
कोकणात तांदूळ हे मुख्य पीक आहे हे आपण शाळेत भूगोलाच्या पुस्तकात कितीदा वाचले असेल . म्हणजे विशेष करून जेव्हा कोकण विभागातील पिके कोणती तेव्हा पाचपेक्षा जास्त नावे मी अगदी घडाघडा तोंडी परीक्षेत बोलून दाखवल्याचे स्मरते .
नाहीतर भूगोलाशी माझे कट्टर वैर होते. भातात खळे करून गरमागरम आमटीचा स्वाद घेणे , तोंडाने सुर्र्प सुर्र्प करत कोकमाच्या कढीत किंवा चिंचेच्या सारात पोहणाऱ्या भाताला पत्रावळीच्या बाहेर जाऊ न देता खाणे , घट्ट वरणाचे किंवा पिठल्याचे भातासोबत गोळे करून तोंडात घोळवत खाणे , आणि मुख्य राहिले कि हो … रापणीवरच्या ताज्या माशांच्या ओल्या खोबऱ्याच्या वाटणातल्या आंबट कालवणासोबत लाल तांदळाचा भात , म्हणजे सुखाची किल्ली च गावली हो कोकणवासीयांना !
कोकणातल्या स्वयंपाकघरात फडताळात गव्हाच्या , नाचणीच्या पीठासोबत ,एका जराशा उंच ठेवलेल्या डब्यात , कापडाचं चुंबळ लावून घट्ट झाकण लावून तांदळाचे सुवासिक पीठ नेहमीच आढळते . कधी श्रावणातल्या हळदीच्या पानावरच्या पातोळ्या , निवग्र्या , नेवऱ्या , रस शेवया , मोदक यासाठी ही पिठी वरचेवर दळून तो डबा नेहमी भरलेला ठेवून दिलेला असतो . उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तर माझ्या आईच्या आजोळी मुरुडला , दर चार दिवसांनी माळ्यावर पणजीच्या जुन्या परंतु स्वच्छ धुतलेल्या नऊवारी पातळावर भिजवलेले तांदूळ पसरवायचे काम आनंदाने स्वीकारले होते .एक तर माळ्यावर लहानशा खिडकीतून कौलांवर उतरून बिटके आंबे चोखून कोयी दूर कोण फेकतोय याची चुरस लागायची आणि दुसरे म्हणजे पसरवलेल्या तांदळात झाडे, फुले , पक्षी , वेगवेगळे मुखवटे बोटाने काढून खीखी करत दुपारच्या वेळेला माळ्यावर एकच गलका करायचो . मग आजीचा ओरडा नी एकेक पाठीत धपाटा खातच माळ्याचा जिना उतरायचो . आता तांदूळ भिजवताना वर आलेली दुधाळ निवळी अगदी मनातही आठवणींच्या रूपाने दाटलीय .

अहो लाडका बाप्पा आपल्या पाहुणचाराला येण्यास सज्ज झालाय . गणपतीचा नैवेद्य , मोदक बनवणे आपल्या सगळ्यांना खूप आवडते . त्यात सुवासिक तांदूळ पिठीचे उकडीचे मोदक बनवणे म्हणजे अत्यानंदच ! ही तांदूळ पिठी बाजारातून आणल्यावर ती चांगली निघाली तर उत्तम नाहीतर उकड फसते . मोदक उकडीला ठेवले की ते हसतात ( सारण बाहेर येते ) . ऐन नैवेद्याच्या घाईत मनाचा हिरमोड होतो .
मागील काही वर्षांपासून ,मी घरीच तांदूळ पिठी बनवते विशेषतः मोदकांसाठी . या पीठीच्या ताजे पणामुळे मोदकही छान वळता येतात . ही पिठी घरी बनवताना शक्यतो नवीन तांदळाचा वापर करावा .कारण नवीन तांदळात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याकारणाने pasting प्रॉपर्टी चांगली असते ज्यामुळे पीठाला हवा तो चिकटपणा येतो . आंबेमोहोर , इंद्रायणी किंवा बासमतीची कणी वापरलीत तरीही चालेल . जर पिठी रोजच्या वापरात म्हणजे भाकरी बनवण्यास किंवा मासे तळण्यास , भजी बनवण्यास वापरायची असल्यास जाड , लहान दाण्यांचा तांदूळ वापरला तरीही चालतो .
पिठी बनवण्याची सविस्तर कृती मी लिहिली आहे , एकदा घरी या पिठीचे मोदक करून पहा आणि मला खात्री आहे की बाजारातली पिठी मोदकांसाठी तुम्ही विकत नाही घेणार !


- ५०० ग्राम बासमती तांदूळ ( मोदक पिठीसाठी बासमती , आंबेमोहोर किंवा इंद्रायणी सारखा सुवासिक तांदूळ वापरावा. नेहमीच्या वापराच्या तांदूळ पिठीसाठी जाड आणि लहान दाण्यांचा तांदूळ वापरला तरी चालेल )
- पाणी गरजेनुसार
- तांदूळ निवडून , पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत . हे तांदूळ पाण्यात पूर्ण बुडतील इतके पाणी घालून ६ ते ८ तासांसाठी भिजू घालावेत . तांदूळ जास्त तासांसाठी भिजले तर त्यातून आंबूस वास यायला लागतो .
- भिजलेले तांदूळ एका चाळणीत अर्धा तास काढून ठेवावेत .
- नंतर एका स्वच्छ सुती कापडावर तांदूळ पसरवून ठेवावेत . एकमेकांना तांदळाचे दाणे चिकटणार नाहीत या रीतीने व्यवस्थित पसरवावेत . म्हणजे ते व्यवस्थित कोरडे होतात .
- साधारण १० -१२ तासांसाठी हे तांदूळ सावलीत किंवा घरातच पंख्याखाली वाळवून घ्यावेत . चुकूनही ते उन्हात वाळवू नयेत . तांदूळ वाळवणे ही प्रक्रिया उन्हाळी वाळवणे नसून फक्त दाण्यांच्या बाहेरील ओलावा कोरडा व्हावा यासाठी आहे जेणेकरून दाण्यांच्या आत शोषल्या गेलेल्या पाण्यामुळे पिठी एकदम मऊसूत बनावी .
- १०-१२ तासानंतर तांदूळ चांगले सुकले म्हणजे हाताला कोरडे लागले की त्यांची पिठी दळून घ्यावी .
- मिक्सरमध्ये थोडे थोडे करून तांदूळ बारीक वाटावे आणि मैद्याची किंवा रव्याची जी बारीक चाळणी असते त्यातून चाळून घ्यावे किंवा वस्त्र गाळ पूड केली तरीही चालते . चाळणीत उरलेली तांदळाची कणी परत मिक्सरमधून बारीक करून घ्यावी .
- हे पीठ चक्कीवरुन दळून आणायचे असल्यास ते बारीक च दळून आणावे .
- हे साधारण ४७० ग्रॅम्स चे पीठ बनते . एका हवाबंद डब्यात ठेवल्यास २-३ महिने सहज टिकते .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply