
महाराष्ट्रात हिवाळ्याच्या दिवसांत हुर्डा भेळ हा एक अतिशय आवडीने खाल्ला जाणारा खाद्य पदार्थ आहे. एका अर्थाने याला चाट या सदरात आपण त्याची गणती करू शकतो, कारण हुरड्याचा मूळचा गोडवा, तिखट चटपटीत चटण्या आणि भरपूर शेव घालून बनवलेली हुरडा भेळ , बोटे चाटण्यास प्रवृत्त करतेच!
मागच्या डिसेंबर मध्ये मुंबईवरून येताना तळेगाव टोलनाक्यापासून मोठाले होर्डिंग्स लावले होते, आणि त्यावर लिहिले होते :
“थंडी म्हणजे नाताळची सुट्टी! हुर्डा , स्वेटर आणि शेकोटी!”
इतके छान लहान मुलांची स्वेटर कानटोपी घालून शेकोटीजवळ शेकत बसलेली कार्टून्स काढली होती ना त्या होर्डिंग्सवर .. आणि खाली ठळक अक्षरांत कुठल्यातरी रिसॉर्ट ची जाहिरात होती! पुण्यात हुरडा पार्ट्यांचे बोर्ड जागोजागी लागतात, जवळजवळ थंडीचे २ महिने तरी हुरड्याचा सीझन असेपर्यंत !
मला खरं तर लहानपणी कधीतरी मावशीच्या शेतावर पुण्यात हुर्डा खाल्लेला आठवतोय, पण त्या वेळेला त्या चवीचे महत्त्व नाही हो कळले! “मला नकु, मला नकू” करत आम्ही सगळी कार्टी शेतातले पेरू खायला पळालो! आजी ने तर धपाटा पण घातला होता पाठीत,कि “जे पिकतं ते खायला नको मेल्यांना , नुसती महागडी चाकलीटे द्या चघळायला ! ” आता आजीचे ते गाऱ्हाणं आठवले कि वाटते किती दूरदर्शी असतात ना हि आपली म्हातारी मंडळी! स्वतःच्या अनुभवांच्या जोरावर आणि तुटपुंज्या शिक्षणावर सुद्धा त्यांना निसर्गाच्या देण्याचे महत्त्व ठाऊक होते. “जे उगते तेच खावे” ही त्यांची जीवनशैली होती आणि आता डाएटिशिअन तरी वेगळे काय सांगतात हो !
” थिंक ग्लोबल , गो लोकल ” चा हा जमाना, उपलब्ध असलेले इन्ग्रेडिएंट्स वापरून जुन्या पाककृतींना नवीन आवरण लावायचे आत्ताचे दिवस! उपक्रम नक्की चांगला आहे , गरज आहे ती फक्त आपली खाद्यसंस्कृती विलयास जाऊ न देता नवं स्वीकारण्याची!

आता ह्या हुरड्याचेच बघा ना , गावी शेतात चुलीवर भाजलेल्या वांग्याच्या भरीताबरोबर , चटणी मिसळून खाताना हिवाळ्यातल्या पार्टीचा फील देतो कि नाही! दरवर्षी भीमथडी जत्रेत पोटभर हुरडा खाऊन मी जवळजवळ १ किलो विकत घेते आणि पुढचा एक आठवडा तरी सकाळी नाश्त्याला , हुरड्याच्याच पाककृती बनतात ! मग त्याची भेळ बनवा, भजी काढा किंवा सरळ मस्तपैकी खिचडी बनवा, त्याचा अंगचा स्वाद सगळ्या रेसिपीस चविष्टच बनवतो!
चला तर मग आज बनवूया हुर्ड्याची भेळ , एक सांगते हां मी यात ज्या तिळगुळाच्या रेवड्या घातल्यात , त्या मला आवडतात म्हणून , अगदी गावच्या जत्रेचा फील येतो ना म्हणून ! तुम्हाला नाही मिळाल्या रेवड्या तर नाही घातल्यात तरी चालेल!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- 250 ग्रॅम्स हुर्डा
- 1 मोठा कांदा बारीक चिरून
- 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून
- 1½ टेबलस्पून लसूण खोबरे चटणी किंवा चवीप्रमाणे
- 1½ टेबलस्पून शेंगदाण्याची चटणी किंवा चवीप्रमाणे
- 2 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
- 1 टीस्पून लिंबाचा रस
- मीठ चवीप्रमाणे
- शेव आवडीप्रमाणे
- तिळगुळाच्या रेवड्या आवडीप्रमाणे
- एक लोखंडी तवा मोठया आचेवर तापवून घ्यावा . नॉनस्टिक तव्याचा वापर केला तरी चालेल! आच मध्यम ठेवून थोडा थोडा हुरडा चांगला भाजून घ्यावा. हुरडा भाजताना त्याचा रंग बदलणार नाही याची दक्षता घ्यावी, नाहीतर त्याचा रसाळपणा कमी होऊन तो चिवट लागतो.
- भाजलेला हुरडा एका मोठ्या पसरट भांड्यात घेऊन त्यात लसूण खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी घालावी. त्यातच चिरलेला कांदा , टोमॅटो, लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावे.
- हुरड्याची भेळ तयार आहे , खायला देताना भरपूर कुरकुरीत शेव आणि सोबत रेवड्या द्यायला विसरू नका !
Leave a Reply