कोकण भागात ताज्या भाज्यांसोबतच कडधान्ये व त्यांच्या उसळी , सांबारं अतिशय आवडीने खाल्ले जातात . श्रावणातल्या पंगतीला मोड आलेल्या कडवे वालाचे बिरडे , मूग-मटकीची मिक्स उसळ , पावट्याचे दबदबीत आणि विसरून चालणार नाही अशी वाटाण्यांची मक्तेदारी या उसळीत , सांबारात दिसतेच !
म्हणजे काळ्या वाटाण्याचे सांबार नी आंबोळी. किंवा वडे , पांढरा वाटाणा व भोपळा, तंवसे किंवा केळ्याचे घारगे आणि हिरव्या वाटाण्याच्या चमचमीत उसळीसोबत बेकरीचे लुसलुशीत पाव ( ही माझी वैयक्तिक आवड बरे का ) किंवा मऊसूत घावणे म्हणजे कोकणस्थांसाठी मेजवानीपेक्षा कमी नाही .
ह्या उसळी नी सांबारं म्हटले तर कंफर्ट फूड .. रोज च्या जेवणातले ! या उसळींचे बेस म्हणजे कांदा ,लसूण, कोथिंबीर ( ऐच्छिक ) व खोबऱ्याचे भाजके वाटप हे असले तरी या खाद्यसंस्कृतीचा गाभा म्हणजे इथले साठवणीचे मसाले ! या पदार्थांत आमचा जीवश्च कंठश्च मालवणी पद्धतीचा मसाला जोवर पडत नाही तोवर जिव्हेला आणि पर्यायाने अंतरात्म्याला काही चैन पडत नाही ! आपल्या या ब्लॉग साईट वर आणि यु ट्यूब चॅनल वर मी या आधी काळा वाटाणा, पांढरा वाटाणा यांच्या सांबाराची रेसिपी टाकली आहे . आज हिरव्या वाटाण्याची उसळ करायला घेतलीय , थोडे से याचे वाटप वेगळे आहे पण आपण चवीसाठी मालवणी मसालाच घालणार आहोत. ही उसळ आम्ही घरात पोळी , भाकरी, आंबोळी सोबत खातोच पण ही उसळ पाव म्हणून सुद्धा खूप चविष्ट लागते .
माझ्या ब्लॉग्स च्या वाचकांना आतापर्यंत ठाऊक झालेच आहे , की मी मूळची मुंबईकर , आणि गिरणगावातले आमचे वास्तव्य ! लालबाग ला मसाल्यांचे मोट्ठे मार्केट आहे आणि महाराष्ट्रात ते प्रसिदध आहे ! महाराष्ट्रात विविध प्रदेशात वापरला जाणारा कोणताही मसाला तिथे मिळणार यात शंकाच नाही .
या मसाल्याच्या मार्केट मध्ये सगळ्यात जुना आणि सुप्रसिद्ध ब्रँड आहे – G.W. खामकर यांचा ! ८६ वर्षांहून अधिक काळाचा इतिहास या ब्रॅण्डच्या मागे आहे , आणि आता तर खामकरांची तिसरी पिढी या मसाल्याच्या उद्योगाचा डोलारा सांभाळतेय . माझे घर परळ ला , म्हणजे लालबाग पासून अगदी पायी चालत जाऊ इतक्या अंतरावर . तर चाळीत कोणालाही अगदी वर्षभराचा मसाला बनवायचा आहे , किंवा हळद कांडायची आहे , इतकंच काय तर नुसते गरम मसाले घ्यायचेत , सगळ्यांच्या तोंडावर पहिले नाव येते खामकरांचे . ही ब्रँड व्हॅल्यू स्थापन होण्याचे कारण तसेच आहे . उत्तम प्रतीचे खडे गरम मसाले , नैसर्गिक रित्या पिकवलेल्या , नैसर्गिक लाल रंग व तिखट चव देणाऱ्या लाल मिरच्या हे खामकरांचे वैशिष्ट्य ! नुसता कच्चा माल नाही तर वेगवेगळे मसाले बनवण्यासाठी खामकरांची टीम अतिशय मेहनत घेते . पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या मसाल्याचे जिन्नस खमंग भाजून , त्या त्या मसाल्याच्या गरजेप्रमाणे तळून , उखळीवर कुटून १०० टक्के नैसर्गिक गुणधर्म असलेले मसाले तयार केले जातात जेणेकरून ग्राहकांना घरगुती अस्सल चव त्या मसाल्यात मिळेल !
आज मी आपल्या उसळीत G. W.खामकरांचा स्पेशल मालवणी मसाला वापरलाय . तुम्हाला खामकरांचे विविध मसाल्याची उत्पादने आणि ते मसाले कसे ऑर्डर करायचे याची माहिती हवी असल्यास खालील डिटेल्स नक्की पहा आणि हिरव्या वाटाण्याची चमचमीत उसळ आता श्रावण – भाद्रपदात एखाद्या दिवशी नक्की करून पहा !
Cook time:
Total time:
Serves: 3-4
- पाऊण कप = १५० ग्रॅम्स हिरवे वाटाणे - स्वच्छ धुऊन रात्रभर किंवा किमान ६ तास पाण्यात भिजवून
- २ मध्यम आकाराचे बटाटे - १०० ग्रॅम्स - सालीसकट लांब चिरून
- २ मध्यम आकाराचे टोमॅटो - १२५ ग्रॅम्स लांब चिरून फोडी करून
- १ मध्यम आकाराचा कांदा - ८० ग्रॅम लांब चिरून
- अर्धा कप - ५० ग्रॅम किसलेले ओले खोबरे
- पाव कप कोथिंबीर
- पाव कप - २५ ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- ८-१० कढीपत्ता
- अर्धा टीस्पून हिंग
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला
- अर्धा टीस्पून हळद
- तेल
- मीठ चवीनुसार
- दीड टेबलस्पून मालवणी मसाला ( GW Khamkar Brand स्पेशल मालवणी मसाला )
- वाटाणे शिजवण्यासाठी एका पॅनमध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . पाणी उकळले की त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून भिजवलेले वाटाणे घालावेत . वाटाणे या पाण्यात शिजवून घ्यावेत ( १२ ते १५ मिनिटे )
- आता आपण वाटणाची तयारी करूया . एका कढईत सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे आहे . भाजल्यावर खोबरे एका ताटलीत काढून घ्यायचेय .
- त्यानंतर त्याच कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले लसूण घालून चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे .
- आता लांब चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा ( ८-१० मिनिटे ) . नंतर कोथिंबीर जराशी तेलात परतून घ्यावी .
- आता यात किसलेले ओले खोबरे घालून जरासे २-३ मिनिटे परतून घ्यायचे . खूप ब्राऊन होउ देऊ नये नाहीतर ओल्या खोबऱ्याचा फ्रेशनेस भाजीत येणार नाही .
- आता भाजलेले सुके खोबरे घालून नीट एकत्र करावे . गॅस बंद करावा . हे भाजलेले वाटप थंड झाले की पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे .
- आता कढईत अडीच टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . यात कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा .
- नंतर हळद घालून जरा परतून घ्यावी . आता मालवणी मसाला घालून तो जरासा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा . थोडे पाणी घालावे म्हणजे करपणार नाही .
- आता वाटलेला मसाला व थोडे पाव कप पाणी घालून मसाला चांगला परतुन घयावा .
- १० मिनिटे व्यवस्थित मसाला परतल्यावर बटाट्याच्या फोडी आणि शिजवलेले वाटाणे घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात साधारण दीड कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी आली की गॅस मंद करावा व झाकण घालून उसळ शिजू द्यावी ( ८ ते १० मिनिटे )
- बटाटे शिजले की आता टोमॅटो घालावेत. झाकण घालून मंद आचेवर ६ ते ७ मिनिटे शिजवावेत .
- आता शेवटी चवीपुरते मीठ घालावे . गॅस बंद करावा . आपली उसळ वाढेपर्यंत झाकून ठेवावी . ही उसळ घडीच्या तेलावरच्या पोळ्या , फुलके , तांदळाची भाकरी , आंबोळी , घावणे तसेच भातासोबत खूप चविष्ट लागते .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply