
चहूकडे हर्ष , उल्हास , उत्साहाचे उधाण म्हणजे गणपती उत्सव! निदान मी आपल्यापुरती तरी ही व्याख्या या माझ्या मनुष्यजन्मापुरती मनावर बिंबवून घेतलीये ! या उत्सवाचा जल्लोष गगनापार , आणि मुख्य म्हणजे बाप्पासारखा ” Coolest God ” हा आपल्यासारखाच खाद्यप्रेमी ! त्याला निरनिराळे व्यंजन प्रिय, तुम्ही जे आवडीने, मेहनतीने त्याच्यासाठी बनवाल !
आमच्या कुळाचा गणपती कोकणात जुन्या घरात आणतात आणि पूर्ण मयेकर कुटुंब गणपतीला आवर्जून, पृथ्वीतलावर कुठेही असली तरी एसटीच्या लाल डब्यातून किंवा ट्रेनमध्ये जनरल डब्यात अगदी खाली पथारी पसरून , गावी एकत्र जमतात ! माझा बाबाही त्याला अपवाद नव्हता ! कुळधर्मामुळे आम्ही वेगळा गणपती कधी मुंबईच्या घरात आणणे शक्य नव्हते . परंतु माझ्या आईने केलेला एक नवस फेडण्यासाठी आम्ही ३ वर्षे मुंबईला गणपती आणला .
ते दिवस आजही माझ्या स्मरणात आहेत . पहाटेपासून सुरु झालेली माझ्या आईची लगबग , ते रात्री सुरात गायलेल्या , ढोलकी , टाळांच्या गाजरातल्या आरत्या व कीर्तने आजही माझ्या कानात दुमदुमतात ! नोकरी सांभाळून आईने गणपतीसाठी बनवलेले विविध नैवेद्य , आरतीसाठी चविष्ट प्रसाद यांचा घमघमाट आजही माझ्या नाकाला जाणवतो !

गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी रोज काय बनवायचे या पेक्षा झटपट काय बनवता येईल हा एक यक्षप्रश्न ! त्यात जर माहेरवाशीण गौरी घरात वसली तर तिच्या आवडीनिवडीला प्राधान्य देणे आलेच! महाराष्ट्रात गौरीचे स्वागत भाजी भाकरीने होते , तर तिच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात . कोकणात तिला घावन घाटल्याचा किंवा घारगे खिरीचा नैवेद्य प्रामुख्याने दाखवला जातो ! दोन दिवस माहेरचा पाहुणचार व साधे परंतु रुचकर अशा जेवणाचा आनंद घेतल्यावर तृप्त झालेली ही माहेरवाशीण आपल्या गणपती बाळासकट पतीनिवासी परतते !
मागच्या ब्लॉग मध्ये मी कोकणातली पारंपारिक लाल भोपळ्याची घारग्यांची रेसिपी शेअर केली आहे , आज त्याच घारग्यांसोबत , गौरीच्या ववशांमधे म्हणजेच तिच्या पूजेसाठी सवाष्णींनी भरलेल्या सुपांमध्ये वाढली जाणारी तांदळाची खीर मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे ! ही खीर बनवायला अगदी साधी सोपी , परंतु तिचे वेगळेपण हे तिच्या चवीत जाणवते !
कोकणात खास करून आंबेमोहोर तांदूळ मोदकासारख्या बऱ्याच गोड पदार्थांमध्ये व घावणे , आंबोळी अशा पदार्थांसाठी देखील वापरला जातो . आंब्याच्या मोहोरात आंबराई एका विशिष्ट गोड सुगंधाने बहरून जाते , हाच सुगंध या तांदळालाही असतो , म्हणूनच त्याला आंबेमोहोर म्हणतात ! याचा भात तर इतका चविष्ट लागतो की फक्त घट्ट वरणासोबत वरून साजूक तुपाची धार घालून खाऊनच बघा , ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा! या तांदळामुळेच ही खीर अगदी अवर्णनीय चवीची बनते ! तुम्हाला हा तांदूळ उत्तम प्रतीचा मिळाला तर नक्की वापरा , काही अनुभव हे शब्दांत व्यक्त नाही होत , ते अनुभवायलाच लागतात !
चला तर मग बनवूया तांदळाची खीर !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- तयारीसाठी वेळ : ४० मिनिटे
- शिजवण्यासाठी वेळ : २० मिनिटे
- कितीजणांसाठी पुरेल : ४ ते ५
- साहित्य:
- १ लिटर घट्ट सायीचे दूध ( फुल्ल क्रीम दूध / म्हशीचे )
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स बारीक दाण्याचा तांदूळ ( आंबेमोहोर, किंवा इंद्रायणी किंवा बासमती तुकडा )
- पाऊण कप = १८० ग्रॅम्स साखर ( अधिक गोड आवडत असल्यास साखर थोडी वाढवली तरी चालेल )
- १ टेबलस्पून मनुका
- १ टेबलस्पून काजूचे तुकडे
- २ टेबलस्पून चारोळी
- अर्धा टीस्पून वेलची पावडर
- पाव टीस्पून जायफळ
- तूप
- कृती:
- तांदूळ पाण्याने स्वच्छ धुऊन एका चाळणीत किमान ३० मिनिटे निथळत ठेवावेत. नंतर पाणी निघून गेले की मिक्सरमधून फक्त १० सेकंद फिरवून त्याची जाडसर पावडर करून घ्यावी . खलबत्त्यात किंवा पाट्यावर रवाळ वाटले तर उत्तमच!
- एका मोठ्या जाड बुडाच्या कढईत १ लिटर दूध तापवत ठेवावे. दुधाला उकळी आली की आच मंद करावी , आणि एकदा तळापासून दूध ढवळून घ्यावे . आता वाटलेले तांदूळ घालून लगेचच ढवळावे म्हणजे तांदळाच्या गुठळ्या पडणार नाहीत!. मंद आचेवर तांदूळ दुधात शिजवून घ्यावेत . मधून मधून दूध ढवळत राहावे आणि कढईच्या कडांना लागलेली साय दुधात घालावी म्हणजे खीर चांगली दाट होते .
- खीर शिजतेय तोवर बाजूला एका छोट्या पॅनमध्ये १-२ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात चारोळ्या , काजू आणि मनुका एकामागोमाग एक परतून घ्याव्यात . चारोळ्या आणि काजू खरपूस होई पर्यंत आणि मनुका फुलेपर्यंत परताव्यात , खूपच स्वादिष्ट लागतात!
- साधारण १२ मिनिटांत खीर चांगली दाट होते , आता त्यात साखर घालून ढवळून घेऊ. साखर घातल्यावर थोडे पाणी सुटते . ते आठवायला अजून अजून ७-८ मिनिटे खीर मंद आचेवर शिजवून घेऊ .
- आता सरतेशेवटी तुपात परतलेला सुका मेवा , वेलची पावडर , व जायफळ पावडर घालून नीट ढवळून घेऊ. खीर तयार आहे . गॅस बंद करून झाकण घालून ठेवू . ही खीर हलकी गरम असताना किंवा फ्रिजमध्ये थंड करून सुद्धा खायला खूप छान लागते .
- गौरी गणपतीच्या नैवेद्यात घारग्यांसोबत किंवा पुऱ्यांसोबत ही खीर म्हणजे आनंदाची पर्वणीच!
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply