
” लहेजा जरा ठंडा रखें जनाब, गरम तो हमें सिर्फ चाय पसंद है!”, असा इशारात्मक संदेश असो की ” चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !” ,अशी चहाच्या दुकानातील पाटी असो , आणि अगदीच जरासा गजल चा “कभी देखा ही नहीं मौसम मैने , ‘तेरी तलब रही हमेशा चाय कि तरह !” असा गुलाबी अंदाज असो, काश्मीर ते कन्याकुमारी , गल्ली ते दिल्ली , पायवाट ते हायवे , जिकडे तिकडे व्यापून गेलाय आपले आयुष्य, हा ‘चहा ‘!
ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ” माझा मराठीची बोलू कौतुके , परि अमृतातेहि पैजासी जिंके !” मराठी भाषेप्रमाणे अमृतालाही जिंकू शकेल असे अजून जे या धरतीवर आहे, ते म्हणजे “चहा” असे माझे मत आहे बुवा !
अगदी सात – आठ महिन्यांची होते तेव्हापासून आजोळी राहत असताना , अमका आला .. लग्न ठरल्याचे पेढे घेऊन , तमक्याची गाय व्याली .. आला चीक घेऊन , अशा लहान मोठ्या कारणासाठी सुद्धा , ” जेवायला थांबीत न्हाईस तर वाईच चा घेऊन जा ,” असे म्हणून भायखळ्याच्या चाळीतला ओट्यावरचा स्टोव्ह वेळी अवेळी ढणाणा करायला लागायचा . मग ते पातेल्यातले कषाय द्रव्य पेल्यात ( फुलपात्र ) ओतून पाहुण्याच्या हातात दिल्यावर , ज्या तऱ्हेचे भावरस पिणार्याच्या चेहऱ्यावर दाटून यायचे , ते माझ्या इवल्या इवल्या डोळ्यांनी टिपून घेतले होते . आणि मला का ही दुधाची बाटली चोखायला दिलीय या रागाने , मी त्या पाहुण्याच्या लाडाने बिलकुल भारावून न जाता त्याचे कपडे ओले केल्याचे मला, सॉरी.. माझ्या मातापित्यांना स्मरते ! मावशी सकाळी लवकर उठून गारमेंट शॉप ला नोकरीला जायची ,त्यामुळे घरात सकाळी पाच वाजताच चहाचा दुधाळ सुगंध पसरायचा . मामा दिवसभर डॉकयार्ड ची नोकरी करून रात्री नाईट कॉलेजला निघायचा , तेव्हा जेवणांनंतर २ घोट चहा पिऊन, दिवसभराचा शीण घालवायचा प्रयत्न करायचा बापुडा ! तेव्हाचा चहा मात्र कड्डक असायचा … मेंदू तल्लख करणारा , काळी मिरी आणि आले अंमळ जास्तच ठेचून घातलेला !

माझी आजी उत्तम गोधड्या शिवायची , तिच्या हाताने शिवलेली ठिगळांची गोधडी आणि गोधडीवरची बारीक टीप पाहून , ‘राजा सुद्धा गळ्यातला मोत्याचा कंठा बक्षीस म्हणून देईल ‘, अशी तिची आजूबाजूच्या चाळींत ख्याती ! तर दुपारी जरा आवराआवर झाली आणि चाळीत सामसूम झाली की कॉमन गॅलरीत छानपैकी मोट्ठीच्या मोठ्ठी गोधडी शिवायला घ्यायची . मग स्वतःसाठी एक कप कोऱ्या चहाचे आधण ठेवायची , आणि एकेक घोट चहाचा नी शंभर टाके गोधडीला ! खालच्या मजल्यावरचे भार्गव मामाआजोबा कधी कधी गावचा वानवळा घेऊन यायचे , तेव्हा आपल्या झुबकेदार मिश्यांना चहाचा अभिषेक करीत बशीतून ” फुर्रर सूर्रर्रर्र ” करीत अस्सल मालवणीत संभाषण करीत ! तेव्हा त्यांच्या पैरणीच्या खिशातून माझ्यासाठी चिक्की काढून द्यायचे , माझे हात मात्र त्यांचा कप हिसकावून घेण्याच्या तयारीत असत .. त्यातच एखादा धपाटा नी नंतरचे शास्त्रापुरते भोकांड..

या चहा प्रेमात माझी आई नी बाबा सुद्धा कमी नाहीत बरं का ! आईच्या वागण्यात केन्द्रीय सरकारी खात्याची शिस्त आणि त्यातून हेड पोस्टातल्या सुपरवायझर बाई .. म्हणजे दिवसातून दोनदा ऑफिसमध्ये चहा ठरलेला ! न लागणाऱ्या हिशेबाने त्रस्त होऊन , एक चहा पोटात गेला की कधीचकन पटापट एक दोन महिने अडकलेले बाइंडर्स, हे हातासरशी पूर्ण व्हायचे . बाबाचा कारभार वेगळा .. गावात टाईमपास करायचा तर , ” हयसर चल चा पाजतो “.. असे करून अर्ध्या तासाच्या बाजाराला तब्बल दोन तास लावणार. रात्री नऊ वाजता कामावरून आला , तरी पहिल्यांदा आई चहा टाकायची ,नी मग जेवणे ! रविवारी संध्याकाळी ४ वाजता मराठी चित्रपट लागायचा दूरदर्शन वर ! बाबाला अचानक हुक्की यायची , ” शारदे मी करतो चा ” .. त्यानंतर जो काही चहा आम्हाला मिळायचा त्याची चव , अमिताभ बच्चनचा ‘कोहराम’ चित्रपट ज्यांनी पाहिला असेल, त्यालाच कळेल ! गूळ म्हणतोय माझ्यापेक्षा गोड कि साखर म्हणतेय, नाही रे .. माझ्यापेक्षा गोड , इतका गोड तो चहा असायचा ! त्याला बच्चनजींच्या भाषेत म्हणतात ” खडी -चम्मच ” चहा ! ज्यात चमचा उभा राहील इतकी साखर , पुरणात नाही का उभा राहत,अगदी तसाच ! त्या चहाचा एक घोट घेतल्यावर, आई आणि मी एकमेकांकडे पाहतोय , आजीने तर ‘मयेकर चहा बनवतायेत’, हे कळल्यावर “इच्छा नाही” म्हणून आधीच शरणागती पत्करलेली असते ! फक्त बाबा एकटा ओट्याला हात टेकून मिटक्या मारीत चहा पीत असायचा . आजही बाबाने ,” मी बनवतो चा “, म्हटल्यावर आम्हाला धडकीच भरते !
तर अशा या चहामय वातावरणात जडणघडण झालेल्या माझे चहावर लवकरच प्रेम बसले , ते ही दुधाचे दात पडायच्या आत! चहात भिजू घातलेली पोळी , पारले जी च्या बिस्किटाचा चुरा , दारावर पत्र्याच्या पेटीत विकायला आलेला बेकरीचा क्रीम वाला त्रिकोणी केक , नरम पाव , कडक पाव , खारी , टोस्ट , अहो एवढेच नाही तर उन्हाळी सुट्टीत गावी निरशा दुधाचा चहा नी त्यासोबत मामी किंवा आजीने बनवलेली चुलीवरची ज्वारीची किंवा तांदळाची खरपूस पापुद्रा सुटलेली भाकरी ,तर कधी तेलाच्या घडीच्या पोळ्या … अहाहाहाहाहा !

जसजसे वय वाढू लागले तसतसे चहाची संगत वाढू लागली . शाळेत असताना दिवसातून फक्त दोनदा चहा घेणारी मी , इंजिनिअरिंगच्या टप्प्यावर , कॅन्टीनचा अण्णा असाईनमेंट पूर्ण करण्यासाठी बसू द्यावा म्हणून तासाला एक कप चहा , असे ३-४ तास कॅंटीनमध्ये घालवू लागले . ग्रुप स्टडी , प्रोजेक्ट्स तसेच कॅम्पस इंटरव्यू यांसाठी भूक आवरावी म्हणून चहा घेतल्याचे मला स्मरते . आय टी च्या नोकरीत तर २४*७ चा सपोर्ट होता , आणि तोही क्रिटिकल लाईव्ह प्रोजेक्टसवर ! त्यावेळी नाईट शिफ्ट चा चहा डोळे उघडे राहावेत म्हणून ,आणि सकाळी अर्ली मॉर्निंग शिफ्टचा चहा तारवटलेले डोळे उघडावेत म्हणून आपली कामगिरी चोख बजावायचा !
कोणाची कॅट, जी – मॅट क्लिअर झाली आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले की टपरीवर ही गर्दी , तर कोणाचे पहिले निर्व्याज प्रेम अपूर्ण राहिले की त्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या हातात एक कप चहा ठेवावा नी म्हणावे , ” अर्रे you deserve much better .. buck up यार !” माझ्या मामे नणंदेच्या लग्नात रात्रभर भटजी मंत्र पढत असताना आम्ही मागे चहाचे कपावर कप ढोसत एकमेकांच्या खांद्यांवर डुलक्या आवरत होतो . मणिपाल ला पोस्ट ग्रॅजुएशन करत असताना , कॉलेज सुटल्यानंतर , कामत कॅफे वाला अण्णा दुरून मला रस्ता क्रॉस करताना पाहूनच आत किचन मधे , पूनावाले दीदी का चटनी सँडविच एक्सट्रा तिखा चटनी मारके और अद्रक वाली स्ट्रॉंग चाय अशी ऑर्डर द्यायचा !
या चहाने अशा अनेक आठवणी , अनेक सुख दुःखे एकत्र अनुभवली ! लिहायला गेले तर पूर्ण आतापर्यंतचे आयुष्य उतरेल कागदावर .. असो तर आपला हा लाडका चहा भारताचे मूळ पीक नाही बरं का ! साधारण ४००० वर्षांपूर्वी आपले शेजारी चीन मध्ये याची पाळे मुळे गावली असं इतिहासात नमूद आहे . प्राचीन चीनच्या इतिहासात शेन नून्ग नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे . तीन येल्लो एम्परर पैकी हे एक मानले जातात . असे म्हणतात हे येल्लो एम्परर देवांपैकी होते , ते पृथ्वीतलावर आले आणि मानवाला शेती आणि जडीबुटी , औषधांचे ज्ञान शिकवून गेले . या शेन नून्ग बाबाने अनेक औषधे , जडी बुटी , शेती पद्धती यांवर स्वतः संशोधन केले . त्यांना चीन आणि व्हिएतनाम मध्ये आजच्या घडीला सुद्धा खूप मानले जाते . असे म्हणतात शेन नून्ग एकदा पाणी उकळत असताना त्यात चहाच्या झाडाचे एक पान उडून पडले नी त्या पाण्याला अप्रतिम सुगंध आणि चव आली . ही चव चहाचा शोध लावून गेली .. ह्या गोष्टीचा पुरावा कृपया माझ्याकडे मागू नये , ही चीनच्या पुराणातील एक गोष्ट आहे !

जपानमध्ये चहा विषयी अजून एक रंजक गोष्ट आहे आणि ती सुद्धा आपल्या देशाशी निगडित ! बुद्ध धर्माचे प्रचारक बोधीधर्म भारतातून चीनला प्रसारासाठी गेले त्यावेळेला एकदा ध्यान करीत असताना काही केल्या त्यांचे चित्त एकाग्र होईना, डोळे उघडे राहीनात . मग राग अनावर होऊन त्यांनी आपल्याच पापण्या छाटून जमिनीवर फेकल्या . त्या पापण्यांतून चहाचे रोप उगवले . या रोपाची पाने चघळल्यावर सगळ्या बौद्ध भिक्खूंना ध्यानासाठी अगदी ताजे तवाने वाटू लागले ! असा हा चहाचा प्रसार नंतर चीन मध्ये ध्यान धारणा करणाऱ्या साधू व भिक्खुंद्वारे इतर देशांत झाला . लंडनच्या एका कॉफी हाऊसमध्ये चहा पहिल्यांदा सर्व्ह झाला आणि मग त्याच सुगंध पूर्ण युरोपभर पसरला !
चीनचे चहाच्या शेतीतले वर्चस्व मोडून काढण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहाचे मळे पिकवण्याचा निर्णय घेतला ! ब्रिटिशांच्या वसाहतीकरणाच्या राजकारणामुळे हे एक मात्र चांगले झाले असे म्हणायला काही हरकत नाही !आसामात मणिराम दत्त बारभंडारी बरुहा , ज्यांना मणिराम दिवाण असे ही म्हणतात , हे सद्गृहस्थ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे प्रामाणिक कर्मचारी होते .आसामात सिंगफो जमातीचे लोक चीनच्या प्रभावामुळे चहाचे उत्पादन घेतात अशी माहिती त्यांनी इंग्रज सरकारला दिली . इंग्रजांनी आपले दूत पाठवून सिंगफो जमातींकडून चहाची रोपे घेऊन लागवड सुरु केली . पुढे इंग्रजांनी आसामचा भाग ताब्यात घेऊन दिब्रुगड जिल्ह्यात ‘चाहबुआ’ नामक चहाचे पहिले गार्डन स्थापित केले . ‘चाह ‘ म्हणजे चहा आणि ‘बोवा ‘ म्हणजे लागवड ! आता भारत देश अतिशय उच्च प्रतीच्या चहाच्या उत्पादनात अग्रेसर आहेच आणि ७० टक्क्याहून जास्त चहाचे उत्पादन आपण आपल्या देशातच वापरतो , आहे कि नाही गंमत !
आपला आसामचा चहा जगप्रसिद्ध आहे कारण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातली माती आणि हवामान त्या चहाच्या पिकाला एक वेगळीच उभारी देते , आणि बनतो एक उत्कृष्ट दर्जाचा चहा ! आपण जो पितो ना त्या चहाला CTC ब्रँड म्हणतात .. Crush , Tear , आणि Curl पद्धतीने बनवलेला . आपण काय करतो चहा अक्षरशः शिजवतो , या भारतीय पद्धतीसाठी CTC उत्तम . पण खऱ्या प्रीमियम चहाचे दोन प्रकार असतात- एक लीफ टी आणि दुसरा इन्फयुजन किंवा हर्बल टी ज्यात खरे तर चहा पत्ती नसते तर विविध सुगंधी आणि औषधी हर्ब्स वापरून बनवलेला चहा म्हणजे इन्फयुजन टी !
आपल्या देशात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो . एक तर आपला नेहमीचा आल्याचा चहा , मसाला चहा ,गवती चहा , रोज टी ज्यात गुलाबाच्या सुकवलेल्या पाकळ्या घालतात , काश्मिरी काहवा ज्यात दालचिनी , वेलची आणि केशराचा सुगंध , तर काश्मीरचा नून चहा किंवा गुलाबी चहा ज्यात चक्क मीठ घालतात !

आता माझ्यासारखे चहा प्रेमी चहाचे फायदे ऐकून खूपच आनंदित होतील. चहामध्ये असे anti ऑक्सिडंट्स असतात की जे वय वृद्धी रोखतात आणि प्रदूषणापासून सुद्धा रक्षण करतात . वाढीव कॉलेस्टरॉलमुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन हृदयविकाराचा धोका संभवतो . ब्लॅक टी पिण्याने रक्तवाहिन्या गुठळ्यामुक्त राहायला मदत होते . हर्बल चहा पिण्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे . मागे काही दिवसांपूर्वी एक व्हाट्स अँप फॉरवर्ड आले होते .. त्यात म्हटले होते की ग्रीन टी ने वजन कमी तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतः पर्वत चढून ती खुडून आणतो ! हे फक्त हसण्यावारी न्या हां , वैद्यकीय शाखेनुसार ग्रीन टी मध्ये बरेच अँटी ऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे मेटाबोलिसम वाढून पोटावरची चरबी कमी होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होते .
आपण आपल्या चहाला रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग मानतो , तसेच इतर देशांत हा चहा अगदी साजरा केला जातो , कसे ते सांगते . चीनमध्ये लग्न झाल्यावर नवपरिणीत जोडपे आपल्या आई वडिलांना चहा कपात ओतून त्यांचे आशीर्वाद घेतात . आपल्या माता पित्यांचे आभार मानतात ! भारत आणि इराण मधल्या व्यापार संबंधातून चहा तिकडे इतका प्रसिद्ध झाला कि आजच्या घडीला इराण जगातला सगळ्यात जास्त चहा पिणारा देश, म्हणून पाहिले जाते ! तिथे ” चायखाना ” संस्कृती आहे जसे कॅफे कल्चर ! तोंडात खडीसाखर ठेवून बशीने चहा पिण्याची इराणची पारंपरिक पद्धत आहे !
तिबेटमध्ये अति थंड वातावरणामुळे बटर चहा म्हणजेच चक्क लोणी घालून चहा पितात जेणेकरून ऊर्जा मिळते . तसेच जे आदिवासी तिबेटमध्ये आहेत ते दिवसाला ३० -४० कप चहा पितात आहे कि नाही नवल ! हे जितके नवल त्यापेक्षा त्यांची चहा परंपरा ऐकली तर तुम्ही तोंडात बोटे घातल्याशिवाय राहणार नाहीत . यजमान पाहुण्याला वाडग्यात चहा प्यायला देतात . जसे पाहुण्याने चहाचे घोट घेतले नी वाडगे खाली ठेवले की यजमान परत ते वाडगे चहाने भरतात , आणि पाहुणे त्याला नाही म्हणू शकत नाहीत , तो यजमानांचा अपमान समजला जातो ! मग अशा वेळी काय करावे पाहुण्याने , आली का पंचाईत ! पाहुण्याने गप गुमान संभाषणे करावीत परंतु भरलेल्या वाडग्याला स्पर्श करू नये , निघायच्या वेळेपर्यंत ! पाहुणे निघून गेले कि यजमान ते भरलेलं वाडगे रिकामे करून घेतात ! किती रंजक प्रथा !
आज काल हाय टी चे पेव जिकडे तिकडे फुटलय . मोठया मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलात बक्कळ पैसे मोजून लॅव्हिश बफे स्प्रेड्स लावले जातात . मला ही खुप आवडतात , उगाच का खोटे बोलू ? पण ते आपल्याकडे भिशीचे महिलामंडळ सुद्धा हाय टी ठेवतात बरं का , सामोसा , कचोरी , सँडविच आणि चहा कॉफी ! या हाय टी चा इतिहास थोडक्यात सांगते हां , एकोणिसाव्या शतकात ब्रिटन मध्ये औद्योगिकरणामुळे कामगार वर्ग कामावरून दमून भागून संध्याकाळी परत यायचा ! ती वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ यात जरा उशीर असल्या कारणाने भूक भागवण्यासाठी हा संध्याकाळचा चहापान म्हणजेच हाय टी चा प्रोग्रॅम सुरु झाला . चहासोबत स्कॉन्स , सँडविच , कूकीज असे पदार्थ भूक भागवण्यासाठी खाल्ले जाऊ लागले !

तर असा हा आपला हरहुन्नरी चहा , सगळ्या संस्कृतीत अगदी बेमालूम विरघळून गेलाय ! अशा कित्येक चहाच्या गोष्टी आणि रंजक माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे . एका सेशनमध्ये किंवा एका ब्लॉग मध्ये हे लिहिणे खरंच कठीण आहे . तुमचे चहा विषयीचे प्रेम पाहून मी ही माहिती गोळा करायचा प्रयत्न केला . आज तुमच्यासाठी खास टपरीवरचा मसाला चहा , मान्सूनसाठी अगदी उत्तम !
संदर्भ:
https://www.asmalldoseoftoxicology.org/shen-nung
https://en.wikipedia.org/wiki/Noon_chai
https://en.wikipedia.org/wiki/Kahwah
https://en.wikipedia.org/wiki/Maniram_Dewan
Tea Cookbook- नीता मेहता

- २५० ml पाणी
- २ टीस्पून चहा ची पावडर
- १ इंच आल्याचा तुकडा
- १२५ ml दूध
- ४ टीस्पून साखर
- ४-५ लवंग
- अर्धा टीस्पून सुंठ
- पाव टीस्पून काळी मिरी
- ४ हिरव्या वेलच्या
- अर्धा इंच दालचिनी
- आले बारीक किसून घ्यावे .
- खलबत्त्यात हिरवी वेलची , दालचिनी, काळी मिरी , आणि लवंग कुटून घ्यावे . वेलचीची साले जपून बाजूला ठेवावीत.
- एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे . पाण्याला मंद उकळी आली की त्यात चहाची पत्ती व वेलचीची साले घालावीत . २ मिनिटे तसाच मंद आचेवर चहा उकळत ठेवावा .
- चहाचा रंग पाण्याला आला की त्यात कुटलेला मसाला घालून अजून २ मिनिटे कढू द्यावा .
- आता सुंठ आणि साखर घालून विरघळू द्यावी .
- साधारण ३ मिनीटांनंतर दूध घालावे .मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी .
- नंतर आच मंद करून त्यात किसलेले आले घालावं . झाकण घालून मंद आचेवर चहा ४-५ मिनिटे उकळू द्यावा .
- नंतर गॅस बंद करून १ मिनिट चहा मुरू द्यावा .
- नंतर कपात किंवा पेल्यात ओतून ग्लुकोज बिस्किटांसहित चहाचा आस्वाद घयावा .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply