
“करंजी ग करंजी , तुझ्या पोटात सुखाचं ग सारण … तुला ग्रहण करताना खाणारा होई आनंदी , परंतु देणाऱ्याच्याही पदरात पडे आनंदाचे दान! म्हणूनच तुझ्या कडांना घालते ग वळणदार मुरड !”
करंजीला आपल्या हिंदू संस्कृतीत खूप मान ! माझी आजी म्हणायची , करंजीचा आकार हा सुख, वैभव आणि सुबत्तेचे प्रतीक आहे ! लक्ष्मी माता वैभवाची तर देवता, म्हणून करंज्या लक्ष्मीच्या अतिप्रिय . हे सगळे लिहिताना , आजही आजीची ती करंजीला नाजूक मुरड घालतानाची सडपातळ बोटे आठवतात !
लक्ष्मीपूजनाला ज्यांचा मान मोठा अशा ह्या करंज्या! करंजीच्या सारणात सुके खोबरे , तीळ , खसखस , ओले खोबरे , सुका मेवा , खवा असे वेगवेगळे घटक वापरून आणि वेलची- जायफळ युक्त सुगंधाने अतिशय उत्तम चवीचे सारण महाराष्ट्रात बनवले जाते . वरील आवरणासाठी रवा , मैदा , तांदूळ पिठी , गव्हाचे पीठ यांचा वापर आवडीनुसार केला जातो .

बरं या करंजीला नावेही एकदम प्रांताप्रमाणे रंजक.. आमच्याकडे कोकणात उकडीची तांदळाची करंजी किंवा चूण घातलेली ( ओले खोबरे नी गुळाचे सारण ) गव्हाच्या पिठाची तळलेली करंजी म्हणजे ” नेवऱ्या ” – गणपतीत एका प्रसादाला तरी बनतेच ! करंजीच्या सारणाला विदर्भात ” बाखर ” असे म्हणतात . राजमान्य राजर्षी रामचंद्र सखाराम गुप्ते यांच्या लेखणीतून १८७५ साली साकारलेलया ” सूपशास्त्र ” या ग्रंथात मेव्याच्या करंजीचा उल्लेख आढळतो , म्हणजे महाराष्ट्राला सुद्धा या करंजीची परंपरा लाभली आहे . या पुस्तकात मेवा म्हणजे द्राक्षे- अंजीर सारखी सुकवलेली फळे तसेच खव्याचा उल्लेख “मेवा” या वर्गवारीत केलेला आहे .

खव्याच्या करंज्या ज्याला उत्तर भारतात गुजिया म्हणतात आणि पूर्ण चंद्राप्रमाणे बनवलेली गोल आकाराची करंजी ” चंद्रकला ” म्हणून ओळखली जाते . गुजिया नी चंद्रकला , पाकात बुडवून तसेच पाकाशिवाय सुद्धा बनवल्या जातात ! याचीच एक गम्मत सांगते हां तुम्हाला ..
काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉगसाईट् वर मालपुआच्या रेसिपीवर दूर देशी स्थित एका वाचक मैत्रिणीचा सुंदर अभिप्राय आला , तिने ब्लॉग वाचून हरखून मला एक गमतीशीर ओळख दिली , ” मराठीने केला उत्तर प्रांतीय भरतार , आणि त्यात रमलेली आमची मराठी मुलगी !” ,, वाचून असे खुद्कन हसू आले , फुलपाखरासारखे बागडतच मी आईला आणि सासूबाईना फोन लावला !

माझ्या सासरी उत्तर प्रदेशात , काय विचारलेत ,” कौन शहर ? ” अहो ” इलाहाबाद ” ( आपल्या सिनेसृष्टीचे दैवत ” श्री अमिताभजी बच्चन ” तिथलेच , ह्यां .. त्यांच्याच इश्टाईल मध्ये ) धुळवड म्हणजे होळी फार मस्तीत मनवली जाते . गावदेवाच्या देवळातून पहाटे जो होळीचा आरंभ होतो ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत पाण्याने , पिचकाऱ्यांनी धुळवड साजरी होते. त्यानंतर अंघोळ करून रंगीबेरंगी कपडे घालून गावातील नातेवाईक , शेजारी पाजारी एकत्र कोणा घरी किंवा गावच्या पारावर . मंदिराजवळच्या मोकळ्या मैदानात येऊन फक्त गुलालाची होळी खेळतात ! गावातल्या स्त्रिया ढोलकी, डफलीच्या तालावर “फगुआ ” ही लोकगीते गातात ! होळी फाल्गुनातला सण म्हणून ही गीते ” फगुआ” .. आपण नाही का श्रावणातले झुले झुलताना श्रावणगीते गुणगुणतो , तस्सेच ! आता ह्या आनंदाच्या उत्सवात खाण्यापिण्याशिवाय थोडी ना मजा .. पाट्यावर वाटलेल्या ताज्या भांगेचा प्रसाद, थंडाई , मठरी आणि न विसरता खव्याच्या गुजिया म्हणजेच करंज्या! या गुजिया कधी पाकात बुडवलेल्या तर कधी नुसत्याच, खायला मात्र खूपच स्वादिष्ट !

या करंजीला ” करंजी ” का म्हणतात याचे स्पष्टीकरण आयुर्वेदात आढळते . करंज नावाचा वृक्ष पश्चिम घाटात वाढला आणि त्यानंतर तो आशियाई देशांपासून ते अगदी ऑस्ट्रेलिया अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला ! याच्या शेंगा आणि बिया आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ! या बियांतून काढलेले तेल त्वचारोगांवर गुणकारी म्हणून एखाद्या महारोग्याच्या झडलेल्या हातांना सुद्धा पुन्हा बोटे निर्माण होतील या अर्थाने ‘करं जनयति इति करंज’ असा उल्लेख आयुर्वेदात आढळतो (संदर्भ : wiki ) . तसेच करंज वृक्षाच्या बियांप्रमाणे आकार असल्याने या पक्वान्नाला ” करंजी ” किंवा “करजी ” असे नाव पडले असण्याची शक्यता आहे ! प्रथितयश लेखिका दुर्गाबाई भागवत यांचे “ऋतुचक्र” – मी आजवर वाचलेलया पुस्तकांतील सगळ्यात रंगीत पुस्तक , त्यातील चित्रांनी नव्हे हो .. तर वेगवेगळ्या ऋतूंत निसर्गाच्या कुंचल्याची जादुई रंगीत उधळण दुर्गाबाईंनी सुंदर शब्दांत टिपली आहे ! त्यांच्या ” वसंतहृदय चैत्र ” या पहिल्याच निबंधात बाईंनी लिहिलेय , ” करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते . अगदी नखाएवढी कळी ; करंजीच्याच आकाराची , पांढरी , हिरवा परकर नेसलेली…”
पाहिलंत ना , आपले पारंपरिक पदार्थ , आयुर्वेद आणि निसर्ग यांची सांगड कशी बेमालूम घातली गेलीय , थोडेसे खोलात गेलं तर या सगळ्यांची आपसातील गुंफण जाणवते ! मग पदार्थ बनवताना आपसूकच हे सगळे आठवून चेहऱ्यावर हसू नाही फुललं तरच नवल !
या दिवाळीत आनंदाची कारंजी फुलवणारी खव्याची करंजी नक्की बनवा !


- किती बनतील : २५-३०
- तयारीसाठी वेळ : ३० मिनिटे
- बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
- साहित्य:
- पारीसाठी साहित्य :
- २ कप्स = २५० ग्रॅम्स मैदा
- १ टेबल्स्पून रवा
- पाव कप = ५० ग्रॅम्स तूप
- २ टेबलस्पून दूध
- पाणी
- सारणासाठी साहित्य:
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स खवा /मावा
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स बारीक रवा
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स पिठीसाखर
- पाव कप = २५ ग्रॅम्स बारीक किसलेले सुके खोबरे
- १ टेबलस्पून बदाम
- १ टेबलस्पून चारोळी
- १ टेबलस्पून काजू
- १ टेबलस्पून मनुका
- ५-६ हिरव्या वेलच्या ( जाडसर कुटून )
- तूप
- कृती:
- एका परातीत मैदा , रवा नीट एकत्र करून घ्यावा .
- टीप : रव्यामुळे करंजीचे बाहेरील आवरण खुसखुशीत होते .
- तूप हलके गरम करून घ्यावे . हे तूप पिठात चांगले दोन हातांच्या तळव्यांनी चोळून घ्यावे . यामुळे करंज्या अतिशय तोंडात विरघळतील इतक्या खुसखुशीत बनतात ! अर्धा कप कोमट पाण्याने पीठ घट्टसर मळून घ्यावे . एका भिजवलेल्या सुती कापडाने हा गोळा किमान अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा.
- आता करंजीचे सारण बनवण्यासाठी एका पॅन मध्ये २ टेबलस्पून तूप गरम करून त्यात रवा सोनेरी रंगावर येईपर्यंत साधारण १० मिनिटे भाजून घ्यावा .
- त्याच पॅनमध्ये बदाम, काजू , आणि चारोळी साधारण २-३ मिनिटे भाजून घ्यावीत . थंड झाल्यावर मिक्सरमधून त्यांची जाडसर पूड करून घ्यावी .
- नंतर सुके खोबरे हलका खमंग सुगंध दरवळेपर्यंत भाजावे , रंग बदलू देऊ नये . बाजूला काढून ठेवावे .
- आता खवा हाताने कुस्करून ५ मिनिटे मंद आचेवर भाजावा . त्यात जरासा कोरडेपणा आला की आच बंद करावी .
- एका मोठ्या भांड्यात खवा , रवा आणि सुके खोबरे एकत्र करून घ्यावे . त्यात सुक्या मेव्याचा जाडसर कूट , वेलची पावडर , आणि बारीक चिरलेल्या मनुका घालाव्यात . तसेच पिठीसाखर सुद्धा मिसळून घ्यावी . आपले करंजीचे सारण तयार आहे .
- पीठ झाकून अर्धा तास झाला आहे . त्या पीठाचे ३ गोळे करून घ्यावेत . एक गोळा पोळपाटावर ठेवून , बाकीचे दोन गोळे रुमालाखाली झाकून ठेवावेत. म्हणजे कोरडे होणार नाहीत .
- गोळ्याला पोळपाटावर दाब देऊन दोन्ही हाताने चांगले मळून लांब वळ्याचा आकार द्यावा . सुरीने त्याचे एकाच आकाराचे लहान तुकडे कापून घ्यावे आणि एकेक गोळ्याला व्यवस्थित दाबून मऊसूत करून घ्यावे .
- एकेक गोळा पातळ लाटून पारी बनवावी . जाड पारी खायला चांगली लागत नाही .
- कडांना दुधाचे किंवा पाण्याचे बोट लावावे . मध्यभागी चमचा भरून सारण घालावे . सारण अंदाजे कमी जास्त करावे . कडांपर्यंत पोहूचू देऊ नये . नंतर अर्धचंद्राकृती आकारात दुमडून कडा नीट दाबून बंद कराव्यात .
- करंजीच्या कडा व्यवस्थित मुरड घालून नक्षीदार कराव्यात . साचा सुद्धा वापरू शकता किंवा कातणीने कडा चिरून काटेरी डिझाईन करू शकता .
- एकेक करंजी झाली की कापडाखाली झाकावी म्हणजे वातड होत नाही .
- करंज्या तळण्यासाठी कढईत करंज्या बुडतील इतके तूप घालावे . मध्यम आचेवर तूप तापवावे . तूप कडकडीत झाले तर करंज्या घालताक्षणीच करपतात .
- आच मंद करून करंज्या उलटून पालटून सोनेरी रंगावर तळाव्यात .
- साधारण एका करंजीला २ मिनिटे तळायला लागतात . तूप निथळून एका ताटात काढून घ्याव्यात .
- या करंज्या हवा बंद डब्यात ठेवल्या तर आठवडाभर टिकतात .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply