
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते , तिचे पंख लावून मन कुठल्याही गगनात उंच भराऱ्या मारू शकते ! असे वाचलेले कुठेसे आठवत आहे मला , आणि ते बऱ्याच अंशी खरही आहे . मनोविज्ञान म्हणते दिवस भराच्या थकव्यानंतर जर तुम्ही शांत डोळे मिटून आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थ आणि त्यांसोबत जुळलेल्या आठवणी जागवल्यात तर तुमचे मन एका पॉसिटीव्ह एनर्जी ने उत्साहित होते आणि तुमचा थकवा दूर पळून जातो !
याला मी बरे कशी अपवाद असेन हो .. कधी कधी असे विचार माझ्या मनात येतात की मला जर कोणी म्हटले या पृथ्वीतलावर तुझे काही तासच बाकी राहिले आहेत तर साऱ्या शेवटच्या इच्छा पूर्ण करून घे , तर बाकीचं माहित नाही पण माझी खादाडीची लिस्ट तयार आहे बरं का ! आणि त्यात आजच्या कोळंबीच्या रस्श्याचा नंबर अगदी वरचा लागतो हां …
लहानपणी बाबा बरोबर मासळी आणण्यास जाणे हा माझा रविवारचा ठरलेला कार्यक्रम , तिथे बाबा कोळणींशी हुज्जत घालेपर्यंत ,हो हो नीटच वाचलेत तुम्ही , शक्यतो बिचारे पुरुष तोल भाव करीत नाहीत , परंतु माझा बाबा मासे घेताना कोणालाच ऐकायचा नाही , रत्नागिरीतला माशांचा गाव म्हणून प्रसिद्ध असलेला मिऱ्या बंदरावरचा जन्म असा कसा गप्पा बसू देईल … कोळणीदेखील दादा दादा करीत थोडी विनोद मिश्रित हुज्जत घालीत . बाबाचा हात सोडवून मी मात्र विस्फारलेल्या डोळ्यांनी सारा शिवडी मासळी बाजार फिरत असे. बाबाची मासळी घेऊन झाली की तो बिचारा मी कुठे गायब झाले हे शोधत असायचा ! मग कोणत्या ना कोणत्या कोळणीपाशी , तिला कोळंबी सोलताना एकाग्रतेने पाहत उकिडवे बसलेली मी , आणि माझ्या बाजूला कोळंबीची डोकी खायला मिळतील या आशेने बसलेला गलेलठ्ठ बोका , हे अशा तर्हेचे दृश्य पाहण्याची माझ्या बाबाला सवय झालेली !

मला कोळंबी वर विशेष प्रेम , एकतर तिचा रस्सा बनवण्यात माझ्या आईसाहेब पटाईत , आणि तिच्या हातच्या कालवणाची चव भन्नाट , जिभेवर रेंगाळणारा स्वाद. दुसरे म्हणजे ही कोळंबी तुम्ही तळून खा, तंदूर मध्ये लावून खा , पुलाव आणि बिर्याणीत घाला अहो इतकेच काय पापलेट मध्ये भरून तळा , ती कधीच निराश करत नाही , चविष्टच लागते . फक्त तिला शिजवताना थोडे घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवावे लागते , जास्त शिजली तर तिचा रस निघून जाऊन थोडी चिवट बनते !

या कोळंबीच्या कालवणाची पद्धत रत्नागिरीकडची , आमचा भंडारी समाज हा पोर्तुगीज साम्राज्यात गोव्यातून रत्नागिरी , मालवण , कारवार अशा भागांत स्थलांतरित झाला . या विषयी कधी सविस्तर आपण बोलूच पुढल्या वेळेस … म्हणूनच या कालवणात किंबहुना आमच्या खाद्यसंस्कृतीवर गोवा तसेच मालवण भागात मिळणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्स चा प्रभाव जास्त ! कधी कोकम तर कधी चिंच , कधी सुके खोबरे तर कधी ताजा खवलेला नारळ ! आता याच कालवणात मी शेवग्याची शेंग आणि सालीसकट बटाटे वापरले आहेत , ऐकून नवल वाटेल तुम्हाला कदाचित, पण कोकणस्थांच्या दारात शेगलाचे ( शेवग्याचे ) झाड नसेल असे होणारच नाही ! परंतु बटाटा आणि झाडावरच्या ताज्या शेंगेचा रसाळपणा या कालवणाला एक वेगळीच चव देऊन जातो ! एक गोष्ट मात्र अतिमहत्त्वाची , ते म्हणजे कालवणासाठी वापरलेले कांदा , लसूण , सुके खोबऱ्याचे आणि कोथिंबीरीचे भाजलेले वाटण !
या वाटणाबाबत मी सविस्तर माहिती व्हिडिओत दिली आहे , नक्की पहा ! या वाटणाचा बेस वापरून अनेक कोकणी मालवणी पद्धतीच्या उसळ , आमट्या , कालवण बनवली जातात !
चला तर पाहूया ही रेसिपी ..
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ३०० ग्रॅम्स कोळंबी ( मध्यम आकाराची ) , स्वच्छ धुऊन , साफ करून , त्यांची काळी शीर काढून
- २ मोठे बटाटे = १०० ग्रॅम्स , सालीसकट चौकोनी मोठे तुकडे करून
- १ शेवग्याची शेंग ३-४ इंचाचे तुकडे करून
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स तुकडे करून
- १ मोठा टोमॅटो = १२५ ग्रॅम्स मोठ्या तुकड्यांत चिरून
- अर्धा कप कोथिंबीर
- पाऊण कप = ८० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- २-३ टेबलस्पून मालवणी मसाला ( तुमच्या तिखटाच्या चवीप्रमाणे )
- १०-१२ कढीपत्ता
- १० -१२ लसणीच्या पाकळ्या
- अर्धा लिंबाचा रस
- अर्धा टीस्पून हळद
- ३-४ कोकम
- तेल
- मीठ चवीप्रमाणे
- कोळंबीला हळद, लिंबाचा रस व मीठ चोपडून १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे.
- सुके खोबरे कढईत कोरडे खरपूस भाजून घ्यावे .
- त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून त्यात लसूण तळून घ्यावी . मग कांदा घालून खरपूस करड्या रंगावर तळून घ्यावा. त्यात कोथिंबीर चांगली परतून घ्यावी. मग भाजलेले खोबरे घालून एकत्र करावे , हे मिश्रण पूर्ण थंड करावे.
- थंड झाल्यावर अर्धा कप पाणी घालून बारीक गंधासारखे वाटण करून घ्यावे. तसेच टोमॅटोची प्युरी देखील वाटून घ्यावी.
- कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची फोडणी घालावी. आता गॅस मंद करून त्या तेलात मालवणी मसाला घालून परतून घ्यावा . करपू देऊ नये . आता वाटण घालून नीट परतून घ्यावे . मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत मसाला परतावा, गरज वाटल्यास थोडं पाणी घालून परतून घ्यावा .
- आता बटाटे आणि शेंगा घालाव्यात . १-२ कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर उकळी येऊ द्यावी . आच मंद करून ५-६ मिनिटे झाकून शिजवून घ्यावे.
- नंतर कोळंबी घालून एकत्र करून घ्यावी . झाकण घालून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवावी .
- मग टोमॅटोची प्युरी घालून काही मिनिटे कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यावी . ५ मिनिटे साधारण शिजल्यानंतर त्यात कोकम घालून चवीप्रमाणे मीठ घालावे . २ मिनिटे झाकण न घालता शिजवावे .
- कोळंबीचे कालवण तयार आहे , वाढण्याआधी जरा वेळ वाफ निघून गेली की मग वाढावे . तांदळाची भाकरी, आंबोळी , घावन किंवा भातासोबत अप्रतिम लागते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply