
टीवी पहाणे हा आताश्या माझ्या विरंगुळेचा भाग राहिला नाही. आमच्या ह्यांची स्वारी ऑफीस ला गेली की घरातला पसारा आवरता आवरता काहीतरी कानावर आवाज पडावा म्हणून मी टीवी ऑन करते.
त्या दिवशी आमच्या विठाताईंची सुट्टी होती आणि जरा साफसफाई मुळे नेहेमी पेक्षा जास्त वेळ टीवी बॅकग्राउंड मधे कोकलत होता. कोणता तरी टूकार दक्षिणे कडचा डब झालेला हिंदी चित्रपट चालू होता, आणि नकळत एका डाइलॉग मुळे माझ्या चेहृयावर हसू खुलले ! नाही गैरसमज करून घेऊ नका , त्या कॉमेडियन च्या फालतू कॉमेडी मुळे नाही, तर कित्येक दिवस आंघोळ न केलेला, लिंबू ठेवता येतील तेवढ्या मिश्या असलेला खलनायक डोळे गरा गरा फिरवत मुठी अवळत म्हणत होता “ तेरा मार मार के भूर्ता बना दूँगा !” आई शप्पथ भरिताचे नाव ऐकले आणि तोंडाला घळा घळा पाणी सुटले ना राव! पहिल्यांदा तो विलेन आवडला बर का!

काय आहे ना , नवरोबा आहे डाएट वर आणि त्याच्या वाढलेल्या पोटाचे इंच कमी करण्यासाठी आम्ही दोघेही सध्या नो ग्लुटोन डाएट वर आहोत. त्यामुळे जरा घरात विविध प्रकारच्या सलाड चे वारे वाहतायात. पण हा डाइलॉग ऐकून अचानक आठवले की ,आहे की आपल्याकडे एक डाएटला फसवण्याचा दिवस म्हणजे चीट डे!
मग काय होऊन जाऊ दे बेत झणझणीत वांग्याचं भरीत , ज्वारीची भाकरी आणि थंडगार घरच्या ताज्या दह्याचे घुसळलेले मधुर ताक!

तसं वांग्याचे भरीत हा फक्त महाराष्ट्रातच नाही , तर उत्तर भारतातही पसंत केला जाणारा पदार्थ आहे. खूप वेगवेगळ्या रीतीने भरीत केलं जातं, पंजाबी बैंगन का भरता ,लाहोरी भरता- हे वर्जन्स मी मॅरियट मध्ये काम करताना शिकले आणि माझ्या सासरी म्हणजे बनारस मध्ये प्रसिद्ध असलेल्या लिट्टी चोखा मध्ये चोखा म्हणजे वांग्याचं किवा बटाट्याच कच्चे भरीत बनवलं जातं !
आपल्या महाराष्ट्रातच वेगवेगळ्या तर्हांनी बनवतात, जसे की कच्चे भरीत ,खानदेशी वांग्याचे भरीत आणि आज मी रेसिपी देणार आहे ती एक पद्धत अशा बर्याच पद्धती गावागावांत आढळतील!

माझ्या नवऱ्याला लई म्हणजे लई आवडत भरीत आणि ते सुद्धा ज्वारीच्या भाकरीबरोबर !
चला तर मग मी निघाले स्वयंपाक घराकडे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा , मला कळवायला विसरू नका.

खाली कमेंटमध्ये तुमच्या अभिप्रायांची वाट पाहत आहे….
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- 2 मोठी वांगी भरताची ( 600 ग्रॅम )
- 2 मोठ्या आकाराचे कांदे ( 180 ग्रॅम )
- 1 मध्यम आकाराचा टोमॅटो ( 80 ग्रॅम )
- ¼ ( पाव ) कप कोथिंबीर
- 5-6 हिरव्या मिरच्या
- 8-10 लसूण पाकळ्या
- 1 इंच आल्याचा तुकडा
- ½ टीस्पून मोहरी
- ½ टीस्पून जिरे
- ½ टीस्पून हिंग
- ½ टीस्पून हळद
- 3 टेबलस्पून तेल
- मीठ चवीनुसार
- सर्वप्रथम वांगी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर एका कोरड्या फडक्याने पुसून घ्यावीत. वांग्यांवर उभ्या चिरा मारुन घ्याव्यात आणि थोडा तेलाचा हात लावून गॅसवर जाळावर खरपूस भाजून घ्यावीत.
- वांगी पूर्ण थंड होऊ द्यावीत आणि मगच सोलावीत. जोपयॅंत वांगी थंड होत आहेत तोपर्यंत कांदे, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरावेत.
- एका खलबत्यात लसूण , मिरच्या आणि आले कुटून त्याचा जाडसर ठेचा बनवावा. जर मिक्सर ला वाटायचे असेल तर अजिबात पाणी न घालता फिरवून घ्यावे.
- वांगी थंड झाली की ती सोलून घ्यावीत आणि त्याचा गर चांगला घोटून घेणे. पोटॅटो माशर चा वापर करावा किंवा सुरीने कापून घ्यावे.
- कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडल्यानंतरच जीरे आणि हिंग घालावे. बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यावा.
- कांदा परतून झाला की हळद आणि लसूण, आले, मिरचीचा ठेचा घालावा. मंद आचेवर परतून घ्यावा जोवर आले लसणा चा कच्चे पणा निघून जात नाही.
- जवळ जवळ 4 ते 5 मिनिटे परतल्यानंतर आता बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो लवकर शिजणयासाठी थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर टोमॅटो परतून घ्यावा. नंतर आच मंद करून झाकण ठेवून टोमॅटोला पाणी सुटू द्यावे जेणेकरून तो चांगला मऊ शिजेल.
- टोमॅटो शिजुन त्याला तेल सुटू लागले की त्यात भाजून घेतलेल्या वांग्याचा लगदा घालावा.
- चवीनुसार मीठ घालावे मंद आचेवर हे भरीत चांगले परतावे. भरीत परतताना ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही याची दक्षता घ्यावी . अगदी कडेने तेल सुटेपर्यंत भरीत जवळजवळ सात ते आठ मिनिटे परतावे .
- तयार झाल्यावर त्यात उरलेली कोथिंबीर घालावी आणि कढई आचे वरुन खाली उतरवावी .
- गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर हे भरीत खायला फार छान लागते .आवडत असल्यास बाजूला कच्चा कांदा आणि हिरवी मिरची द्यायला विसरू नका.
- हिवाळ्यात हुर्डा पार्टीला भरीत भाकरी चा खास बेत असतो.
- जर तिखट खायला आवडत असेल तर हिरव्या मिरच्यांचे प्रमाण वाढवायला हरकत नाही.
Leave a Reply