
लग्नानंतर मी आणि पार्टनर पहिल्यांदाच गोव्याला फिरायला गेलो होतो ! तसे मूळची गोव्याची असल्याने कुलदेवीच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा तरी आई बाबांसोबत गोव्यास जाणे व्हायचे माझे…
परंतु ही ट्रिप जरा वेगळी होती…बरोबर ओळखलंत तुम्ही -ही ट्रिप होती आमच्या मधुचंद्राची ! रिसॉर्ट कलंगुड समुद्रकिनाऱ्यावर असल्यानेच आम्ही संध्याकाळी छान खुर्चीत रेलून मावळत्या सूर्याला पाहत गप्पा मारीत बसायचो! त्या भास्कराचा रथ परतीला निघताना जी रंगांची उधळण आकाशात व्हायची , तिला साक्ष ठेवून आम्ही कितीतरी आणाभाका पुढे येणाऱ्या जीवनासाठी घेतल्या आहेत! तुम्हाला माहीतच असेल गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर झोपडीवजा छोटी छोटी हॉटेल म्हणजे शॅक्स असतात ! तिथून आम्ही वेगवेगळी सरबते , नारळ पाणी किंवा आईस क्रीम्स घेऊन आरामात १-२ तास समुद्राची गाज ऐकत बसायचो! एकदा त्यांचा सहज मेनू चाळला तर एका मॉकटॆल ने माझे लक्ष वेधून घेतले . आणि काहीतरी निराळे ट्राय करावे म्हणून मी ऑर्डर दिली ,” टेंडर कोकोनट पंच” ! नावामुळे कळलेच होते कि त्यात शहाळ्याचे पाणी असणार आहे . परंतु ” पंच ” म्हणजे पाच अशी काय बाकी द्रव्ये त्यात वापरली जाणार आहेत याची उत्सुकता होती!
तुम्हाला विश्वास नाही बसणार परंतु ” पंच” ही मॉकटॆलची व्याख्या आपलया भारतीयांकडूनच त्या राणीच्या देशात सतराव्या शतकात गेली आणि नेणारे होते ईस्ट इंडिया कंपनीतले चाकर व काही नौकावाहू ! पंच म्हणजे पाच – या पेयात ५ मुख्य घटक असतात – मदिरा ,साखर , लिंबाचा रस, सुगंधी मसाला आणि पाणी! या टेंडर कोकोनट पंच मध्ये मदिरा सोडून बाकी सारे घटक आहेत जसे की – लिंबाचा रस, वेलची पावडर, शहाळ्याचे पाणी, शहाळ्याचे खोबरे आणि चवीपुरती साखर !
इतकं छान थंडगार आणि ताजेतवाने करणारे ते पंच होते ना की मला दुसरा ग्लास ऑर्डर करायचा मोह आवरलाच नाही ! थोडेफार कोकणी येत असल्याने मी त्या शॅकच्या आचाऱ्याला रेसिपी विचारली आणि त्याने ही खळखळून हसत ” आपल्या डिचोलीचा चेडवा आसा ” करत मला रेसिपी दिली ! खर् सांगू का देशात विदेशात कुठेही जा , तिथली भाषा नाही आली तरी थोडे फार तिथल्या लोकांशी , तिथली मातीशी जराशी बांधिलकी दाखवली ना , माणसे लई जीव लावतात हो , माझा अनुभव आहे ! फक्त तिथल्या संस्कृतीविषयी थोडा प्रेमळ आदर दाखवण्याची गरज आहे !

उन्हाळा सुरु झाला रे झाला की रोज नवरोबा माझ्यासाठी नारळ पाणी घेऊन येतो , तो स्वतः मात्र पीत नाही ! मग मी हे पंच नेहमी बनवते! शरीरात पोटॅशियम ची मात्रा सुधारण्यासाठी , उन्हाळ्यातला उष्माघात टाळण्यासाठी नारळाचे पाणी उत्तम! आता कडाक्याचा उन्हाळा सुरूच झाला आहे ,, मे महिना अजून सरायचाय तर नक्की बनवून पहा हे टेंडर कोकोनट पंच – थोडेसे आंबट गोड आणि ताजेतवाने करणारे !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- ४ कप शहाळ्याचे पाणी
- १ कप शहाळ्याचे खोबरे
- २ टेबलस्पून लिंबाचा रस
- ३ टीस्पून शुगरफ्री पावडर / किंवा साखर घेतली तरी चालेल
- १ टीस्पून वेलची पावडर
- सगळे साहित्य एकत्र मिक्सरमधून फिरवून घ्यावे .
- छान एकत्र मिसळून झाल्यावर फ्रिजमध्ये अर्ध्या तासासाठी थंड होऊ द्यावे.
- मॉकटॆल ग्लास मध्ये सर्व्ह करावे . वरून शहाळ्याचे खोबरे बारीक काप करून घालावे आणि पिण्यास द्यावे.
Leave a Reply