझ्या खादाड स्वभावामुळे माझे प्रत्येक खाद्यसंस्कृतीशी पटकन गट्टी होते , परंतु एक दिवस हॉटेलात जायचे म्हणून छातीत धडकीच भरली .
कारण ही तसेच होते ,,,साऱ्या ऑनसाईट टिमसोबत लंच ठरले मेक्सिकन रेस्टोरंटला ! आता आली का पंचाईत , उगाच आव नाही आणत, पण फक्त नूडल्स काट्या चमच्याने खाता येतील एवढेच माझं कौशल्य , आणि तिथे माझे फॉरेनर सहकारी आपल्या इथला मसाला डोसा सुद्धा इंडियन रेस्टोरंट मध्ये काट्याने खातात … आम्हाला इन्फोसीस मध्ये तसे कुठल्या देशात कसे वागावे , तिथल्या राहणीमानाचा आढावा , खाण्याच्या टेबलावरच्या पद्धती यांचे ट्रेनिंग दिलेच जाते .. आता ते प्रत्यक्ष वापरण्याची वेळ आली होती !
रेस्टोरंट मध्ये गेल्यावर हे लांबलचक टेबल, आणि आमची पूर्ण टीम त्यावर स्थानापन्न झाली , एवढ्या माझ्या अमेरिकन सहकाऱ्यांमध्ये मी आणि माझे मॅनेजर असे दोघेच भारतीय ! ऑफिस मध्ये गप्पा, मजा , चेष्टा यांत अमेरिकन खरंच फार प्रेमाने वागवतात , हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . पण मला मात्र दडपण आलेलं,, जेवणाच्या ऑर्डर्स देताना सुद्धा मी बावळटपणा केलाच ,, माझ्या मॅनेजरना म्हटले की एवढे काही मी एकटी खाऊ शकणार नाहीये , आपण दोघे शेअर करू , झाले सगळेच मुसळ केरात ! त्यांनी मला डोळ्यांनीच दटावले , ते समजून मी गपच राहिले . नंतर हळूच त्यांनी समजावले की तिकडे असे सूप दोघांत एक , नूडल्स चारजण मिळून खातायेत असे नाही करत ! तू आपल्याप्रमाणे ऑर्डर देऊ शकतेस , मग मी त्यांनाच विनंती केली की तुम्हीच ऑर्डर करा , तसे हि माझी पहिलीच वेळ होती मेक्सिकन खाण्याची !

मग सर्व्हर ने ” युअर फहिता , मेक्सिकन राईस अँड बीन्स ,माय प्रीटी लेडी ” असे म्हणून गोड हसत, समोर ठेवलेले अन्न आणि त्याचा दरवळलेला सुवास माझ्याही शंकित चेहऱ्यावर नकळत हसू फुलवून गेला . त्यातून त्याने ” प्रीटी ” म्हटल्याने तर अजूनच मनात आनंदाने उकळ्या फुटल्या! त्या फहिताची आणि मेक्सिकन क्रीमी बीन्स ची चव मी आजतागायत विसरलेले नाही , त्याचबरोबर आलेला तो मेक्सिकन राईस बाउल म्हणजे अगदी मळ्यात गेल्यावर कसे रंगीबेरंगी भाज्यांनी सजलेला मळा दिसतो ना , तसा तो सुंदर पोर्सिलीनचा बाउल , त्यात काठोकाठ भरलेला , ताज्या भाज्यांनी वेढलेला , चमकदार भात , मधूनच डोकावणारे किडनी बीन्स म्हणजेच आपला राजमा आणि ती हळूच वेटोळे घेत बाहेर निघणारी वाफ … !
खरं सांगू मनावर आलेले सारे टेन्शन निघून गेले , का कोण जाणे माझे अवघडलेपण निघून जाऊन खाण्यावर ताव मारतच माझ्या सहकाऱ्यांसोबत खेळकर संभाषणात कधी सहभागी झाले कळलेच नाही !

आज तुमच्यासोबत मला भावलेल्या मेक्सिकन राईस ची रेसिपी शेअर करणार आहे , याला स्पॅनिश राईस असे ही म्हटले जाते . टोमॅटोचा वापर केल्याने तसेच तांदळाचे दाणे तेलात परतून घेतल्याने हा लालसर रंगाचा म्हणून याला ” रेड राईस” (Spanish: arroz rojo) असे मेक्सिकोत म्हटले जाते . हा भात बनवायला खरंच सोप्पा आणि तो आपण प्रेशर कुकर मध्ये बनवणार आहोत ,म्हणजे सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा चटकन बनतो .
मुलांच्या डब्यांसाठी किंवा झटपट लंच साठी नेहमीच्या खिचडी किंवा पुलावाला सुट्टी देऊन मेक्सिकन राईस आपण बनवू शकतो प्रेशर कुकर मध्ये अगदी झटपट !

- १ कप = २०० ग्रॅम्स लांब दाण्यांचा बासमती तांदूळ , स्वच्छ धुऊन ३० मिनिटे पाण्यात भिजवून त्यानंतर एका चाळणीत निथळून ठेवावा
- १ मोठा कांदा = १२५ ग्रॅम्स लांब चिरलेला
- पाव कप = २५ ग्रॅम्स मक्याचे दाणे
- अर्धा कप = ६० ग्रॅम्स भोपळी मिरची ( लाल /हिरवी) बारीक चिरून
- पाव कप = ६० ग्रॅम्स राजमाची दाणे उकडून
- ५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
- ४ हिरव्या मिरच्या लांब मध्ये चिरून
- अर्धा टीस्पून जाडसर कुटलेली काळी मिरी
- अर्धा टीस्पून ओरेगॅनो
- १ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून भाजलेली जिरे पावडर
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो १५० ग्रॅम्स प्युरी करून
- मीठ चवीनुसार
- तेल
- एका प्रेशर कूकरमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालून १-२ मिनिटे मंद आचेवर परतून घ्यावेत . त्यामुळे तांदूळ थोडे कडक बनतात आणि चमकदार सुद्धा .. असे तांदूळ शिजवल्यावर गाळ होत नाहीत . एका ताटात काढून घ्यावेत.
- २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. त्यात लसणाची फोडणी करून लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी . लांब चिरलेला कांदा घालून तो सुद्धा पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा .
- ३-४ मिनिटांनंतर मक्याचे दाणे , भोपळी मिरची, उकडलेले राजमा घालून फक्त ३० सेकंद घालून परतावे . आता मसाले - लाला मिरची पूड, जिरे पावडर, ओरिगानो , काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ घालावे. २० सेकंद परतून घ्यावे .
- टोमॅटोची प्युरी आणि हिरव्या मिरच्या ( किंवा आलापिनो मिरच्या ) घालून झाकण घालून मिनिटभर शिजू द्यावे .
- नंतर प्युरी एकत्र करून ह्यावी व त्यात तांदूळ घालावे. तांदळाच्या दुप्पट म्हणजेच २ कप पाणी घालावे. कूकरचे झाकण घट्ट बंद करून मोठ्या आचेवर शिजु द्यावे .
- साधारण ३ मिनिटे मोठ्या आचेवर कूकरमध्ये प्रेशर निर्माण होते . शिट्टी काढायची नाहीये . जसे शिट्टी येईल असे वाटतेय तेवढ्यात गॅस बंद करावा . वाफेत भात आतमध्ये शिजू द्यावा . प्रेशर थांबले की मगच कुकर उघडावा .
- रंगीबेरंगी भाज्या घालून बनवलेला हा पौष्टिक मेक्सिकन राईस डब्यासाठी किंवा झटपट लंच म्हणून खूप छान !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply