
कोणत्याही जागतिक संकटापेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे ” रोज नाश्त्याला काय बनवायचे ” आणि त्यातून जर घरात लहान मुले , म्हातारी माणसे , आणि कोणी रोज आरोग्यमंदिर म्हणजेच जिम जाणारे असतील तर काही विचारायलाच नको ! प्रयेकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरतच !
आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे ब्रेड म्हणजे पोळ्या , भाकऱ्या, धपाटे , दशम्या यांची कमतरता नाही , तसेच नाश्त्यासाठी विविध प्रकारचे पोहे, उपमा , सांजा, वडे , यांचीही वानवा नाही . त्यातून पूर्वी महाराष्ट्र हा गुजरात , कर्नाटकाबरोबरचा एकच प्रांत असल्याने , त्याही खाद्यसंस्कृती इथे गुण्यागोविंदाने नांदतात , मग आपल्या नाश्त्यात कधी ढोकळा सजतो तर कधी दक्षिणेचे इडली ,डोसा !
सकाळचे पहिले अन्न म्हंजे आपली न्याहारी , ती जितकी पोटभर तितकीच पौष्टिक आणि बराच वेळ ऊर्जा देणारी असली पाहजे . मला स्वतःला पौष्टिक नाश्ता तर आवडतोच परंतु त्याला आपल्या भारतीयत्वाची एक किनार असली आणि पचायला हलका असला तर जास्त आवडतो . इडल्या , डोसे , आंबोळ्या , आडे ( हा कोकणी डोश्याचा प्रकार ) , घरी भाजलेलया चण्याच्या डाळीच्या भरड बेसनाचे व ओट्स पावडर घालून केलेले पोळे , ठेपले हे आमच्या घरात , ज्वारीच्या पिठाचे धिरडे हे आमच्या घरातल्या डेली फूड डायरीत नोंदवलेले !

कोकण किनारपट्टी ही गोव्यापासून सुरु होऊन पार कर्नाटकात पसरलेली ! आमच्याकडे तांदूळ आणि तांदळाच्या पदार्थांचा जेवणात समावेश जास्त .. ” आप्पे ” हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ , त्याचे मूळ नाव ” आप्पेड्डडे ” , दक्षिणेकडे कर्नाटकात याला ” पद्दु ” , तामिळनाडूत ” पानीयरम” , आंध्र प्रदेशात ” पोंगानलु ” अशा विविध नावानी ओळखले जाते .
कोकणात खास करून गोड आप्पे पसंत केले जातात , माझी आई तांदळाच्या पिठात गूळ खोबरे कालवून गोड आप्पे बनवते , तिची ही खास आवडती डिश ! आप्पे बनवायला सोप्पे परंतु कधी कधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ नसेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात , कसे? अहो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे ..
हा गव्हाचा रवा तब्येतीस अगदी फायदेशीर . एकतर पचायला हलका , आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ( ४४ ) हा ज्वारी आणि इतर धान्यांपेक्षाही कमी , फायबर युक्त म्हणून वजन कमी करण्यासाठी आणि मुख्यतः मधुमेहींसाठीही उपयुक्त ! हे आप्पे शिजवताना अगदी थोडे तेल लागते तसेच यात भाज्या घालून तुम्ही ते अजून पौष्टिक करू शकता . याचा सुंदर आकार मुलांनाही आकर्षित करतो व डब्यासाठी तर एकदम उत्तम पर्याय ! माझ्या आजच्या रेसिपीमध्ये मी काही टिप्सदेखील दिल्या आहेत , नक्की करून पहा .
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १ कप = २०० ग्रॅम्स रवा ( गव्हाचा )
- २ कप = ४०० ml ताक
- १ लहानकांदा = ६० ग्रॅम्स बारीक चिरलेला
- पाव कप = ६० ग्रॅम्स मटारचे दाणे ( फ्रोझन किंवा ताजे )
- पाव कप = ६० ग्रॅम्स किसलेले गाजर
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ताजे खोबरे
- १ हिरवी मिरची बारीक चिरून
- अर्धा टीस्पून मोहरी
- ५-६ कढीपत्ता बारीक चिरून
- पाव टीस्पून हिंग
- अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून मीठ
- तेल
- रव्याला हलके भाजून घ्यावे . आप्प्यांचे मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात रवा घालावा .त्यात खोबरे, कोथिंबीर , आणि ताक घालून चांगले ढवळून घ्यावे . गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत .
- फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . त्यात मोहरी हिंगाची फोडणी करून कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या परतून घ्याव्यात . नंतर कांडा घालून मऊ होईपर्यंत परतावा .
- कांदा मऊ झाला की त्यात किसलेले गाजर , मटारचे दाणे घालून शिजवून घ्यावेत . २ मिनिटांत भाज्या जरा शिजल्या की त्या आप्प्यांच्या मिश्रणात मिसळून घ्याव्यात . आता खाण्याचा सोडा , आणि मीठ घालून एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण झाकून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.
- दहा मिनिटांनंतर मोठ्या आचेवर आप्पे पात्र गरम करून घ्यावे . पात्रात अगदी थोडे तेल घालून घ्यावे . आच मंद करावी आणि साच्यांत आप्प्यांचे मिश्रण चमच्याने घालावे . झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे .
- ४ मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटून दुसऱ्या बाजूने ही कुरकुरीत शॅलो फ्राय करून घ्यावेत .
- गरम गरम आप्पे नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉस सोबत ही खायला देऊ शकता !
- रवा भाजून घेतल्यामुळे तो चांगला फुलतो आणि आप्पे सुद्धा कुरकुरीत बनतात .
- बाजारातून रवा विकत आणल्यानंतर तो भाजून एका हवाबंद डब्यात भरावा म्हणजे त्याला खवटपणा येत नाही आणि त्यात आल्या किंवा टोके पडत नाहीत !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply