कर्नाटक खाद्य संस्कृतीत बंट समाजाचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या मांसाहारी जीवनशैलीने अनेक चविष्ट पाककृती भारतीय खाद्य संस्कृतीला दिल्या आहेत. चिकन घी रोस्ट हि अशीच एक अवर्णनीय चवीची डिश … तिचे शब्दात वर्णन कुठेतरी कमीच पडेल , म्हणून तिला एकदा चाखून बघायलाच हवे. ह्याच चिकन घी रोस्टचे आणि माझे नाते कसे जुळले , आज आलाय त्या आठवणींचा उमाळा !
“रेशमाच्या रेघांनी ,लाल काळ्या धाग्यांनी , कर्नाटकी कशिदा मी काढीला , हात नका लावू माझ्या साडीला … “ ! महाराष्ट्राचे कर्नाटकावरचे प्रेम, हे आशा भोसलेंच्या गोड आवाजात आपण ऐकलेच आहे आणि न जाणे किती वेळा गुणगुणलेलेही आहे! तसे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचे नाते म्हणजे , “तुझे माझे जमेना आणि तुझ्यवाचून करमेना “! अगदी सख्ख्या जिवाभावाच्या शेजारणींसारखी माया हि आपुली ! प्रेमाबरोबर हेवे दावे हे आलेच, असो! तर भौगोलिक दृष्ट्या वेगळ्या असलेल्या ह्या दोन बहिणी…. परंतु आचार विचार आणि संस्कृतीत अगदी मन जूळतात बर का यांची. उगाचच नाही आपल्या कोकणस्थांच्या आणि लिंगायतांच्या घरी एक तरी सून, इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे आलेलीच असते!
माझा कर्नाटकाशी पहिला संबध आला 2006 मधे- जेव्हा कॅंपस इंटरव्यू मधून इन्फोसिस साठी सिलेक्ट झाले आणि म्हैसूर मधे त्यांचे ट्रेनिंग सेंटर जॉइन केले. सहा महिने त्या अतिशय देखण्या कॅंपस मधे ट्रेनिंग पूर्ण केले. एका महाविद्यालयीन युवकाच आणि युवतीचे , एका परिपूर्ण जबाबदार प्रोफेशनल मधे रुपांतरणाचा प्रवास त्या कॅंपसने नेहेमीच बघितला आहे. 2016 मधे बरोब्बर 10 वर्षांनी , पॅशन पॅशन म्हणजे काय रे बुवा , हे उमगले आणि ते कशाशी खातात हे जाणून घ्यायला, आयटीची लठठ पगाराची नोकरी सोडून कर्नाटकातल्या मणिपाल येथे प्रसिद्ध असलेल्या हॉटेल मॅनॅजमेन्ट महाविद्यालयात १. ५ वर्षांचा ” पोस्ट ग्रॅजुएशन इन कलिनरी आर्टस् “चा अभ्यासक्रम पूर्ण केला.
या सबंध प्रवासात लक्षात राहिली , ती माझ्या वाट्याला आलेली कर्नाटकातली प्रेमळ माणसे आणि माझ्या जिभेचे चोचले पूरवणारी खाद्य संस्कृती! म्हणतात ना , प्रत्येक 5 किलोमीटरवर , जशी भाषा बदलते , तसे खाणेही बदलते. उडुपीचे सात्त्विक भोजन, दावणगिरीचा बेण्णे/लोणी डोसा आणि कुंदापूरचा मत्स्याहार आणि मांसाहार याला तोडच नाही! मी गोवन कोंकणी असूनही मँगलोरी कोंकणी खाद्य संस्कृतीच्या कितीतरी गोष्टी नव्या शिकायला मिळाल्या. तिथल्या बंट समुदायाच्या पाक कौशल्याचे तर , कर्नाटक संस्कृतीत झेंडे उभारले गेलेत! मी तर त्यांची फॅन आहे बुवा , आणि आज मी त्यांची एक खूपच प्रसिद्ध डिश चिकन घी रोस्ट शेयर करणार आहे.
जर तुम्ही मँगलोर कुंदापूर फिरायला गेलात आणि चिकन/क्रॅब/प्रॉन्स घी रोस्ट नाही खाल्ले तर नक्कीच एक घोडचूक ठरेल !
ही रेसिपी शेयर करण्यामागे एकच हेतू आहे की सध्या पुण्यात जी थंडी आहे ना त्यात चिकन घी रोस्ट नक्की बनवा. थोडी वेगळी रेसिपी आहे पण बनवायला खूपच सोप्पी आणि दिसायला तर, तुटून पडावी इतकी स्वादिष्ट! साजूक तुपात मसाला परतण्याच्या सुगंधाने शेजारीण नक्की डोकावेल की ,”काय स्पेशल आज?” तस हे घी रोस्ट नीर् डोसा किंवा भाताबरोबर खातात , पण मी ना आपल्या आंबोळींसोबत वाढले होते – काय झक्कास लागलं म्हणून सांगू ! हे इतक्या स्वादिष्ट मसाल्यातले चिकन घी रोस्ट या हिवाळ्यात खाऊन बघा आणि बोटे चाटत चाटतच मला तुमचा अभिप्राय कंमेंट सेक्शन मध्ये कळवा !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- ५०० ग्रॅम्स चिकन ( विथ बोन्स ) , स्वच्छ धुऊन आणि साफ करून
- ४-५ टेबलस्पून तूप
- ½ कप दही ( १२५ ग्रॅम्स )
- ½ टीस्पून हळद
- 1 टेबलस्पून लिंबाचा रस
- मीठ
- 1 टेबलस्पून चिंच
- 1.5 टेबलस्पून गूळ
- 10-12 कढी पत्ता
- घी रोस्ट मसाला बनवण्यासाठी : -
- 8 बेडगी सुक्या लाल मिरच्या
- 6 गुंटूर सुक्या लाल मिरच्या (गुंटूर नसेल तर कोणत्याही तिखट लाल मिरच्या वापरल्या तरी चालतील )
- ½ टीस्पून मोहरी
- 1 टीस्पून जिरे
- ½ टीस्पून लवंग ( ६ ते ८ )
- ¼ टीस्पून मेथीचे दाणे
- 1 टीस्पून काळी मिरी
- 1.5 टेबलस्पून धणे
- 12-15 लसणीच्या पाकळ्या
- सर्वप्रथम आपण चिकनचे मॅरिनेशन तयार करून घेऊ. एका मोठ्या बाऊल मध्ये हळद , मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र मिसळून घेऊ. त्यातच दही घालून एकत्र मिसळून घेऊ. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
- चिकनचे तुकडे यात घालून चांगले मिसळून घ्यावेत. या मॅरिनेशन मध्ये २ तासांसाठी चिकन फ्रिजमध्ये राहू द्यावे .
- आता आपण घी रोस्टचा मसाला बनवून घेऊ. थोड्या गरम पाण्यात लाल सुक्या मिरच्या आणि दुसऱ्या वाटीत १-२ टेबलस्पून गरम पाण्यात चिंचेचा गोळा बुडवून ठेवू.
- मसाले तुपावर भाजून घेण्यासाठी १ टीस्पून तूप एका पॅनमध्ये गरम करून घेऊ. तूप वितळले कि त्यात धणे , काळी मिरी , मोहरी , लवंग, मेथी दाणे आणि जिरे मंद आचेवर भाजून घेऊ. मसाल्यांचे सुवास दरवळे पर्यंत तुपात खमंग भाजून घेऊ. १ ते दीड मिनिटे भाजून घेतल्यावर मसाले एका ताटलीत काढून थंड होऊ देऊ.
- एका मिक्सरच्या भांड्यात हे मसाले, भिजवलेली चिंच पाण्यासहीत, लसूण , भिजवलेल्या लाल मिरच्या घालन बारीक पेस्ट वाटून घ्यावी. मसाला वाटण्यासाठी मी १/२ कप पाणी वापरले आहे.
- आता आपण चिकनला तुपात परतून घेऊ. ज्या पॅन किंवा कढई मध्ये आपण मसाला भाजला आहे त्यातच २ टेबलस्पून तूप घालून घेऊ. गरम तुपात चिकन चे तुकडे घालून मोठ्या आचेवर ३ मिनिटे परतून घेऊ. ३ मिनिटांनंतर मंद आचेवर चिकन झाकण घालून शिजू द्यावे.
- १५ मिनिटे आपण चिकन मंद आचेवर शिजवून घेतले आहे. चिकन एका ताटलीत काढून घेऊ. त्याच कढईत अजून २टेबलस्पून तूप अजून घालून घेऊ. या रेसिपीची खरी चव तूपामुळेच येते. म्हणून तूप घालताना अजिबात हात आखडता घेऊ नये. वाटलेला मसाला तुपात घालून घ्यावा आणि सोबतीला मीठही घालावे. हा मसाला तुपात चांगला परतून घ्यावा.
- ५-६ मिनिटे मसाला मंद आचेवर परतून घेतल्यावर कडेने तूप सुटायला लागते. चिकन घालून मसाल्यात मिसळून घ्यावे. पाणी अजिबात घालू नये. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
- चिकन १० मिनिटे जवळजवळ शिजू दिले आहे. आता गूळ आणि कढीपत्ता घालून फक्त २- ३ मिनिटे मोठ्या आचेवर शिजवावे जेणेकरून जर जास्तीचे पाणी चिकन मध्ये राहिले असेल तर सुकून जाईल . चिकन घी रोस्ट मसालेदार असते फार जास्त पातळ नाही . २-३ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि चिकन घी रोस्ट वाढेपर्यंत झाकून ठेवावे. गरमागरम नीर डोसा, घावन, आंबोळी किंवा भाताबरोबर हे अतिशय उत्कृष्ट लागते .

Leave a Reply