
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपली सगळी दिनचर्या ही घड्याळ्याच्या काट्यांभोवती बांधली गेलीय! सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा एकेक तास कुठल्या ना कुठल्या तरी टास्कशी निगडित असतो.
या सगळ्या कामाचा रगाडा उपसायला खाणेपिणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. आजकाल सगळीकडे हेल्थ संबंधित बरेच वारे वाहतायत , गल्लोगल्ली निरनिराळ्या जिमचे , फंकशनल ट्रैनिंग्स चे पेव फुटलंय! आता यात व्यावसायिकतेचा भाग सोडला तर , हा जो बदल मागच्या काही वर्षांत घडून आलाय तो नक्कीच स्पृहणीय आहे. जवळजवळ ६५% पेक्षा जास्त मनुष्यबळ ३५ वर्षाखालील वयोगटात असलेल्या , प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या भारतासारख्या राष्ट्राला आरोग्य संपन्न राहणे खरंच गरजेचे आहे ! मला तर असे वाटते , हरितक्रांती , श्वेतक्रांती सारखे यशस्वी उपक्रम राबवणारा आपला देश नक्कीच भविष्यात आरोग्यक्रांती सुद्धा घडवेल.
एवढ्या घाईच्या दिनक्रमात सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सकाळचा नाश्ता किंवा न्याहारी ! रोज नाश्त्याला काय करावे हा एक यक्षप्रश्न असतोच! कारण आपण भारतीय आपल्या जिभेचे गुलाम आहोत, नुसते हेल्थी हेल्थी चालत नाही हो आपल्याला , त्यात देशी तडका बसलाच पाहिजे नव्ह!

भारत ही जागतिक बाजारपेठ आहे , आणि बऱ्याच ग्लोबल फूडने आपल्या नेहेमीच्या खाण्यात धडाकेबाज एन्ट्री केली आहे. त्यातच एक आहे ओट्स हे धान्य किंवा ज्याला ओटमील असेही म्हटले जाते. आयरिश इतिहासात ह्याचा उल्लेख आढळतो. त्यांच्या रोजच्या खाण्यात पॉरिज या खीरसदृश पदार्थात ओट्स चा वापर केला जातो. पूर्वी इंग्लंडमध्ये घोड्यांच्या ताकदीच्या खाण्यात ओट्स खाऊ घातले जायचे . नंतर अमेरिकेत एका रिसर्च पेपर मध्ये ओट्स चे फायदे विस्तृत रुपात जगासमोर मांडले गेले. याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय फायबर , कोलेस्ट्रॉल नियंत्रित करायला मदत करतो. मधुमेहींसाठी आणि वजन कमी किंवा नियंत्रित करणाऱ्यांसाठी हा अगदी उत्तम पर्याय !
म्हणूनच आज विचार केला की घरात ओट्स चे पॅकेट मला खुणावतेय तर होऊन जाऊ दे धडाकेबाज नाश्टा ! आता प्रामाणिकपणे सांगते पॉरिज वगैरे रोज खाणे हा काय आपला प्रांत नाही… म्हणून इडल्यांची तयारी करायला घेतलीये ….. हो हो बरोबर वाचलेय तुम्ही ! आज आपण ओट्सच्या इडल्या बनवणार आहोत , चला तर लागूया कामाला !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १ कप = १०० ग्रॅम्स रोल्ड ओट्स
- १/२ कप = १०० ग्रॅम्स बारीक रवा
- १/४ कप ताजे किंवा फ्रोझन मटार
- १/४ कप किसलेले गाजर
- १/४ कप फरसबी बारीक चिरून
- १/२ कप = १२५ ग्रॅम्स दही
- तेल
- ५-६ कढीपत्ता
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून उडीद डाळ
- १ टीस्पून चणा डाळ
- १/२ इंच आले किसून
- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १/२ टीस्पून खाण्याचा सोडा ( किंवा १ टीस्पून फ्रुट सॉल्ट / इनो )
- २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
- मीठ
- सर्वप्रथम ओट्सना एका पॅन मध्ये भाजून घेऊ. ३ मिनिटे मध्यम आचेवर ओट्स भाजले कि त्यांचा रंग छान खरपूस करडा होतो. एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावेत.
- आता रवा भाजून घेऊ. बारीक आगीवर नीट लक्ष देऊन रवा खरपूस भाजावा . एका ताटलीत काढून थंड होऊ द्यावा.
- आता आपण भाज्या शिजवून घेऊ. पॅनमध्ये १ १/२ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. मोहरी, उडीद डाळ ,आणि चण्याची डाळ घालून तडतडू द्यावी. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि आले घालून परतावे . ३० सेकण्ड परतल्यानंतर मटारचे दाणे, फरसबी आणि गाजर घालून मिसळून घ्यावे. मीठही घालावे. झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे.
- ३ मिनिटांत भाज्या बऱ्यापैकी शिजतात, या उप्पर त्या इडलीसमवेत वाफेवर अजून शिजणार आहेत. कोथिंबीर घालून, ढवळून गॅस वरून उतरवावे.
- ओट्स थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची एकदम बारीक पावडर करून घेऊ. आता आपण इडलीचे मिश्रण बनवायला घेऊ. एका मोठ्या बाऊल मध्ये रवा, ओट्सची पावडर मिसळून घेऊ. शिजलेल्या भाज्या घालू . दही घालून ढवळून घेऊ. चवीपुरते मीठ घालू. आता मिश्रण चमच्यातून पडेल इतके पातळ होईपर्यंत पाणी घालू. जास्त घट्ट वा पातळ करू नये.
- जवळजवळ अर्धा कप पाणी मी वापरले आहे. आता खाण्याचा सोडा घालून मिश्रण एकाच दिशेने ढवळून घेऊ. हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे.
- १५ मिनिटांनंतर इडल्या वाफवण्यासाठी स्टिमर मध्ये पाणी उकळावयास ठेवू. इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावून त्यात इडलीचे मिश्रण घालून घेऊ.
- मंद ते मध्यम आचेवर झाकण घालून इडल्या १५ मिनिटे वाफवून घेऊ. स्टिमर मधून काढून जरा थंड झाल्यावर सुरीने काढून घेऊ.
- इतक्या साहित्यात १२-१५ इडल्या बनतात . नारळाची चटणी , टोमॅटोची चटणी किंवा ब्रेकफास्ट सांबार सोबत खायला द्याव्यात. चटणी आणि सांबाराची रेसिपीस आमच्या हिंदी चॅनेल व इंग्रजी वेबसाइट वर उपलब्ध आहेत .
Leave a Reply