
आठवड्याचे सात वार परंतु आताशा माझ्यासाठी दोनच पद्धतींचा दिवस उजाडतो . एक म्हणजे रेसिपी शूटचा दिवस , मग ती रेसिपी कोणतीही असो , त्यानंतर चा पसरलेला ओटा आणि घर आवरताना कोणालाही वाटेल की गावजेवण घडले की काय इथे ! दुसरा दिवस म्हणजे स्वतःचे आणि घरातले चटकन आवरून , सकाळपासून ते रात्रीपर्यंत लॅपटॉप वर सोशल मीडिया अकाउंट पाहणे , ब्लॉग्स लिहिणे , विडिओ एडिटिंग अशी कामे करण्यासाठी , मी गणपती चौरंगावर बसतात तशी आपली जागा पकडते !
अशा वेळेला स्वयंपाकघरात जास्त वेळ काढायला मला आवडत नाही किंबहुना तितका वेळ द्यायला मला परवडत नाही . मग या प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक पाहून दिवसभरातली खाण्यापिण्याच्या तयारी , नवऱ्याचा डबा याचे प्लॅनिन्ग आमचे आठवड्याच्या सुरवातीलाच लिहून ठेवले जाते !
म्हणूनच आजच्या रेसिपी शूट साठी आणलेली सुरमई साफ करताना माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटतायेत कारण रात्रीच्या जेवणाची अर्धी लढाई जिंकली की हो !

तसे हे सणासुदीचे दिवस , गणपतीत बरेच गोड खाणे झाल्यामुळे जीभ तिखटाचा जाळ सोसायला आसुसलेली .. त्यात माझ्या मासेवाल्याचा मेसेजवर मेसेज – ताई ताजे बोंबील आलेत , सुरमई मोठी आहे , काढून ठेवतो तुमच्यासाठी , या लवकर…! मग पार्टनरने बोटानेच इशारा करत ” लाव रे तो विडिओ SSS ..” च्या स्टाईल मध्ये ” आण ग तो सुरमई, पापलेट ..” म्हटल्यावर मी थडकले त्याच्या दुकानावर ! मस्त मध्यम आकाराची सुरमई मिळाली , तुम्ही मोठी सुरमई घेतली तरी चालेल , कारण आज मी सुरमई तवा फ्राय बनवणार आहे !
सुरमई मासा हा सगळ्यांशी फ्रेंडली , एक तर याला स्वतःची अशी उग्रट चव नसते , दिसायला चकचकीत चंदेरी काळसर रंगाचा , आणि पातळ कातडीचा ! फिश फ्राय , कटलेट अशासाठी एकदम उत्तम … माझ्या कित्येक मित्र मैत्रिणींनी मत्स्याहार या सुरमईपासूनच सुरु केला आहे . मी पहिल्यापासूनच मासे घरी साफ करते , जरी आम्हाला कलिनरी स्कूल मध्ये एक प्रॅक्टिकल ” फ़िश CLEANING ” वर झाले होते तरी मी म्हणेन यात माझा गुरु म्हणजे बाबा ! कुठलाही मासा व कुर्ल्या मस्त साफ करतो , आणि ते पाहणाऱ्याला अजिबात किळस न वाटता ! रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावर जन्म घेणारा ,आईच्या पोटातूनच जणू माशांची दोस्ती करून येतो !

सुरमई साफ करणे म्हणजे एकदम सोप्पे काम, तिला जास्त खवले किंबहुना नसतातच असे म्हटलेत तरी चालेल ! डोक्याजवळचा भाग कापून पोटातली घाण अलगद बाहेर निघते . थोडी तिरकस कापून साधारण अर्धा इंच जाडीचे तुकडे करणे एकदम बेश्ट , त्याने सुरमईचा तुकडा जरा लांबट दिसतो . तुम्ही तुमच्या मासेवाल्याला सांगून मासे तिरकस कापून घेऊ शकता !
या सुरमई तवा फ्राय ची रेसिपी कोकणातलीच , थोडा वेगळा मसाला वाटून ; तुम्हाला खाली रेसिपी मध्ये कळेलच . या पद्धतीने तळलेली सुरमई तुम्ही साध्या फोडणीच्या वरण किंवा आमटीभातासोबत खाऊ शकता … माशाचे कालवण सोबत असेल तर क्या बात ! पाहुणे येणार असतील किंवा पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनही ही भन्नाट लागते ! म्हणूनच मी मध्यम आकाराची सुरमई घ्या म्हटले 🙂
मी आमटीसाठी कुकर लावलाच आहे , तुम्ही तोपर्यंत रेसिपी वाचून घ्या !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १० ताज्या सुरमईचे तुकडे
- १ लिंबाचा रस
- १ टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून मीठ
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १ टेबलस्पून बेडगी मिरची पावडर
- १ टेबलस्पून आले लसणाची पेस्ट
- दीड टीस्पून जिरे
- १ टीस्पून काळी मिरे
- १०-१२ कढीपत्ता
- १ टेबलस्पून धणे
- मीठ
- तेल
- सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन एका कापडाने जास्तीचे पाणी टिपून घ्यावे. एका बाऊलमध्ये हळद, मीठ आणि लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्यावे. सुरमईच्या तुकड्यांना हे मिश्रण लावून १० मिनिटे मुरत ठेवावे.
- तोपर्यंत वाटण वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात कांद्याचे तुकडे,आले लसणाची पेस्ट , काळी मिरी , लाल मिरची पूड, धणे पावडर , जिरे , कढीपत्ता, आणि मीठ घालून थोडे पाणी घालुन घट्ट पेस्ट वाटून घ्यावी . फार पातळ करू नये नाहीतर माशांवर लावता येणार नाही.
- ही पेस्ट माशांवर दोन्ही बाजूंनी लावून ३० ते ४५ मिनिटे मासे फ्रिजमध्ये ठेवावेत . म्हणजे मासे तळताना मसाला नीट चिकटून राहतो , तेलात पसरत नाही . व मासे हाताळायला सोप्पे जातात .
- ३० ते ४५ मिनिटांनंतर एका पसरट तव्यात ३ टेबलस्पून तेल घालून गरम करावे . आच मंद करून मासे तळून घ्यावेत. एका बाजूने ४-५ मिनिटे तळल्यानंतर मासे पलटून दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवर तळून घ्यावे .
- हे मासे भाकरीसोबत , भातासोबत तर उत्तमच लागतात परंतु स्टार्टर म्हणून तुमच्या पार्टीत बनवू शकता !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply