उन्हाळा आणि पाडाला लोंबकळणाऱ्या कैऱ्या हे एक अतूट नाते आहे ! सान-थोर सगळ्या वयोगटांशी कैरीचे सख्य ! हिरव्याकंच कैरीच्या फोडी , त्यावर लावलेले तिखट मीठ , कोणाला भुरळ नाही पडली तरच नवल !
हे लिहितानाही माझे दात आंबट झाले.. कोकणात घरोघरी उन्हाळ्याच्या दिवसांत कैरीचा वापर करून रोजच्या जेवणात काही ना काही पदार्थ बनवलाच जातो. मेथांबा, गुळांबा , कैरीचे ताजे लोणचे , पन्हे यांच्याबरोबरच कैरी घालून केलेली कढी , आमटी, वरण , चैत्रगौरीचा प्रसाद म्हणून डाळकैरी , कैरीचे सासव , अहो एवढेच काय आमच्या माशांच्या विविध प्रकारांतही कैरी घातली जाते – जवळ्याची कैरी घालून काय झक्कास चटणी होते म्हणून सांगू !
उन्हाळ्यात आमच्या घरी कैरीची चटणी ही फ्रिजमध्ये सर्रास आढळणारी गोष्ट , एकतर ती आंबोळी , इडली सोबत फारच चविष्ट लागते आणि दुपारच्या जेवणात नुसत्या वरण भाताबरोबर कधी खाऊन बघा , तोंडाला माझ्या पाणी सुटले राव!
आज आपण ही कैरीची चटणी दोन पद्धतींनी बनवणार आहोत, कैरी आणि नारळाची चटणी जी आंबोळी , घावन , इडली, मेदुवडा सोबत उत्तम लागते आणि दुसरी आहे कैरी पुदिन्याची गुळातली चटणी जी कचोऱ्या , बटाटेवडे , भजी , पराठे, ठेपले यांची सखी !
नक्की बनवून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- १ कप= १०० ग्रॅम्स किसलेलं ओले खोबरे
- २ मध्यम आकाराच्या कैऱ्या = १५० ग्रॅम्स
- ४-५ लसणीच्या पाकळ्या
- १ टीस्पून साखर
- ४ हिरव्या मिरच्या
- मीठ चवीनुसार
- तेल
- १०-१२ कढीपत्ता
- १/२ टीस्पून मोहरी
- १/२ टीस्पून चण्याची डाळ
- चुटकीभर हिंग
- १ मध्यम आकाराच्या कैऱ्या = १५० ग्रॅम्स
- १/२ कप पुदिन्याची पाने
- १/२ कप = ७५ ग्रॅम्स किसलेला गूळ
- १/२ टीस्पून हळद
- ४-५ लसणीच्या पाकळ्या
- १/२ टीस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर
- ४-५ हिरव्या मिरच्या
- मीठ चवीनुसार
- कैऱ्या स्वच्छ धुऊन , साली काढून , किसून घ्याव्यात . किसल्यानंतर त्यांचे वजन जवळपास ७५ ग्रॅम्स होते. एका मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, किसलेले खोबरे, लसूण, हिरव्या मिरच्या , साखर आणि मीठ घालून थोडे पाणी ( पाव कप ) घालून बारीक वाटून घ्यावे.
- चटणीला फोडणी देण्यासाठी २-३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात चण्याची डाळ घालावी. डाळ थोडी लालसर परतली कि त्यात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी होऊ द्यावी. ही फोडणी चटणीवर घालून मिसळून घ्यावी . चटणी तयार झाली.
- मिक्सरच्या भांड्यात किसलेली कैरी, पुदिन्याची पाने, लसूण, हिरव्या मिरच्या , हळद , जिरे पावडर , मीठ आणि किसलेला गूळ घालून घट्ट आणि बारीक चटणी वाटून घ्यावी. चटणी वाटताना १ टेबलस्पून पाणी मी वापरले आहे. फार पातळ करू नये. झाली चटणी तयार .
- या दोन्ही चटण्या हवा बंद बरणीत भरून ठेवल्यास फ्रिजमध्ये ८ दिवस टिकून राहतात !

Leave a Reply