
” तुझी माझी जोडी जमली रे , कशी झक्कास भुर्जी बनली
थोडी थोडी करपलीssss तरी पोटातली आग ही निवली हाय हाय …”
असे गाणं गुणगुणतच मी ती माझ्या पहिल्या प्रयत्नातली भुर्जी ताटलीत वाढून घेतली आणि मस्त पावाबरोबर हाणली ! अर्रर्र अंमळ मीठ जरा जास्तच , कांदा अर्धकच्चा आणि भुर्जी की घट्ट झालेली खीर हा प्रश्न पडावा अशी दिसणारी ती भुर्जी , चालतंय की , उसमे क्या हैsss …
हा प्रसंग जवळजवळ १२ वर्षांपूर्वीचा ! म्हैसूरला ट्रेंनिंग संपवून पुण्यात नोकरीवर रुजू होऊन जेमतेम आठवडा झालेला ! सोमवार ते शनिवार रात्रीच्या जेवणासाठी डबेकरी लावलेला , सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कंपनीचे सात फूड कोर्ट दिमतीला हजार असल्याने आमची स्वारी कॉलर ताठ करून फोनवर आईच्या काळजीयुक्त प्रश्नांना उडवून लावायची! ” अग आई किती प्रश्न विचारते , मी करते सगळे नीट मॅनेज , तू ठेव बघू फोन!” असे म्हणून पलीकडे आईच्या हृदयात चाललेली घालमेल नकळत माझ्याकडून दुर्लक्षित व्हायची.
मग आला तो दिवस , रविवार ! तशी शनिवारची सुट्टी बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर पिक्चर पाहण्यात आणि खादाडीत गेलेली ! रात्री उशिरा लागलेला डोळा सकाळी सूर्य डोक्यावर आल्यावरच उघडला . घड्याळात वाजलेल्या दहाचा काटा पाहून अचानक आजीचा चेहरा आणि तिचा ओरडा आठवला , ” एवढ्या उशिरापर्यंत म्हशीसारखी लोळतेय , उठ आता ” , खाडकन उठून पटापट ब्रश करून चहा ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात शिरले . जशी चहाच्या आधणाला उकळी फुटली त्या सुवासाने माझ्या पोटातही भुकेचा आगडोंब उसळला ! खाण्याच्या डब्यात रिकामी बिस्किटांची पाकिटे , खारीचा उरलेला चुरा पाहून भडभडून आले हो ,, आणि माझ्या रूममेट्सवर प्रचंड रागही ! तिरीमिरीत फ्रिज उघडला तर त्यात कपडे भरून ठेवता येतील इतकी छान मोकळी जागा होती , माणसाची वेळ फिरली की सगळेच फिरते म्हणतात ना तसच झाले .. तो रिकामा फ्रिज वाकुल्या दाखवतच होता तितक्यात नशिबाने काही अंडी आणि शिळे पाव एका बाजूला निपचित पडलेले दिसले . थोडेसे चेहऱ्यावर हसू खुलवत मी ते पाव आणि अंडी ओट्यावर ठेवली, आणि सुरु झाला एक मूक संवाद .. दोन्ही पार्ट्या एकमेकांकडे निरखून पाहत होत्या , नक्की करायचे काय ! माझे एक आळशी मन मला म्हणत होते , ” छोड ना यार चल शर्वाणीमधून तवा पुलाव मागवू. ” पण ऑर्डर घेणारी शर्वाणीची पोरे ती डिलिव्हर करायला मात्र अजून तासभर घेणार , तोपर्यत आमची हाडे दिसायला लागायची ! झोमॅटो , स्वीगी अशी पिके तेव्हा उगवली नव्हती ना !

मग लावला आईला फोन , ती तिकडे घरी मस्त चिंबोर्यांचे कालवण शिजायला घालत होती आणि मी तिला विचारणार होते की अंडी आणि पाव यांचा मेळ कसा घालू! मी अंडे खाणार आहे हे ऐकल्यावर आई तीन ताड उडाली , कारण घरात एखाद्या दिवशी मासे, चिकन , खेकडे , शिंपल्या यांच्या ऐवजी अंडी शिरली रे शिरली की माझे असहकार आंदोलनच सुरु व्हायचे ! मग कुठे पोटचं दुखतंय , तुझे माझ्यावर मुळी प्रेमचं नाहीये , अंड्याचे कालवण खाण्यापेक्षा मी उपाशीच राहीन असे वगैरे वगैरे डायलॉग्स मारून मी तिला भंडावून सोडायचे! हे सगळे ती हसत हसत का होईना मला आठवण करून देणार याची आधीच कल्पना असल्याने मी डायरेक्ट भावनांचाच हात घातला , ” आई खूप भूक लागलीये , पटकन सांग काय बनवू?” झाले . माझ्या माऊलीचा मातृप्रेमाचा स्विच ऑन झाला आणि तिने जसे सांगितले तसे प्रयत्न करत मी चक्क अंड्याची भुर्जी बनवली . बरं बाई माझ्याकडे तेव्हा कॅमेरा फोन नव्हता , नाहीतर माझ्या भुर्जीला ” अश्मयुगातलया मानवाचे (अर्धकच्चे_)_ खाणे” या नावाखाली म्युझिअम बिझिअम मध्ये ठेवले असते !
पण त्यानंतर एक गोष्ट मात्र माझ्या मनात अधोरेखित झाली की साऱ्या बॅचलर कम्युनिटीचा जर कोणी सर्वे सर्वा आहे तर तो म्हणजे अंडी! कुठल्याही शहरात जागोजागी कधीही , केव्हाही , रात्रीच्या कुठल्याही प्रहरी अंड्याचे विविध ऑम्लेट , हाफ फ्राय , फुल्ल फ्राय , फ्रेंच टोस्ट , बिर्याणी, फ्राईड राईस , नूडलस यांच्या गाड्या लागतात म्हणजे लागतातच ! आईचा इतक्या वर्षांनीही विश्वास बसत नाही , जेव्हा मी माहेरी गेल्यावर कधी कधी तिला ऑम्लेट बनव नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात अंडी फोडून कालवण कर , असे म्हणते ! माझ्या या उदगारांवर डोळे बारीक करून परत परत माझ्याकडे बघते की ही मस्करी तर करत नाही ना… वेडाबाई माझी माय !
या ब्लॉगवर आणि माझ्या हिंदी युट्यूब चॅनेलवर मी अंड्याच्या बऱ्याच रेसिपीस संकलित केलेल्या आहेत! नक्की ती प्लेलिस्ट पहा ..
आजची माझी रेसिपी ही थोडी हटके , पण मजेदार- अंड्याची कचोरी! मुलांच्या पार्टीत स्नॅक्स साठी उत्तम ऑप्शन ! करून बघताय ना लवकर, मला लिहायला विसरू नका खाली कंमेंट सेक्शन मध्ये !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Read this recipe in English

- १ १/२ कप= २०० ग्रॅम्स मैदा , चाळून घ्यावा
- १/२ टीस्पून ओवा
- मीठ चवीनुसार
- तळण्यासाठी तेल
- ३ अंडी उकडून
- २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १/२ टीस्पून काळी मिरी बारीक कुटून पावडर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टेबलस्पून मनुका बारीक चिरून
- आपण पहिल्यांदा कचोरीच्या बाहेरच्या आवरणासाठी पीठ मळून घेऊ. एका परातीत मैदा, मीठ चवीप्रमाणे , ओवा आणि १ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घेऊ. हे सारे घटक मैद्यात दोन्ही हातांनी चांगले रगडून घेऊ. मैद्याचे टेक्सचर ब्रेड क्रम्ब्स सारखे दिसले पाहिजे.
- आता थोडे थोडे पाणी घालून मैद्याचा घट्ट गोळा बनवून घेऊ. मी अर्धा कप पाणी वापरले आहे पीठ मळण्यासाठी. मैद्याच्या गोळ्याला तेलाचा हात लावून परत चांगले तिंबून घ्यावे . स्ट्रेच अँड पूल या पद्धतीने पीठ चांगले मळून घ्यावे . माहितीसाठी हिंदी चॅनेल वर विडिओ नक्की पहा ! https://www.youtube.com/watch?v=Q5M57R7i5h0
- असे किमान ३-४ वेळा करून पीठ दहा मिनिटे झाकून ठेवावे .
- तोपर्यंत अंड्याचे सारण बनवून घेऊ . अंडी किसून घ्यावीत. किसणीच्या मोठ्या किंवा मध्यम भोकांचा वापर करावा किसण्यासाठी ! मीठ चवीप्रमाणे घालावे, कुटलेली काळी मिरी , कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मनुका आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घेऊ. अंड्याचे सारण तयार आहे . आवडत असल्यास लाल मिरची पूड, चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता !
- कचोऱ्या बनवण्यासाठी मैद्याच्या गोळ्याचा एक छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा बनवून घ्यावा . मोदकाच्या पारीप्रमाणे खोलगट पारी बनवून त्यात १-२ चमचे अंड्याचे सारण घालून कडा एकत्र करून बंद करून घ्याव्यात.
- कचोरी हलक्या हाताने गोल वळून घ्याव्यात. अशा प्रकारे साऱ्या कचोऱ्या बनवू घ्याव्यात ! इतक्या मापात १२-१५ कचोऱ्या बनतात!
- कचोऱ्या तळण्यासाठी एका कढईत कचोऱ्या बुडतील इतके तेल घालून चांगले तापवून घ्यावे . तेल तापले की गॅस मंद करून बारीक आचेवर कचोऱ्या तळाव्यात जेणेकरून त्या आतपर्यंत तळल्या जातील! व्यवस्थित तेलात कचोऱ्या वर खाली करून सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात . करपू देऊ नयेत . कचोरीचा एक भरणा तळायला मला मंद आचेवर ५ मिनिटे लागली.
- गरमागरम खुसखुशीत अंड्याच्या कचोऱ्या टोमॅटो केचअप सोबत किंवा नारळाच्या किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खावयास द्याव्यात !
Leave a Reply