
चैत्र वैशाखाच्या या दिवसांत सूर्य आग ओकायला लागतो ! शरीरातही कफ , पित्ताची वाढलेली मात्रा शमवण्यासाठी पोटाला थंड असे खाण्याची इच्छा होते.
कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात .
कर्नाटकातलया खाद्यसंस्कृतीत सात्त्विक जेवणात निरनिराळ्या कोशिंबिरी बनवल्या जातात ! तसे महारष्ट्रात बनणाऱ्या कोशिंबिरीच्याच ह्या जुळ्या बहिणी , परंतु या कोशिंबिरींत डाळींचा वापर केला जातो. कांदा लसूण वर्ज्य केल्यामुळे ह्या कोशिंबिरी मंदिरांमध्ये नैवेद्य थाळीत आणि प्रसाद म्हणूनही वाटल्या जातात ! अशा ह्या आपल्या पारंपरिक पाककृती ज्या फक्त स्वादिष्टच नाहीत तर ऋतुमानाप्रमाणे आहारात समाविष्ट केल्या तर आरोग्यवर्धक सुद्धा आहेत. वजन कमी करण्यासाठी ह्या कोशिंबिरी सॅलड बाउल्स म्हणूनही उत्तम!
नक्की करून पहा ही कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर!
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- १०० ग्रॅम्स मूग डाळ - पाण्याने स्वच्छ धुऊन २ तास पाण्यात भिजत घालावी
- २५० ग्रॅम्स काकडी ( चौकोनी तुकडे करून )
- १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
- मीठ चवीनुसार
- २ टेबलस्पून लिंबाचा रस
- ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १ - १/२ टीस्पून साखर
- १/४ कप ओल्या नारळाचा चव
- १ टेबलस्पून तूप
- १ टीस्पून मोहरी
- चुटकीभर हिंग
- १ टेबलस्पून उडीद डाळ
- एका मोठ्या भांड्यात काकडीचे तुकडे, भिजवलेली मूग डाळ , हिरव्या मिरच्या , मीठ, साखर , लिंबाचा रस, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र मिसळून घ्यावी.
- फोडणीसाठी १ टेबलस्पून तूप गरम करावे. त्यात उडीद डाळ टाकून ती खरपूस रंगावर येईस्तोवर परतून घ्यावी. फक्त करपू देऊ नये. मग मोहरी घालून तडतडू द्यावी. हिंग घालून परतून घ्यावे. ही फोडणी कोशिंबिरीवर घालून मिसळून घ्यावी. वरून ओले खोबरे भुरभुरावे. झाली आपली कोशिंबीर तयार !
Leave a Reply