
रोज नाश्त्यासाठी,डब्यांसाठी काय बनवावे हा एक यक्षप्रश्न आपल्यासमोर नेहमी उभा ठाकतो. त्यातून जर घरातल्यांनी काही भाज्यांविरुद्ध बंड पुकारलेला असेल तर बोलण्याची सोयच नाही !
रोज चमचमीत बनवणे हे आरोग्याच्या दृष्टीने ही अस्वीकारणीय आणि वेळेच्या अभावामुळे ही अशक्य .. माझ्या मते अशा वेळी आपल्या पारंपरिक पाककृती खरंच मदतीला धावून येतात . आपल्या भारतात निरनिराळ्या प्रदेशांत अगणित ब्रेड पाककृती आहेत , आणि त्यासुद्धा बनवायला सोप्या, झटपट होणाऱ्या , स्वादिष्ट आणि आरोग्यास उपयुक्त सुद्धा ! मग तो दक्षिणेचा डोसा असो , पंजाबचे गुबगुबीत पराठे असोत , महाराष्ट्रातली धिरडी-थालीपीठे असोत की उत्तरेकडची लिट्टी असो!

मला लहानपणापासूनच न्याहारीत भाकरी दूध किंवा पोळीभाजी खायची सवय आहे, कारण नाश्ता भरपूर तर दिवस दमदार , अशी आमच्या घरची विचारसरणी! म्हणून मला न्याहारीत भरगच्च पराठे , इडली , डोसा नेहमी भुरळ घालतात . मेथीचे ठेपले हा गुजराती प्रकार माझा खूप आवडता .. एक तर ठेपले खाऊन खूप जड वाटत नाही , पचायला हलके आणि ते डब्यांतही घेऊन जाता येतात . ठेपले एकदा बनवले की ते २-३ दिवस तरी अजिबात खराब न होता तुम्ही खाऊ शकता !अमेरिकेत माझी एक गुजराती मैत्रीण शनिवारी किंवा रविवारी आठवड्याभरचे ठेपले एकदाच बनवून हवाबंद डब्यात ठेवायची -रोजच्या दुपारच्या जेवणासाठी ! ही रेसिपी तिनेच मला शिकवलेली …. आणि एक सांगू का तुम्हाला , जर तुमची बच्चा पार्टी मेथीच्या भाजीला नाक मुरडत असतील , तर हे ठेपले त्यांना गोड लोणच्याबरोबर किंवा टोमॅटो केचअप सोबत वाढा , बघा कसे चटकन संपवतील ! चला तर करूया सुरुवात !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १.५ कप = २२५ ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- १/४ कप = ३० ग्रॅम्स बेसन
- २ कप मेथीची पाने
- तेल
- ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १/२ टीस्पून हळद
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून साखर
- १/२ टीस्पून लाल मिरची पूड
- १/४ कप =६० ग्रॅम्स दही
- मीठ चवीप्रमाणे
- ठेपल्यांचे पीठ मळण्यासाठी एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात दही, साखर , मीठ ( १ टीस्पून किंवा चवीनुसार ) , हळद , लाल मिरची पूड , हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे. साखर पूर्ण विरघळली गेली पाहिजे . आता चिरलेली मेथीची पाने घालून नीट एकत्र करून घ्यावे.
- आता गव्हाचे पीठ, बेसन आणि १ टेबलस्पून तेल घालून नीट एकत्र मळून घ्यावे. हिरव्या पालेभाज्यांत भरपूर पाणी असते , म्हणून पीठ मळताना जास्त वरचे पाणी घालू नये . नाहीतर मळलेली कणिक ओलसर होते आणि ठेपले लाटायला कठीण होतात . जास्तीतजास्त पाव कप पाणी वापरून कणिक घट्ट मळावी . कणिक १० मिनिटे झाकून ठेवावी.
- १० मिनिटांनंतर कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. गव्हाच्या पीठावर ठेपले गोल आणि पातळ लाटून घ्यावेत.
- मोठ्या आचेवर तवा चांगला तापवून घ्यावा . नंतर आच माध्यम ठेवून त्यावर ठेपले दोन्ही बाजूंनी खरपूस तेल लावून भाजून घ्यावेत. एक ठेपला भाजून घ्यायला जास्तीतजास्त २ मिनिटे लागतात !
- हा स्वादिष्ट नाश्ता गुजराती मेथी ठेपला कैरीच्या गोड लोणच्याबरोबर ( गुजराती चुंदा ) किंवा लिंबाच्या गोड लोणच्यासोबत, दह्यासोबत , चटणीसोबत किंवा नुसतेच खायला ही फार छान लागतात ! डब्यासाठी तर उत्तमच !
Leave a Reply