
” भाकरी ” – हा शब्द , नुसता उच्चारला तरी केवढा क्षुधा तृप्तीचा आभास आहे ! आपले हिंदी भाषिक भाऊबंद ” रोटी” या शब्दातून अन्नाला संबोधतात !
तसेच आपल्या महाराष्ट्रात भाकर किंवा भाकरी म्हणजेच पूर्णान्न म्हटले , तरी वावगे ठरणार नाही ! या भाकरीसाठी तर धडपड सारी … पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे सारे जग या गोलाकार भाकरीच्या त्रिज्येत अडकलेलं ! शेतकरी , कष्टकरी , सगळ्या कामगार वर्गाचे हे ताकतीचे खाणे , मग त्यासोबत भाजी असो वा नसो , हाताने बुक्की मारून फोडलेला कांदा, नी तांब्याभर पाणी .. की गडी निघाला कामाचा रगाडा उपसायला !
या साध्या कोरड्या भाकरीचा मोह कवींना ही नाही आवरला . कवयित्री सुखदा जोशी आपल्या कवितेतून , ” असावे तयार करण्या मेहनत तरच म्हटली जाईल ती कष्टाची भाकर” असे म्हणून मेहनतीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात . डाॅ सुभाष कटकदौंड यांच्या आईविषयीच्या भावना ” भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची” अशा शब्दांतून वाचताना हुंदका आवरत नाही , तर समाज परिवर्तनाचा विडा उचललेले कवी नारायण सुर्वे , ” शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली,भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली,,” अशा शब्दांतून पोटासाठी वणवण करणाऱ्या जीवाची घालमेल व्यक्त करताना दिसतात !

भाकरीवरचे मराठी माणसाचे प्रेम अगाध ! दारात आलेल्या वाटसरूला , भिक्षेकरीला , भटक्या कुत्र्याला इतकेच काय गायीला घालताना मायेने तिची मानेखालची पोळी खाजवून, ‘आशीर्वाद असू दे ग बाई.. ‘ असे मायेने म्हटले जाते . रात्री उरलेली भाकरी , कचऱ्याच्या टोपलीत टाकायला मन धजावत नाही . तिचे तुकडे परतून उपमा नाहीतर लाडू बांधून आवडीने खाल्ले जातात .
” एक वेळ मीठ भाकरी खाऊन राहीन पण लांडी लबाडीचा रुपया नाही खाणार कोणचा ..” अशा शब्दांत कोकणी माणूस गावातल्या चावडीवर छातीठोकपणे सांगताना दिसतो . हे सांगताना त्याच्या डोळ्यांतील स्वाभिमान सूर्यासारखा तळपतो ! कोकणात माशांवर , अंगणातल्या ताज्या अनसा – फणसावर , पालेभाज्या- रानभाज्यांवर , काजूच्या बियांवर जितके प्रेम, तितकेच प्रेम तिथे पिकवलया जाणाऱ्या तांदळावर ! वेगवेगळ्या जातीचे तांदूळ कोकणात पिकवले जातात . भात शेतीसाठी लागणारे हवामान , पाणी , मातीचा पोत – निसर्गाने कोकणाला अगदी भरभरून दिलय .

गावठी लाल तांदळाची पेज आणि गुरगुट्या खिमाट खाऊन , बळकट झालेली हाडे .. वय वर्षे ऐंशी पार पडली तरी आमच्या मधू काकांसारखा सुकडी ची सोडणे पाडायला एखादा तरुण गडी सुद्धा पुढे सरसावत नाही . श्रावणात, गणपतीत आंबेमोहराची घट्ट खीर , खापरोळे , सातकाप्याचे घावन , उकडीचे मोदक यांचा घमघमाट घराघरांतून दरवळतो .
नाचणीची भाकरी ही सर्रास बनत असली, तरी जेव्हा भाताची कापणी होते , नी माळ्यावर कणगी , टोपली मोत्यासारख्या तांदळाच्या टपोऱ्या दाण्याने भरली जातात तेव्हा कोकणी बायगोचा आनंद गगनात मावेनासा होतो !
या तांदळाचे पीठ घरीच जात्यावर , घरघंटीत किंवा चक्कीवरुन दळून आणून , मग हळदीच्या पानावर भाजलेल्या मऊसूत पानग्या न्याहारीला , नी जेवणात चुलीवर भाजलेली खरपूस तांदळाची भाकरी हा मेनू बनतोच बनतो . या भाकरीसोबत पावसाळ्यात उगवणारी टाकळा किंवा कुर्डूची भाजी , ओले खोबरे नी कोकम घातलेली तरसवलेली भेंडी , कधी कडव्या वालाची उसळ , नी मांसाहारात कोळंबीचे कालवण , किंवा रापणीवरच्या मिक्स माशांचे खेंगाट , हे असे खाणे म्हणजे निव्वळ सुख ! तुम्हाला ठाऊक आहे ही तांदळाची भाकरी आपल्या कोकणातच नाही तर देशाच्या इतर भागांत सुद्धा खातात ! केरळात पथिरी आणि कर्नाटकात कूर्ग भागात अक्की रोटी म्हणून ओळखली जाते . थोडे फार बनवण्याच्या पद्धतीत बदल , इतकेच काय !
आता श्रावण सुरु झालाय , निसर्ग सढळ हस्ते भाज्या , फळांची बरसात करतो . तर म्हटलं श्रावणाची सुरुवात या पांढऱ्या शुभ्र , पौर्णिमेच्या चंद्रासारख्या तांदळाच्या भाकरीच्या पाककृतीनेच करूया !


- २ कप तांदळाचे पीठ - ३०० ग्रॅम्स ( बासमती तुकडा , इंद्रायणी , आंबेमोहोर , कोलम किंवा कोणत्याही लहान दाण्यांचा तांदूळ ) ,
- २ कप पाणी ( ५०० ml )
- १ टीस्पून मीठ ,
- १ टीस्पून तेल
- एका पातेल्यात २ कप पाणी घेऊन उकळत ठेवावे . त्यात मीठ घालावे .
- पाणी उकळले की आच मंद करून त्यात तांदळाचे पीठ वैरावे . लगेच चमच्याने ढवळून घ्यावे , गुठळी होऊ देऊ नये.
- पीठाने पाणी शोषले की गॅस बंद करावा . पीठ जरासे निवू द्यावे .
- साधारण ३० -४० मिनिटानंतर , पीठ कोमट असतानाच मळायला घ्यावे . हाताला जरासे तेल लावून पीठ मळावे .
- ज्या आकाराची भाकरी बनवायची त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत .
- मध्यम आचेवर तवा गरम करून घ्यावा . पोळपाटावर तांदळाच्या कोरड्या पीठावर भाकरी लाटण्याने पातळ लाटून घ्यावी.
- तव्यावर भाकरी घालावी आणि वरून पाण्याचा हात फिरवावा .
- खालून भाकरी जराशी भाजली कि उलटावी आणि छान खरपूस भाजून घ्यावी . रुमाल किंवा काविन्त्याने दाबून भाकरी फुलवावी .
- अशा प्रकारे सगळ्या भाकऱ्या भाजून घ्याव्यात .
- गरम गरम तांदळाची भाकरी आणि कोणतीही उसळ , मच्छीचा रस्सा , चिकन-मटणाचा रस्सा तसेच पालेभाज्यांसोबत अतिशय चविष्ट लागते !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply