
‘Eat breakfast like a king, lunch like a prince and dinner like a pauper”
इंग्रजीतली हि उक्ती नकळत आरोग्यदायी दिनचर्येचे गुपित सांगून जाते. रात्रीच्या जेवणानंतर ते सकाळी उठेपर्यंतचा उपवास हा सकाळच्या नाश्त्याच्या रूपात तोडला जावा असे आयुर्वेदही म्हणते. सकाळी भरपेट खाऊन कामासाठी बाहेर पडताना खरंच शरीराप्रमाणे मनही ताजेतवाने होते , आणि दिवसभराच्या कामाचा रगाडा उपसायला आपण तयार ! आपण भारतीय ना , खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी नशीबवान ! आपापल्या घरात बनणारे व्यंजन तर आहेतच परंतु देशाच्या विविध भागांतून प्रसिद्ध झालेले इडली, डोसे , पराठे सारख्या चविष्ट पदार्थांनी आपल्या स्वयंपाकघरात कधी प्रवेश केला हे कळलेच नाही !

पराठा हा असाच एक नाश्त्याचा प्रकार . म्हटले तर उत्तर भारताचा , परंतु आज देशात कुठल्याही भागात अगदी रस्त्यावर ठेले लावून विकला जातो. मला आठवतेय पुण्यात नोकरीला लागल्यावर पहिला एक महिना तरी रोज संध्याकाळच्या जेवणात मी हेच वेगवेगळे पराठे गाडीवर उभे राहून मिटक्या मारत खाल्लेत. मला हे भरलेले पराठे म्हंजे जीव कि प्राण ! एक मसाला डोसा आणि दुसरा पराठा – हे जर नाश्त्यात असेल तर आपली स्वारी खुश!
या थंडीच्या दिवसांत बाजारात मस्त मस्त ताजे मूळे यायला लागलेत. तर आज विचार केला कि नाश्त्यात हेच दणदणीत मुळ्याचे पराठे बनवते !
एक पराठा खाऊन पोट इतके छान भरते ना कि ज्या दिवशी ऑफिस मध्ये खूप कामामुळे दुपारच्या जेवणासाठी वेळ नाही मिळणारेय त्या दिवशी हे नक्की बनवा आणि आरशासमोर उभे राहून स्वतःच्या तृप्त छबीला एकदा विचारा ,” Hows the Josh ? “, तुमचे मन नक्की जोशात म्हणेल ” High Sir !”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ३ कप = ४५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- मीठ
- तेल
- ३ मोठ्या आकाराचे मुळे = ७०० ग्रॅम्स - धुऊन, साले काढून आणि किसून
- १/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १/२ कप = १०० ग्रॅम्स पनीर
- ५-६ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १ इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
- १ टीस्पून हळद
- १/२ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड
- १ टीस्पून धणे पावडर
- १/२ टीस्पून गरम मसाला पावडर
- १/२ टीस्पून चाट मसाला ( आमचूर पावडर वापरली तरी चालेल )
- सर्वप्रथम किसलेल्या मुळ्याला हाताने दाबून त्यातले पाणी चाळणीतून काढून एका भांड्यात काढून घ्यावे. नंतर मुळ्याला चाळणीत थोडा वेळ राहू द्यावे. मुळ्याचे पाणी फेकून न देता पराठ्याचे पीठ मळताना त्याचा वापर करावा.
- परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि १ टेबलस्पून तेल घालून मिसळून घ्यावे. मुळ्याचे गाळलेले पाणी वापरून पराठ्याची सैलसर कणिक मळून घ्यावी.
- जवळजवळ आपण दीड कप पाणी वापरून पीठ मळले आहे. कणकेला तेलाचा हात लावून झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.
- पराठ्याचे सारण बनवण्यासाठी एका भांड्यात किसलेला मुळा , किसलेले पनीर, चिरलेल्या मिरच्या, किसलेले आले, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, धणे पावडर, लाल मिरची पूड, गरम मसाला पावडर , चाट मसाला आणि चविनुसार मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावे.
- पनीर मुळे सारणाला एक घट्टपणा येऊन ते पराठ्यात नीट पसरले जाते.
- सारण तयार झाले आहे आणि कणकेलाही झाकून १५ मिनिटे झाली आहेत.
- ज्या आकाराचे आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्या आकाराचे आपण कणकेचे गोळे बनवून घेऊ. कोरडे पीठ लावून दोन पातळ पोळ्या लाटून घेऊ. एका पोळीवर सारण पसरवून घ्यावे. पोळीच्या कडांपर्यंत सारण पसरवावे आणि एक थर लावून घ्यावा. पोळीच्या कडांना थोडे पाणी लावून त्यावर दुसरी पोळी ठेवून हाताने हलके दाबून दोन्ही पोळ्या एकमेकींना नीट चिकटवून घ्याव्यात .
- लाटण्याने पराठा हलक्या हाताने लाटून घ्यावा जेणेकरून सारण पसरले जाईल. पराठा लाटून तयार झाला आहे , आता आपण तो भाजून घेऊ.
- तवा चांगला तापला कि पराठा दोन्ही बाजूंनी चांगला तेल लावून भाजून घेऊ.
- मुळ्याचा पराठा तयार आहे . घट्ट सायीचे दही आणि लोणच्याबरोबर गरम गरम नाश्त्यासाठी वाढावा !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply