इंस्टाग्रामवर आईस्क्रीम , सरबते , कुल्फी या सगळ्यांचे जणू पीक आलय ! प्रत्येक फूड ब्लॉगर आपापल्या क्रिएटिव्हिटी प्रमाणे सुंदर सुंदर रेसिपीस बनवून फोटो टाकत आहेत . हा उन्हाळाच इतका असह्य झाला आहे , मे महिना सरता सरेना ! आणि त्यात पोटातला ज्वराग्नि मंदावलेला , खाण्यापेक्षा जास्त तहान वरचढ! लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत या कडाक्याच्या गरमीने सगळ्यांचा घाम काढलाय !
आमच्या गल्लीत ना रोज दुपारी गाड्यावर कँडी विकणारा घंटी वाजवत येतो ! त्याची दुपारची ती २ वाजताची वेळ ठरलेली .. सगळी लहान मुले आणि हो त्यांच्या आज्यासुद्धा त्याच्याकडून विविध रंगांच्या कॅण्डीज विकत घेतात , ऑरेंज कँडी, मँगो कँडी आणि स्ट्रॉबेरीसुद्धा ! अशा तापलेल्या दुपारी ती बर्फाळ गोड कँडी सुर्र्प सुर्र्प करून चोखताना काय मजा येते , नाही का ? एक दिवस मी ही न राहवून हातातले काम सोडून गेले की कँडी खायला ! खूप भारी वाटले , मी अर्थातच माझे फेव्हरेट मँगो फ्लेवर घेतले होते..
तसे म्हटले तर या कॅण्डी किंवा पॉपसिकल्स मध्ये फळांच्या रसासोबत , थोडी साखर आणि पाण्याचा अंश जास्त असतो म्हणूनच ते बर्फाळ लागतात ! बाहेर मिळणाऱ्या कॅण्डीज किंवा पॉपसिकल्स मध्ये थोड्याफार प्रमाणात खाद्य रंग वापरला जाण्याची शक्यता अगदीच नाकारू शकत नाही ! म्हणूनच आपल्या घरातल्या बच्चे कंपनीसाठी किंबहुना सगळ्यांसाठीच हे पॉपसिकल्स घरी बनवणे अगदी सोप्पे आहे . माझ्याकडे आईने पाठवलेले रत्नागिरी हापूस होते म्हणून मी हापूस आंब्याचे पॉपसिकल्स बनवले , तुम्ही कोणताही पिकलेला आंबा वापरू शकता .
आमच्या विठाताईंच्या घरी उन्हाळी सुट्टीत त्यांची भाचरे आली होती , त्यांना बोलावले होते मी पॉपसिकल्स खायला ! प्रचंड आवडली त्यांना ..
तुम्हीही करून पहा , आणि अभिप्राय कळवायला विसरू नका !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १.५ कप = ३०० ग्रॅम्स, ताज्या पिकलेल्या आंब्याच्या साली काढून बारीक फोडी ( हापूस/ केसर/बदामी आंबा घेतला तरी चालेल )
- ४ टेबलस्पून = ८० ग्रॅम्स साखर
- ३/४ कप = १९० ग्रॅम्स दही
- १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स ( नसल्यास वगळला तरी चालेल )
- कृती :
- मी हे पॉपसिकल्स बनवण्यासाठी हिप्पुसे आंबे वापरले आहेत . आंब्याच्या फोडी एका ब्लेंडरच्या भांड्यात घालून त्यातच साखर घालावी. आंब्याच्या गोडव्यावर साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आंब्याच्या फोडी आणि साखर एकत्र ब्लेंडरमधून फिरवून घ्यावे.
- ही प्युरी घट्ट असते , त्यात १/२ कप पाणी घालून परत एकदा ब्लेंडरमधून फिरवून घ्यावे. एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
- त्याच ब्लेंडरच्या भांड्यात दही आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र घुसळून घ्यावा . हे दही आंब्याच्या प्युरीत नीट चमच्याने एकत्र ढवळून घ्यावे .
- हे पॉपसिकल्सचे मिश्रण तयार आहे . साच्यांमध्ये भरून घेऊ . साच्यांमध्ये अर्ध्यापर्यंत मिश्रण भरून त्यात १-२ छोट्या फोडी आंब्याच्या घालू आणि वर परत साच्यांच्या पाऊण भागापर्यांतच मिश्रण भरून घेऊ. आंब्याच्या फोडींऐवजी स्ट्रॉबेरीचे, काळ्या द्राक्षांचे किंवा किवीचे तुकडे घातलेत तरी छान दिसतात !
- हे पॉपसिकल्स किमान ६ तासांसाठी किंवा जमल्यास पूर्ण १ दिवसासाठी फ्रिझरमध्ये सेट होण्यास ठेवावेत .
- थंडगार पॉपसिकल्स साच्यांमधून काढून सर्व करावे . बच्चे पार्टी तर जाम खूश होते !

Leave a Reply