
काही पदार्थांचे नाव घेतले ना की तो पदार्थ समोर नसला तरी माझी ज्ञानेंद्रिये अगदी टवकारून त्यांचा आनंद घ्यायला लागतात ! जसे आईने फोन वर फक्त म्हणायचं अवकाश की वालाचे बिरडे बनवतेय , आपोआप माझ्या जिभेवर बिरड्यात घातलेल्या रसाळ शेवग्याच्या शेंगाचा रस उतरू लागतो . माशांच्या रटरटणार्या कालवणाचा आवाज मनाला गुदगुल्या करून जातो !
तस्सेच आपल्या देशात पंजाब म्हंटले की सरसों दा साग और मक्के दी रोटी ,बिहारचा लिटी चोखा , गुजरातचा ढोकळा हे त्या त्या राज्याला जणू समानार्थी शब्दच झालेत . अगदी अभिमानाची गोष्ट … तसेच आपला महाराष्ट्र बऱ्याच खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध .. परंतु एक पदार्थ जो महाराष्ट्रीयन घराघरांत बनवला जातो तो म्हणजे पिठले! पीठ घाटून किंवा घोटून घेतलेले ते पिठले !

पिठल्याच्या निरनिराळ्या तऱ्हा , लसूण मिरचीच्या खर्ड्याचे पिठले , तव्यावरचे कोरडे पिठले , कुळथाच्या पिठीचे पिठले त्याशिवाय कोकणी माणसाचा पावसाळा सरत नाही ! आज मी जे पिठलं बनवणार आहे ते आहे हिरवया वाटणाचे पिठले जे मालवण रत्नागिरी भागात सर्रास बनवले जाते . असे म्हणतात की जे खाणे खाल्ल्याने तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो ते म्हणजे कम्फर्ट फूड , आणि हे पिठले भात खाताना मला माझे शाळेचे दिवस आठवतात . शनिवारची सकाळची अर्ध्या दिवसाची शाळा , ऑगस्ट महिन्यातला दिवस भर रिपरिप करणारा पाऊस , आणि घरी गरम गरम पिठले भात बनवून माझी वाट पाहत बसलेली आज्जी ! घरी आल्या आल्या हात पाय धुईपर्यंत लगबगीने ताटे करायला घ्यायची ! मस्त ऊन ऊन भात आणि त्यावर डावाने पिठले वाढतानाचे तिच्या हातातल्या त्या लाल काचेच्या सोनेरी ठिपक्यांच्या बांगड्यांची होणारी हलकी किणकिण ! माझे पोट भरून जेवण झाल्यावर माझ्या चेहऱ्यावरून फिरणारा तिचा प्रेमळ सुरकुतलेला हात !

हा असा अनुभव थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या व्यक्तींशी जोडले गेलेला असतोच ! आयुष्य जगायला अन्न , वस्त्र , निवारा यांखेरीज जर काही लागत असेल तर ती अशा आठवणींची शिदोरी !
आज आमचा प्लॅन आहे नेटफ्लिक्सवर नवी वेब सिरीज पाहायचा , म्हणून आमच्या दोघांच्याही आवडीचं पिठले भात बनवतेय !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १ कप = १०० ग्रॅम्स बेसन
- २ मोठे कांदे= २२५ ग्रॅम्स , पातळ लांब चिरून
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- २ टेबलस्पून जिरे
- दीड टीस्पून हळद
- ५-६ कढीपत्ता
- ६-७ हिरव्या मिरच्या
- अर्धा कप कोथिंबीर
- पाव कप किसलेले ओले खोबरे
- २ टेबलस्पून शेंगदाणे भाजून , साली काढून
- मीठ चवीनुसार
- तेल
- पिठल्यासाठी वाटण बनवून घेऊ. हिरव्या मिरच्या , शेंगदाणे, जिरे , लसूण , खबरे आणि कोथिंबीर व पाऊण कप पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
- एका बाऊलमध्ये बेसन, हळद आणि थोडे थोडे पाणी घालून बेसनाचे गुठळ्या न होऊ देता पातळ मिश्रण करून घ्यावे. मी दीड कप पाणी वापरले आहे.
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीपत्ता , कांदा घालून परतून घ्यावा. कांदा चांगला तांबूस झाला की त्यात वाटण घालून घ्यावे. १ कप पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटणात मिसळावे. मंद आचेवर झाकण घालून शिजवावे.
- वाटण चांगले शिजले की त्यात बेसनाचे मिश्रण हळूहळू घालून ढवळावे. नीट एकत्र झाले की त्यात साधारण साडेतीन कप पाणी घालून ढवळून घ्यावे. अजून पातळ हवे असल्यास पाणी घालू शकता . चवीनुसार मीठ घालावे.
- मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी. उकळी आली की आच मंद करून पिठले झाकण घालून शिजू द्यावे. मधून मधून ढवळत राहावे
- साधारण १२ मिनिटे पिठले आपण शिजू दिले आहे .
- गरम गरम पिठले . भातासोबत किंवा भाकरीसोबत वाढावे.
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply