
२०१९ मध्ये भर पावसाळ्यात जुलै महिन्यात आम्ही उभयतां माथेरानला फिरावयास गेलो . तसे लग्नाआधी मित्रमैत्रिणींच्या घोळक्यासोबत खूप वर्षांपूर्वी माथेरान फिरलो होतो , नुसता दंगा केला होता ! पुन्हा एकदा त्याच पावसाळी धुंद वातावरणाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार म्हणून आम्ही दोघे जाम खुश , त्यातून पुण्याहून ट्रेनचा प्रवास नी खिडकीजवळची जागा ! म्हणजे काळ्या मेघांनी गच्च भरलेल्या आभाळासारखे माझे मन आनंदाने शिगोशीग भरले होते . त्याच उत्साहात मी आमच्या प्रवासाचे काही फोटोज पटकन फेसबुक वर अपलोड केले . मित्रमैत्रिणींच्या खट्याळ, प्रेमळ कंमेंट्स ना रिप्लाय देत फिदीफिदी हसतानाच एका कंमेंटमध्ये मात्र उगाच जीव घुटमळला !
त्या व्यक्तीने विचारले होते ,” कुठे चाललात ?” , मी आपले उत्साहात ” माथेरानला ” म्हटल्यावर , ” हो का .. मला वाटले युरोपला !” असे म्हणून स्मायली टाकली होती . त्यातला खोचक उपहास न समजण्याइतकी दूधखुळी मी नक्कीच नाही ! माझ्या चेहऱ्यावरील हलकीशी अस्वस्थतेची रेष पार्टनरने पटकन हेरली , आणि त्याने म्हटल्याप्रमाणे , त्या व्यक्तीला क्षणाचाही विलंब न लावता , मी उत्तर खरडले , ” युरोपला जाईन तेव्हा देखील तुम्हाला नक्की सांगेन , तूर्तास लहानसहान गोष्टींत सुद्धा आनंद शोधावा ,अशी मला आईबाबांची शिकवण आहे , आणि तेच मी करतेय !”
आता हा ब्लॉग लिहायला घेतला तेव्हा नकळत हाच प्रसंग मला राहून राहून आठवत होता . माणसाला खरा आनंद , खरी तृप्ती , खरे समाधान कधी मिळते याच्या व्याख्या मनुष्यागणिक बदलतात ! कोणासाठी कोणता आनंद मोठा ,कोणता लहान हे तुम्ही आम्ही कसे ठरवणार हो ! सुखाचा क्षण पूर्णतः, कोणत्याही किंतु परंतु शिवाय जगला गेला म्हणजे झाले ..

मुंबईत आमच्या चाळीतल्या इवल्याशा घरात, हे सुखाचे , आनंदाने बागडायचे क्षण प्रत्येक रविवारी सकाळी सकाळी साडेनऊच्या ठोक्याला येणाऱ्या कोळीण मावशीच्या टोपलीतून यायचे . पहिल्या माळ्यावरून जिन्याचा बांबू पकडत वर धापा टाकत येणारी मावशी , ” ए बाय , आवशीक सांग कर्ली आणलीत , बापसाक सांग टोपलीला हात लावूक..” असे तिने म्हटल्यावर “आई ईईईई , मावशी आली ग …”. असे म्हणून मी धूम ठोकायचे . ती आमच्या दारावर पोचेपर्यंत बाबा तिच्या टोपलीला हात लावायला उभा ठाकायचा नी मी आजीच्या जुन्या नऊवारी साडीचे मोठे बारदान अंथरून तय्यार , म्हणजे मावशीची टोपली आमच्याकडे लँड व्हायला तयार ! ताज्या कर्लीचा शेपटा , सुरमईचा चंदेरी साज , पापलेटचा राजेशाही थाट हे पाहून ” आज खुश तो बहुत होंगे तुम ” या प्रश्नाला मी जोर्रात ” हां जी हां ” म्हणूनच उत्तर दिले असते !
कधी कधी आजी आणि बाबा सोबत मार्केटला जाणे व्हायचे . तिकडे तर चहूकडे सागरातला चंदेरी खजिना पसरलेला असायचा . तेव्हा मात्र कोळणीच्या समोर पांढऱ्या सनमाइक लावलेल्या लाकडी गल्ल्यावर नीटस रचून ठेवलेले लहान माशांचे वाटे नजर ढळू द्यायचे नाहीत. कधी कधी मोठे तळायचे मासे घेऊन झाले तरी त्या वाट्यांवरून नजर फिरवीत पुढे मागे घुटमळणाऱ्या मला पाहून एखादी नखशिखान्त नटलेली , दागिन्यांनी मढलेली मध्यमवयीन कोळीण माझ्या बाबाला हाक मारायची , ” ए दादा घे कि मांदेली चा वाटा , दहा रुपयाला लावलाय बघ .. ” मीही बाबाचे शर्टाचे टोक मागून जोरात खेचून त्याला विकत घ्यायला भाग पाडायचे . त्या कोळी दादांचे आणि कोळीण मावशीचे गिर्हाईकाला आपला माल विकण्याचे जे कसब असते ना त्याचे तर, मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात धडे घालायला हवेत , असे माझे स्पष्ट मत आहे . उगाच नाही , शाहीर विठ्ठल उमप यांनी इतके भन्नाट कोळीगीत आपल्या खर्ड्या आवाजात गायलेय , ” घेऊनशी जा रं ताजा ताजा , दादा ताजा ताजा , चिकना चिकना म्हावरा माझा !” आजीसोबत मासे आणायला जाणे म्हणजे एक शाळाच होती , कुठला मासा ताजा , कुठला नाही. हे नुसते पाहून ओळखायची , नी परेल बाजारातल्या सगळ्या कोळणी तिच्या ओळखीच्या ! कितीही आढेवेढे घेतले तरी तिच्या पिशवीत वीस रुपयांचा कर्दीचा( करंदीचा ) वाटा कोंबायच्याच , ” न्हाय म्हनू नकोस आज्जे , नातीस घाल खाऊक , पुढल्या खेपस तारली देईन , माझा पोरगा जाणारेय बोटीवर , नवीन घेतलेन हाय लोन काढून , काय सांगतास .. ” आता या वाट्यावरच्या माशांची गजाली चालल्याच आहेत तर आईची गम्मत सांगते हां .. माझ्या आईची निराळीच तर्हा .. तिला काटेरी माशांची लाल कालवणं नी सुक्की खूप आवडतात , तिचीच सवय मला जडलीय ! बुधवारी ऑफिसमधुन परतताना समोरच्या माहीम मासळी बाजारातून पावसाळी दिवसांत काळे मासे आणायची , तर कधी वेरल्या ( मोदक किंवा बिलज्या ) , तारली , बोयरे, जवळा असे वेगवेगळे मासे आणायची . मग त्या दिवशी झक्क पैकी झणझणीत लाल कालवण नी सोबत पाव अस्सा फर्मास बेत असायचा . आजही तो खिडकीतून कोसळणारा मुंबईचा पाऊस आठवतो नी गॅसवर रटरटणाऱ्या कालवणाच्या वाफा नाकाशी दरवळतात .

हे सगळे सांगायचे प्रयोजन हेच की एका कोकणी मत्स्याहारी कुटुंबात कधी काही कारणास्तव नेहमीच मोठे मासे खाणे शक्य नसले , तरीही ही वाट्यावर मिळणारी मच्छी पोट आणि मन तृप्त करून जायची . खर्च कमी तरीही तृप्ती पराकोटीची !हेच ते माझ्या किंबहुना एका खवय्याच्या वाट्याचे सुख !
आता फोफावलेल्या रेस्टोरंट संस्कृतीत मेनूवर मी वर सांगितलेले मासे मिळणे दुर्लभच ! म्हणूनच मला कोणी विचारले तर माझी पहिली पसंती या लहान किंवा काटेरी माशांनाच जास्त असते ! म्हणूनच माझ्या मासेवाल्याने त्याच्याकडे ताजी करंदी ( कोळंबीची पिल्ले किंवा लहान आकाराची कोळंबी ) आल्याचे सांगितल्यावर मी ‘आव ना देखा ताव ‘, त्याला १ किलो बाजूला काढून ठेवायला सांगितली ! ” म्याडम ताजी आहे हो , फक्त सोलून घेशाल घरी तुम्ही ,” या त्याच्या लोणीदार वाक्याला दुर्लक्ष करून मी ती १ किलो करंदी घेऊन हवेत तरंगतच घरी आले ! करंदीने जणू चेटूकच केले होते ना ! आणल्यावर मात्र ती सोलताना , ” करशील परत हावरट पणा , एक किलो कोणी घेते का , अर्धा किलोच घ्यायची ना ,” असे चरफडून स्वतःला इतके सुनावले ना मी , काय सांगू ! अहो ती सोलणे कठीण नाही हो , पण त्यांची संख्या इतकी जास्त असते एका किलोत , कि शेवटी मला बॅचेस मध्ये सोलून ठेवावी लागली . त्यानंतर जेव्हा जेव्हा मी ओंकार कडे गेले मासे आणायला , तेव्हा तेव्हा माझी चेष्टा करतो , ” म्याडम किती वेळ लागला हो करंदी सोलायला , खीखीखी … ” चालतंय , थोडं हलकं फुलकं ..! पण तुम्ही मात्र तुमच्या मासेवाल्याला विनंती करून सोलून द्यायला सांगा किंवा त्यांचे पहिल्यांदा वाटे करून स्वतः सोला म्हणजे वेळ लागणार नाही !

एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगते , या वेळेस आमच्या रत्नांग्रीसुन बाजारातून मी लंगडी घालत अर्रर्रर्रर्र , आपले विकत आणलीय .. अहो “लंगडी” म्हणजे कोकणात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे पसरट परंतु कमी उंचीचे पातेले . माशांची कालवण , सुक्के , आमटी यांसाठी उत्तम कारण लंगडी एक तर लवकर गरम होते , एकसंध गरम होते , तेल कमी लागते तसेच एकदा मासे पसरले की उलथाउलथी जास्त करावी लागत नाही जेणेकरून मासे न तुटता शिजतात !
तर आजचे माझे वाट्यावरचे मत्स्यप्रेम आवडले तुम्हाला तर नक्की खाली कंमेंटमध्ये अभिप्राय कळवा !


- साहित्य :
- अर्धा किलो करंदी ( लहान आकाराची कोळंबी / कोळंबीची पिल्ले ) - साफ करून , वजन साधारण २४० ग्रॅम्स
- अर्धा टीस्पून हळद
- मीठ
- अर्धा कप किसलेले सुके खोबरे - ५० ग्रॅम्स
- तेल
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- १ मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून = ७० ग्रॅम्स
- पाव कप कोथिंबीर
- १०-१२ कढीपत्ता
- १ लहान कांदा पातळ लांब चिरून = ५० ग्रॅम्स
- २ टेबलस्पून मालवणी मसाला ( नसल्यास दीड टेबलस्पून काश्मिरी/बेडगी मिरची पावडर + अर्धा टेबलस्पून गरम मसाला )
- १०० ग्राम टोमॅटो बारीक चिरलेले
- ३-४ कोकमं
- कृती:
- करंदी व्यवस्थित साफ करून घ्यावी. त्यासाठी तिचे डोके, शेपूट, मधले कवच नी पाय नीट अलगद हाताने काढून घ्यावेत . धसमुसळेपणा केला तर ती मधूनच तुटते . नंतर एकदाच पाण्यातून स्वच्छ धुऊन चाळणीत काढून घ्यावी .
- एका भांड्यात करंदीला हळद आणि मीठ लावून घ्यावे . दहा मिनिटे बाजूला ठेवावे.
- एका लंगडीत सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे आणि एका ताटलीत बाजूला काढून घ्यावे . त्याच लंगडीत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण घालावी . जराशी गुलाबी रंगावर आली की कांदा घालावा . कांदा खरपूस परतला की कोथिंबीर तेलातच परतून घ्यावी. मग शेवटी भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे वाटण पूर्ण थंड झाले की पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे .
- लंगडीत २ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात ताज्या कढीलिंबाची फोडणी करावी . लहान कांदा लांब चिरून घालावा . जरासा पारदर्शक झाला की त्यात २ टेबलस्पून भरून मालवणी मसाला घालावा . मसाला करपू नये म्हणून २ टेबलस्पून पाणी घालून परतून घ्यावे .
- आता वाटलेला मसाला घालून वरून अर्धा कप पाणी घालावे . मसाला चांगला मध्यम आचेवर झाकून शिजू द्यावा .
- साधारण दहा मिनिटांनंतर टोमॅटो घालावे व चवीपुरते मीठ घालून एकत्र करून घ्यावे . झाकण घालून टोमॅटो पूर्ण शिजू द्यावे .
- ७-८ मिनिटांनी करंदी घालावी आणि हलक्या हाताने चमच्याने वर खाली मसाल्यात करून घ्यावी . फक्त २ मिनिटे शिजण्यास पुरेसे आहेत . त्यानंतर कोकमं पिंजून घालावीत आणि एकत्र ढवळून घ्यावीत . फक्त १ मिनिट कोकमाचा रस करंदीत उतरू द्यावा . त्यानंतर गरमागरम करंदी तांदळाची भाकरी , पोळी किंवा पावासोबत मिटक्या मारत खावी !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply