
मराठी व्याकरणात ” विशेषण ” हा एक थोर प्रकार आहे . एखाद्याच्या बोलण्यात या विशेषणांची अचूक , चपखल पखरण असली ना की ऐकणाऱ्यांवर त्या व्यक्तीची आपसूकच भुरळ पडते . तसेच खाद्यपदार्थांचे सुद्धा आहे .. एखाद्या गृहिणीला तिच्या रांधपाची तारीफ करताना “चांगले जेवण झालेय हां वहिनी..” असे नुसते म्हणण्यापेक्षा , ” काय लुसलुशीत मोदक झालेत किंवा खरपूस भाकरी झालीय, मिसळ तर एकदम चमचमीत , मजा आली .” असे म्हणून पहा .. ती दमलेली अन्नपूर्णा , कशी दवबिंदूचा शिडकावा झाल्यावर गुलाबाचा ताटवा तरतरीत दिसतो तशी खुलून येईल . आपली समृद्ध मायमराठी सुद्धा ‘अमृतातेहि पैजा जिंके ‘ इतकी गोड नाही का ? आले ना विशेषण …… काही विशेषणे तर इतकी स्पष्ट की पुढे काही स्पष्टीकरणाची गरजच भासत नाही . म्हणजे खुसखुशीत म्हटले की कचोरी , चुरचुरीत म्हटले की फोडणी, कुरकुरीत म्हणजे भजी , करकरीत कैरीची फोड तसे सुरेश वाडकरांचा आवाज ऐकला की एकच विशेषण आठवते ते म्हणजे ” मधाळ ” ! आणि लाडू म्हटले की तुपाळ , रवाळ या विशेषणांनी त्यांची पारख झालीच म्हणून समजा !
आता हळूहळू मी माझ्या मूळ विषयावर आले बरं का . … ‘लाडू’ हा मुळात एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो आणि तो मी लवकर घेऊन येणारच आहे . आता दोन दिवसांवर दिवाळी आलीय आणि साधारण महिनाभर आधीपासूनच आपली दिवाळीची लगबग तशी सुरु होते . टीवीवर जाहिरातींना ऊत आलेला असतो . ” या दिवाळीत लाडू दोन, एक रवा नी दुसरा बेसन.. ” प्रसिध्द चिवडा मसाल्याच्या टीवीवर झळकणाऱ्या जाहिरातीतील हे जिंगल … त्यात मी आपले आवडते लाडू बसवले हो! लाडवांशिवाय दिवाळीच काय आपल्या आयुष्यातील कोणताही प्रसंग साजरा होत नाही असे मला वाटते ! दिवाळीत कितीही बाहेरच्या मिठाया आणल्या तरी घरी बनवलेल्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांना एक वेगळाच मान ! म्हणजे आमच्या घरी लक्ष्मीपूजनाला मुरड घातलेल्या करंज्या , आणि दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानाच्या दिवशी सजलेल्या फराळाच्या ताटात बेसनाचा आणि रव्याचा लाडू अगदी खेटून बसलेले हवेतच .

एका महाराष्ट्रयीन घरात महिन्याच्या वाणसामानात डाळ, तांदूळ , रवा , बेसन , पोहे हे पंच फिक्स असतात . मला नाही वाटत याला कोणाचा आक्षेप असेल , हो ना ? अहो हे सगळे आपल्यासाठी एक पूर्ण अन्न बनवण्याची सामग्री आहे . त्यातून रवा म्हणजे हाताशी रेडी असावा असा आयटेम .. नाश्त्याला सांजा, उपमा, आंबोळ्या तर गोडात शिरा , खीर ! पुऱ्या , भजी, मासे कुरकुरीत करायचे असतील तर घाला थोडा रवा , असा बहुउपयोगी हा रवा ! घरातील आबाल – वृद्ध , वजनावर लक्ष ठेवणारे तसेच मधुमेही सगळ्यांचे रव्याशी सूत जमलेले ! मग दिवाळीच्या फराळात याला डावलून कसे चालेल हो ?

आज मी आमच्या घरात दिवाळी फराळासाठी बनवले जाणारे रव्याचे लाडू तुमच्यासाठी घेऊन आले आहे. व्हिडिओ मध्ये तसेच खाली कृतीत दिलेल्या टिप्स नक्की लक्षात घ्या , आईने चारचारदा मला बजावून सांगितल्या होत्या ! कसे आहे ना , या पोष्टातल्या रिटायर्ड मयेकर बाई म्हणजे आमच्या आईसाहेब , कामात जेवढ्या तत्पर होत्या तेवढ्याच त्यांच्या स्वयंपाककलेसाठी सुद्धा कार्यालयातील सहचारी आणि सहचारिण्यांमध्ये फेमस ! आजचे रव्याचे लाडू हे तिच्याच
स्वयंपाकघरातल्या अनुभवांच्या पोतडीतले .. बिनपाकाचे ! बनवायला अतिशय सोप्पे . तोंडात हलकेच विरघळणारा त्यांचा गोडवा आणि वेलदोडे तुपाचा साजूक सुगंध.. महत्त्वाचे म्हणजे बरेच दिवस टिकणारे हे लाडू लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी उत्तम.. तसेच घरातील कामांचा डोंगर फोडताना मध्येच जरा स्टुलावर विसावून एक लाडू गट्टम करून पाणी प्यायलात की होते ना एकदम एनर्जी बूस्ट !

या कृतीशिवाय अजून थोड्या वेगळ्या पद्धतीचे रव्याचे लाडू , ओलं खोबरं घालून , आई श्रावणातलया आमच्या ग्रामदेवतेच्या सप्ताहात पारायणाला बसलेल्यांना खाऊ घालते . पारायणांनंतर घरी परतताना बाबांसोबत आलेले गावातले काका मंडळी आईला अंगणातूनच हाळी देतात , ” शारदे वयनी , लाडू झकास वळलेस गो , एकदा जेवूक येतंय .. ” आई हसतच उत्तरते , ” होय होय या सगळे जेवायला ..” मग हा कंपू हात हलवत पुढे आपापल्या घरांकडे वळतो !
ही रेसिपी पुढे एका खास सणाच्या निमित्ताने मी तुमच्यासोबत शेअर करीनच . आता आजचे हे बिनपाकाचे रव्याचे लाडू बनवण्यासाठी जे स्वयंपाक घरातील विज्ञान जाणून घेणे गरजेचे आहे , त्यासंदर्भात थोडेसे :
१. रवा तुपात भाजताना मंद आचेवर भाजावा , म्हणजे त्यातील प्रथिनांचे बंध तुटून त्यांचा नैसर्गिक आकार बदलतो आणि ते प्रसरण पावतात . भाजलेला रवा म्हणूनच सोनेरी रंगाचा आणि थोड्या मोकळ्या , मोठ्या कणांचा दिसतो .
२. या फुललेल्या कणांत तूप शोषून घेण्याची क्षमता असते परंतु तूप थोडे थोडे घालावे. म्हणजे लाडू रवाळ, खुसखुशीत लागतो !
३. रवा जास्त वेळ भाजला गेला तर त्याचा रंग तपकिरी येतो आणि तुटलेले प्रथिनांचे बंध परत जाळे विणायला लागतात मात्र यावेळी लाडवाचे टेक्स्चर चिवट होऊ शकते आणि अति तूप झाले तर लाडू तुपकट होऊन वळला जात नाही .
नक्की करून पहा हे रव्याचे लाडू ! आपणां सर्वांना ही दीपावली आणि नवीन वर्ष सुख , समृद्धी , आणि उत्तम आरोग्याचे जावो ही सदिच्छा !


- तयारीसाठी वेळ: २० मिनिटे
- बनवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
- किती बनतील : २०-२५
- साहित्य:
- २ १/२ कप = ५०० ग्रॅम्स बारीक रवा
- २२५ ग्रॅम्स तूप ( वितळवून )
- १ टेबलस्पून बदामाचे काप
- १ टेबलस्पून काजूचे तुकडे
- १ टेबलस्पून चारोळे
- १ टेबलस्पून मनुका
- ५-६ हिरव्या वेलच्या कुटून, जाडसर पावडर करून
- १ १/४ कप पिठीसाखर ( २५० ग्रॅम्स )
- कृती:
- आपल्याला एका जाड बुडाच्या कढईत तुपात रवा बॅचेस मध्ये भाजून घ्यायचा आहे . थोडे थोडे तूप घालून मंद आचेवर रवा भाजावयास सुरुवात करावी . रवा सोनेरी रंगावर भाजायचा आहे , अजिबात तपकिरी होऊ दयायचा नाही , नाहीतर लाडू दिसायला चांगले राहणार नाहीत .
- रवा भाजताना कोरडा दिसू लागला की अजून तूप घालावे . असे करून आपण रव्याची एक बॅच १० मिनिटे सोनेरी रंगावर भाजून घेतली आहे . भाजलेला रवा पूर्ण थंड झाल्यावर एका हवाबंद डब्यात ठेवून किमान एक दिवस ठेवावा म्हणजे तूप त्यात चांगले मुरते. हा रवा ३-४ दिवस ठेवून तुम्ही त्यानंतरही लाडू बांधायला घेऊ शकता .
- ज्या दिवशी लाडू बांधायचे आहेत , त्या दिवशी १-२ टेबलस्पून तुपात बदाम, काजू नी चारोळे हलके परतून घ्यावेत . मनुका तुपात परतू नयेत.
- एका परातीत डब्यात ठेवलेला रवा काढून घ्यावा आणि हाताने मोकळा करून घ्यावा . त्यात पिठीसाखर , वेलची पावडर घालून हाताने व्यवसहित मिक्स करून घ्यावी . आता तुपात परतलेले बदाम, काजू आणि चारोळे तसेच मनुका घालाव्यात . नीट एकत्र करून घ्यावे .
- आता रव्याच्या मिश्रणाचे २ भाग करावेत , आणि एका भागात थोडे थोडे कोमट तूप मिसळून आपल्याला आवडतील त्या आकारात लाडू घट्ट वळून घ्यावेत . पहिल्यांदा लाडू कोरडे वाटले तरी लाडू वळले जातात .
- हे लाडू खराब न होता चांगले महिनाभर टिकतात !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply