
असे म्हणतात ना की मनुष्याने नेहमी स्वतःशी स्पर्धा करावी , दिवसांगणिक स्वतःमध्ये आमूलाग्र ,अर्थातच योग्य तो बदल घडवून आणत , स्वतःचेच एक नवीन रुपडे आरशात न्याहाळावे आणि आपल्या भविष्याविषयी प्रोत्साहित राहावे . हे विचार मला खरंच पटतात , कारण दुसर्याशी विनाकारण स्पर्धा करून मन खट्टू करून घेण्यापेक्षा , स्वतःमध्येच पॉसिटीव्ह बदल घडवून आनंदी राहणे केव्हाही चांगलेच !
२०१७ च्या शेवटी शेवटी मी माझा कलिनरी आर्टस् चा पोस्ट ग्रॅजुएशनचा कोर्स पूर्ण करून पुण्यात घरी परतले , आणि आल्याआल्याच नवरोबाच्या वाढलेल्या पाच किलोंनी माझे टेन्शन वाढवले ! तसा पार्टनर माझ्यापेक्षा जास्त फिटनेस फ्रीक , परंतु काही कारणास्तव तो स्वतःचे मॅरेथॉन रनिंग करू शकत नव्हता ! तुम्हाला मला सांगायला आवडेल की पार्टनर चांगला मॅरेथॉन रनर असून तो नेहमी हाफ मॅरेथॉन पळतो – हो हो अगदी बरोबर , २१ किलोमीटर !
सगळ्यात पहिल्यांदा आम्ही ठरवले की वजन कमी करण्यासाठी जिम लावू , नवीन वर्षाची सुरुवात एका छान संकल्पाने करू ! तसे जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे हा काही माझा प्रांत नाही ! परंतु मी बरीच वर्षे रीक्रेयेशनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे झुंबा, फिटनेस बॉलीवूड अशा नृत्य प्रकारांत मोडणारे व्यायाम प्रकार आवडीने आणि नियमाने करते . मग काय २०१८ ची सुरुवात फारच दमदार झाली , सुरुवातीचे एक दोन दिवस जिममधल्या उपकरणांची तोंडओळख होण्यातच गेली , आणि नंतर मला जिमच्या नियमांप्रमाणे एक ट्रेनर देण्यात आला जो मला माझा व्यायामाचा आराखडा काढून देईल ! हळूहळू त्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली मी पर्सनल ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आणि जिमचा वर्कआउट म्हणजे ” न भूतो न भविष्यती” असलेल्या विचारसरणीची मी आज दीड वर्ष होत आलेय , अगदीच रोज नाही , परंतु आठवड्यातले ५ दिवस किमान ४५ मिनिटांचा व्यायाम तरी नक्की करून येते ! मी असे म्हणत नाही की सगळ्यांनी जिम जायलाच हवे परंतु आपण आयुष्यात ज्या कोणत्याही चांगल्या गोष्टी , आजवर वेळ नाही किंवा मला कसे जमणार म्हणून टाळतो ना , त्या नक्की करून पाहाव्यातच , खात्रीने सांगते . खरंच खूप आनंद होतो हो ! म्हणतात ना ” fear of the unknown is the greatest fear of all!”
Read this recipe in English

आरोग्यविशेषज्ञ व्यायामाबरोबर योग्य खाण्यापिण्याची सांगड घालण्याचा नेहमीच आग्रह धरतात , डाएट म्हणजे उपाशी राहणे किंवा बेचव खाणे नसून , चौरस आहार घेणे . आहारात पिष्टमय पदार्थ , प्रथिने, स्निग्ध पदार्थ , क्षार , खजिने आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश म्हणजेच चौरस आहार !
मीही डाएटिशिअनच्या सल्ल्यानुसार माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित करून माझा आठवड्याचा मील प्लॅन बनवला . त्यात मला दिवसातून एकदा ऋतूप्रमाणे बाजारात मिळणारे फळ खायचे आहे ! मग रोज नुसते फळ खाणे किंवा फळांचे सरबत पिणे हे माझ्या चटखोर जिभेला कसे मानवणार? मग सुरु जाहला शोध नव्या नव्या पाककृतींचा , मला वैयक्तिकरित्या जे जे आपल्या आजूबाजूला ऋतुमानाप्रमाणे पिकते,उगवते तेच आहारात समाविष्ट करायला आवडते .. अशातच रमदानाचा महिना सुरु झाला आणि मी एका ब्लॉग साठी माहिती गोळा करायला लागले होते . किंडल वर एक छान पुस्तक मिळाले मारिया नासिर यांचे ” रमदान रेसिपीस – सेव्हन डेज मेनू” , या पवित्र महिन्यात सेहरी , इफ्तारी आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवल्या जाणाऱ्या पाककृतींचा संग्रह!
आजची माझी रेसिपी फ्रुट चाट ही त्याच पुस्तकातून वाचून मी थोड्या फार फरकाने बनवलीय . नेहमी चाट म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर दही वडे , शेवपुरी ,पाणीपुरी उभी राहते .. परंतु इतके हेल्दी आणि चविष्ट चाट फळांपासूनही बनवले जाते ह्यावर विश्वास तर हे फ्रुट चाट खाल्ल्यावरच पटते!
जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे ! या उन्हाळ्यात तर हे थंडगार फ्रुट चाट तुम्ही तुमच्या मुलांनाही देऊ शकता , नक्की करून पहा आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- २ आलुबुखार
- २ पेअर ( नासपती )
- १ सफरचंद
- १ संत्रे
- एका डाळिंबाचे दाणे
- २ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे , सोलून आणि चौकोनी तुकडे करून
- २ केळी
- ४-५ टेबलस्पून दही
- १ टीस्पून लाल मिरची पूड
- १ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड
- १/२ टीस्पून काळी मिरी पूड
- १/२ टीस्पून चाट मसाला
- २-३ टीस्पून साखर
- १ लिंबाचा रस
- मीठ चवीप्रमाणे
- सगळ्या फळांना स्वच्छ धुऊन , चौकोनी फोडी करून घ्याव्यात . तुम्ही वरील फळांऐवजी इतर फळेही वापरू शकता , जसे पेरू, पपई किंवा अननस .
- दह्याच्या मिश्रणासाठी दही, लिंबाचा रस , लाल मिरची पूड , जिरे पावडर, चाट मसाला , काळी मिरे पावडर, चवीनुसार मीठ, आणि साखर घालून नीट फेटून घ्यावे. आपल्या चवीप्रमाणे मसाले कमी जास्त प्रमाणात वापरावेत. दह्याचे मिश्रण तयार आहे.
- आता फळांचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन ते वरखाली एकत्र करून घ्यावेत. या फळांवर दह्याचे मिश्रण घालून नीट हलक्या हाताने मिसळून घ्यावे .
- खाण्याआधी किमान ३० मिनिटे फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे . चटपटीत फ्रुट चाट तयार !
Leave a Reply