
श्रावणातील ग्रामदेवतेची सप्ताह , निरनिराळे सण त्यामुळे गावाला एक निराळीच शोभा आलेली . प्रत्येक अंगणात सकाळीच सडा संमार्जन होऊन कोणी हौशी स्त्रिया रांगोळ्या रेखाटत आहेत , तर कोणाच्या अंगणात देवीचे निशाण अगदी डौलाने वाऱ्यावर डोलतेय . कोणाच्या अंगणात मांडव घालून सत्यनारायणाची यथासांग पूजा पार पडतेय , आणि चुलीवर मंद आचेवर तुपात घोळलेल्या शिऱ्यात पिकलेली केळी घालताना गुरुजींच्या मुखातून ” करिष्ये ssss ” ने अंत होणाऱ्या श्लोकांचे उद्गार कानी पड्तायेत .
पुढे म्हसोबाच्या देवळाला अक्षरशः विहिरीतून कांडण्याने पाणी काढून, हंडेच्या हंडे रिते करून धुऊन काढले जातेय . देवीच्या देवळात आवारातल्या रंगीबेरंगी पताका मनाला उत्साह आणतायेत तर नव्याने रंगवलेलया दीप माळेवरचे रंग सूर्यप्रकाशात आपली प्रभा पसरवतायेत . जरासे डोंगरावर , चढणीने सड्याच्या दिशेने गेले की ,एक लहानशी खळाळती नदी , जी पावसाळ्यातच भरते नी दुथडी भरून वाहते . तिच्या किनाऱ्यावर झाडांवर श्रावण झुले झुलतायेत नी झग्यातल्या पोरींपासून ते नव्या नवऱ्यांपर्यंत आपापल्या आया, सासवा, नणंदा , जावा यांच्यासोबत गप्पाटप्पांमध्ये हसत -खिदळत रमल्यात ! एकूणच काय , आपले नेहमीचे वाद- विवाद, तंटे , टोमणे बाजूला सारून गाव खुशीत लहरतोय !
आज तर काय जन्माष्टमीचा दिवस .. सकाळची पूजाअर्चना , आरती आटपून , साधारण उन्हे कलली की गुरवाची लगबग उडालीय . गाभारा आणि मंदिराचे खांब ते तुळया सगळे आज फुलापानांनी सजवायचेय . गुरवीण आणि काही मदतनीस बायका मिळून चांदीचा पाळणा सजवायच्या तयारीला लागल्यात . प्रत्येकजण आपापल्या बागेतल्या , अंगणातल्या झाडांवरची फुले , तुळशीपत्रे , तर फळे करंड्यांत भरून देवळात पूजेसाठी , प्रसादासाठी आणून देतायेत . एका बाजूला पंचामृतासाठी दुधाची , दह्याची घंगाळे नीट रचून ठेवलीत , तर सुंठवड्याची तयारी म्हणून आज्यांनी बैठक पकडून सुंठ ठेचायला घेतलीय . कोणी नसलेल्या दातांखाली तोंडाचे बोळके आवळून खोबऱ्याच्या कवडी किसणीवर जोर लावून किसत आहेत . पंचखाद्याच्या तयारीला कुरमुरे , शेंगदाणे असे साहित्य परातीत घेऊन , आमची सत्तरीतही चष्मा न लागलेली विभा आजी , मान अगदी वाकवून निवडून घेतेय . दूध पेढ्यासाठी चुलीवर ही भली मोट्ठी कढई आणि त्यात गायीचे दूध घालून मंद आचेवर उकळत ठेवलेय आणि जराशी उंच , गोरटेली, वयस्कर काकू ते दूध पलित्याने ढवळत , बाकीच्या वयाने लहान असलेल्या महिला वर्गाला तोंडाने सूचना देत्येय. तिच्या हातातला पलिता , डाव्या हाताचे हातवारे आणि मानेला झटके देत व भुवया उंचावून इशारे देणे आणि त्याचबरोबर अंबाड्यातलया अबोलीच्या गजर्याचे सुटलेले टोक , हे सगळे इतके लयीत होतेय ना ते पाहून मंदिरातल्या लगबगीचा अंदाज प्रवेशद्वारात उभे असणाऱ्याला सहज येतो . ” अरे तो ईज्या खय रवला , देवळात मखमल ची पायघडी आणून दे म्हणून पाठवला , नी थंयसरच अजून ..तू आता काय माझा दशावतार ऐकूक हुबा रायलंस , जा परविनाक घेऊन हंडीची तयारी करा जा ..” इति सूचना देवळातल्या पारावर बसलेल्या मानकऱ्यांपैकी !

जसजसे दोन तीन तास उलटून जातात , तिन्ही सांजेची वेळ येते तसतसे कामे हळूहळू आटपत येतात , नी आवारातली लगबग आता व्यवस्थित मांडणी केलेल्या वस्तूंनी घेतलेली असते . दूध पेढ्यासाठी दूध आटवणाऱ्या काकीचा पलिता सुद्धा आता खवा घट्ट झाल्याने जागच्याजागीच हालत असतो आणि तिच्या मानेला ही एव्हाना विसावा मिळाला असतो . मातीची रंगवलेली सुबक हंडी पंचामृत भरून तिपाईवर विराजमान होते . पंचखाद्याची पंचधातूची परात वरून सुंदरसा भरतकाम केलेला रुमाल टाकून झाकलेली असते . देवळाला कोण्या एका बड्या प्रस्थाने भेट दिलेल्या चांदीच्या मोठ्या करंड्यात सुंठवडा , वरून खोबऱ्याची महिरप घालून भरून ठेवलेला असतो . जन्मकाळानंतरच्या पहिल्या दहीहंडीसाठी एकीकडे दहीकाला तयार होऊन हंडीत भरून तयार असतो . एकूणच गडबडीची जागा आत शांत , भक्तिपूर्ण वातावरणाचे रूप घ्यायला लागते . लाऊडस्पीकर वर मंद आवाजात सनईचे किंवा कृष्णजन्माचे पाळणे वाजायला लागले असतात . सगळेजण आपापल्या घरी जरा कामाचा थकवा घालवून ताजेतवाने होण्यासाठी परत जातात . देवळात मोजकीच माणसे उरतात देखरेखीसाठी !
रात्री ९-१० च्या सुमारास देवळात गर्दी लोटायला लागते . आता देवळाचे स्वरूप म्हणजे जुन्या धार्मिक सिरीयल मध्ये दाखवतात ना तसे देवांच्या दरबारासारखे .. झाडावरच्या विजेच्या दिव्यांच्या माळांनी देऊळ झगमगून उठते , तेलातुपाच्या पणत्यांनी दीपमाळेवर जणू आकाशीच्या तारका विसावलेल्या .. प्रवेशद्वारावरची सुस्वागतम ची रांगोळी जरासे रेंगाळायला भाग पाडते . पुढे देवळात शिरल्यावर तर काय तो उत्साह आणि सोहळा वर्णावा ! देवकीच्या पोटी हा लीला पुरुषोत्तम जन्मला तेव्हा जन्मदात्याच्या शिरावर ,इवल्याश्या टोपलीत झोपून ,आपल्या पद कमळांच्या स्पर्शाने यमुनेच्या काळ्या डोहाचा भयाण पूर पार करून, नंदाघरी गोकुळात पोहोचला .चांदीचा लखलखता पाळणा , त्यावर रंगीत फुलांच्या माळा … पाळण्यातील , मखमली लहानशी मोतीजडित गादी नी इवलीशी गुलाबी उशी ! बर बाळाला पांघरायला भरतकाम केलेली रेशमी दुलई सुद्धा ! पाळण्याच्या भोवताली कृष्णाचे सवंगडे , भाऊ बलराम , ताक घुसळणारी यशोदा नी इतर डोक्यावर मडकी वाहणाऱ्या गोपिका , आणि या सृष्टीच्या पालनकर्त्याची आवडती गाई -म्हशी- वासरे असा देखावा दर वर्षी उभा केला जातो .
नंतर जन्मकाल जवळ यायला लागतो तसे देवळातल्या चांदीच्या बाळकृष्णाला अत्तरमिश्रित गरम पाण्याने न्हाऊ माखू घालून , नवीन कपडे घालून तयार केले जाते . हे साजिरे गोजिरे रुपडे अगदी डोळ्यांत साठवून घेण्यासारखे ! याला पाहून एकनाथांची ही रचना आठवते , ” असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा!” एव्हाना बायकांनी पाळणा गायला सुरुवात केली असते . विष्णू सहस्त्रनामावली म्हणत देवळातले गुरुजी पूजा करीत असतात . बाराचा ठोका पडला , बाळकृष्णाला पाळण्यात घातले की म्हातारा गुरव आनंदाने हात जोडून आरोळी ठोकतो ,” किस्ना जनमलो रे ..” आवारात जमलेल्यांमध्ये एकच जल्लोष होतो . ढोल तालात वाजू लागतो . रात्रीच्या त्या प्रहरी अवघा गाव जागा असतो आणि देवळातला ढोल ऐकून इथे आपल्या घराच्या अंगणात उभा असलेला महाद्या घरात आवाज देतो , ” जन्म झाला गे, पोरींनो घ्या वाढायला , उपास सोडूक हया ..” जन्मकालानंतर लगेचच कमी उंचीवरची पहिली दहीहंडी देवळात बालगोपाळांकरवी फोडली जाते . त्यानंतर देवळात दर्शन घेऊन वाटलेला प्रसाद , खिरापत खाऊन जो तो आपापल्या घरी परततो .ज्यांच्या घरात कृष्णजन्माचा सोहळा होतो ना त्यांच्याकडे सुद्धा हौसेने असा देखावा उभा केला जातो . काही जणांकडे चांदीचा लंगडा बाळकृष्ण असतो तर काही दरवर्षी गणपतीसारखेच कृष्णाची मातीची मूर्ती आणि कुष्णाचे गोकुळ उभे करतात .

कोकणात जन्माष्टमीचा उपवास सोडताना मुख्यत्वे पानात काळ्या वाटाण्याचे सांबार , आंबोळ्या किंवा पुऱ्या , रव्याची खीर , भजी , नी शेगलाची म्हणजे शेवग्याच्या पानांची भाजी असते . असे म्हणतात की कृष्णाला हे शेवग्याचे झाड नी त्याच्या पानांची भाजी अतिप्रिय , हिंदीत या शेगलाच्या भाजीला ” सहजन की सब्जी ” म्हणतात ! याची पाने गुच्छाने एकत्र राहतात आणि कृष्ण सुद्धा आपल्या सखा सवंगड्यांसोबत नेहमी एकत्रच राहिलेला आहे , नाही का ? दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळी गावात जागोजागी म्हणजे चौकात , मैदानात , शाळेच्या प्रांगणात , ग्रामपंचायतीजवळ दही हंडी मजेचा भाग म्हणून फोडली जाते .
माझी पूर्ण जडणघडण मुंबईत गिरणगावात झाली असल्याकारणाने सगळे सण दणक्यात साजरे होताना पाहायचे भाग्य मला मिळाले . चाळीच्या व्हरांड्यात लाकडी खांबावर गच्च पिरगळून बांधलेले सुंभ , मधल्या चौकोनात डोक्यावर मध्यभागी डोलणारी सुबक रंगीत हंडी , रंगीत पाण्यांनी भरलेले पिंप, चाळीच्या मंदिरात आदल्या रात्रीच्या कृष्ण जन्माचा देखावा आणि फुलांनी सजलेला पाळणा, दुरून येणारी ” ए गोविंदा aaaa रे गोपाळा aaa..” ची हाळी व त्यासोबत येणारा भिजलेल्या , गुलालरंगी रंगलेल्या गोपालांचा जमाव .. कृष्णावतारात नटलेले बाल गोपाळ आणि त्यांच्या सोबत चनिया चोळी घालून मिरवणाऱ्या लहानग्या राधा राण्या.. उत्साहाला भरते काय असते ते हे सगळे बघितल्यावर कळेल !
कधी कधी नेमका दहीकाल्याच्या दिवशी १५ ऑगस्ट यायचा , आम्ही शाळेत सकाळीच झेंडावंदनाला जायचो . परत येताना सगळीकडे गोविंदाचे ट्रक भरून जाताना दिसायचे . दादरला माझी शाळा , हिंदू कॉलनीतून निमुळत्या गल्लीतून बाहेर येऊन बस स्टॉप ला जाताना आधी हळूचकन गल्लीच्या तोंडाशी येऊन पाहायचो की गोविंद्याचा ट्रक तर नाही ना जात आहे . कारण नाहीतर मग पाण्याचा एक फवारा स्नान घालून जाईल यात शंकाच नाही ! मग डाव्या उजव्या बाजूला ” गोंद्या नाही आला रे ” असे पाहून पटकन क्रॉस करून स्टॉप वर पळायचो . बस मिळाली की कंडक्टर पहिल्यांदा खिडकीची काच बंद करायला सांगायचे . आता उतरल्यावर घरी पोचताना दुसरी लपाछपी सुरु . माझ्या मैत्रिणीची चाळ बस स्टॉप ला लगतच . आपल्या लांब ढांगा टाकत अक्षरशः धावतच चाळीत जायची नी मला म्हणायची “पळत जा आणि चाळीच्या छपराखालून जा म्हणजे दिसणार नाहीस” . माझे मात्र धाबे दणाणायचे . हळूचकन चिचुंद्रीसारखे कधी लौंड्रीच्या छपराखालून तर पुढे झाडाच्या आडून आणि अगदीच जिथे काही लपायला काही छप्पर नव्हते तिथे छत्री उघडून आमच्या चाळीजवळ आले आणि आपल्याच युक्तिवर खुश होऊन स्वतःला मनात शाबासकी देत होते, तेवढ्यात जे पाठीवर आणि पार्श्वभागावर दणादण प्लास्टिक च्या पाणी भरलेल्या पिशव्यांचा मारा झाला , की काय सांगू ! मागे खिदळण्याऱ्यावर दात ओठ खात ” बघून घेईन , ये उद्या खेळायला तेव्हा ” अशा आविर्भावात चरफडत घरी आले .
आसपासच्या हंड्या फोडल्यावर दमलेले गोविंदा खाऊसाठी आणि अंगावर पाणी ओतून घेण्यासाठी चाळीत प्रत्येक घराशी यायचे . कोणी घरात केलेली मिठाई , पेढे , वडे असे खायला द्यायचे . काही खोडकर गोविंदा चाळीतलया शिस्तप्रिय आजोबांची कळ काढायचे ,” तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा..” आजोबा त्या दिवशी मात्र मनमोकळे हसायचे , नी गोपाळांच्या डोक्यावर पाण्याची कळशी उपडी करायचे . नंतर मात्र हा पाण्याचा चिखल निपटून काढण्याच्या निमित्ताने पूर्ण चाळ धुऊन निघायची . त्या दिवशी मात्र चाळकरी कुरकुर नाही करायचे हां , एरवी नाहीतर माझ्या दारात ओले पाय कोण घेऊन आले म्हणून CID इन्वेस्टीगेशनच बसवले असते !
म्हटले तर हा आनंदाचा , जल्लोशाचा सण पण त्यातूनही एकत्र येण्याचा , एकमेकांना समजून घेऊन , एकमेकांची ताकत , कमतरता जाणून मानवी मनोरा उभारून ती हंडी फोडून , तो ऐक्याचा दहीकाला आवडीने एकमेकांसोबत वाटून घेण्याचाच संदेश देतो ना ! मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे हे उगाच म्हटलेले नाही !
आज मी गोपाळकाल्यानिमित्त सुका मेवा घालून कृष्णाला अतिप्रिय असणाऱ्या दह्याची लस्सी बनवलीय आणि त्यातही एक पदार्थ घालून अजून मजेदार बनवण्याचा प्रयत्न केलाय . नक्की करून पहा ही रेसिपी !

- ३०० ग्रॅम्स घट्ट दही ( ६०० ग्राम दही एका मलमलच्या कापडात घट्ट बांधून २ तासांसाठी टांगून ठेवल्यावर पाण्याचा निचरा होऊन घट्ट दही मिळते )
- १२५ ml थंड दूध
- १०० ग्रॅम्स खवा किसून किंवा कुस्करून
- ४ टेबलस्पून साखर ( ६० ग्रॅम्स) किंवा आवडीनुसार
- अर्धा कप सुका मेवा ( काजू , बदाम , पिस्ता , मनुका चिरून )
- एका पॅन मध्ये मंद आचेवर खवा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यावा . थोडासा दाणेदार व्हायला लागला की गॅस बंद करून खवा एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावा .
- टांगलेले दही चांगले फेटून घ्यावे .
- नंतर त्यात दूध , साखर घालून पूर्ण मिसळेपर्यंत एकत्र करावे.
- एका मोठ्या ग्लासात कडांनी थोडे रोज किंवा स्ट्रॉबेरी सिरप घालून घ्यावे . दिसायला छान दिसते . ग्लासात पहिल्यांदा दही घालावे , त्यावर खव्याचा थर आणि नंतर सुक्या मेव्याचा असा थर लावून घ्यावा .
- असे थर ग्लास पूर्ण भरेपर्यंत अंडी सगळ्यात शेवटचा थर दह्याचा येईल असे भरावेत .
- वरून सजावटीसाठी थोडा सुका मेवा घालावा .
- लस्सीचे असे भरलेले ग्लास फ्रिजमध्ये थंड होय द्यावेत .
- बालगोपाळांना ही लस्सी अतिशय आवडते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply