
दिवसाची सुरुवात मस्त पैकी आल्याच्या कड्डक चहाने आणि त्यानंतरच्या पोटभर पौष्टिक न्याहारीने व्हावी याकडे माझा नेहमीच कल असतो . आमच्या घरात सगळेच खवय्ये असले तरी सकाळी मात्र सगळ्यांना साधा सुधा नाश्ताच आपलासा वाटतो . म्हणून रोज नाश्त्याला काय करायचे याचे आठवड्याभराचे वेळापत्रक आदल्या शनिवारी रविवारी तयार करून ठेवते म्हणजे आयत्या वेळी घाई होत नाही .
माझ्या या वेळापत्रकात एक दिवस तरी आप्प्यांचा ठरलेला , कारण तांदळाच्या ,रव्याच्या किंवा ओट्सच्या इडलीनंतर एक वैविध्य म्हणून आप्पे पात्र मदतीला धावते . मी माझ्या हिंदी चॅनेल वर तामिळनाडू तील एक प्रसिद्ध डोसा ” अडई ” बनवला होता . या डोशात मिश्र डाळी ,साबुदाणे वापरले जातात . अशाच प्रकारचा ” आडे” हा पदार्थ कोकणात सुद्धा बनवला जातो . या डोशात शेवग्याचा पाला किंवा पालक , मेथीची पाने घालून फायबर ही थोड्या प्रमाणात शरीराला उपलब्ध करून दिले जाते .

याच धर्तीवर मी आज मिश्र डाळींचे आप्पे बनवायचा घाट घातला आहे . आता तसाही ताजा पालक बाजारात मिळायला लागलाय आणि माझ्या कुंडीतही पालक रुजून छान कोवळी पाने आलीयेत . मी तीच पाने खुडून या मिश्रणात घातली . तुम्हाला मेथी किंवा ताजा शेवग्याचा पाला मिळाला तरीही घाला , उत्तम चव आणि जास्त पौष्टिकता आपल्या सकाळच्या नाश्त्यात मिळते ! अगदी झटपट होणारे आप्पे आणि कोणतीही आंबवण्याची प्रक्रिया नाही की फुलवण्यासाठी सोड्याची आवश्यकता ! नेहमीच्या आप्प्यांपेक्षा याची चव मला खास आवडली , एक तर थोडी फार मेदुवड्याची चव जी माझी आवडती .. आणि डाळींमुळे छान कुरकुरीत लागतात ! या सोबत तुम्ही दक्षिण भारतीय पद्धतीची नारळाची चटणी , टोमॅटोची चटणी बनवू शकता किंवा ‘टिफिन सांबार’ ज्याला ‘ब्रेकफास्ट सांबार ‘असे देखील म्हणतात ते बनवू शकता !
डाळींचे शरीराला होणारे फायदे:
१. प्रथिनांचा उत्तम स्रोत
२. लोह आणि खनिजे व क्षारांचे प्रमाण
३. पचन सुलभ करण्यासाठी आवश्यक तंतुमय पदार्थ
४. शरीरास ऊर्जा देण्यासाठी लागणारे आवश्यक पिष्टमय पदार्थ
पालक खाण्याचे फायदे:
१. लोह , खनिजे , क्षारांचा उत्तम स्रोत
२. रक्त शुद्धी तसेच रक्तवर्धक
३. पचनासाठी आवश्यक तंतुमय पदार्थ
४. व्हिटॅमिन K . A , C आणि फोलेट चा उच्च स्रोत ज्याने लाल रक्तपेशींची कमतरता भरून निघते


- १ कप = २०० ग्रॅम तांदूळ ( कुठलाही घरातल्या वापराचा ),
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स चण्याची डाळ ,
- पाव कप = ६० ग्रॅम्स उडीद डाळ ,
- पाव कप = ६० ग्रॅम्स तूर डाळ ,
- पाव कप = ६० ग्रॅम्स मसूर डाळ ,
- पाव कप = ६० ग्रॅम्स मूग डाळ ,
- अर्धा टीस्पून मेथी दाणे ,
- १ कप = १०० ग्रॅम्स पालकाची पाने स्वच्छ धुऊन , बारीक चिरून ,
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला ,
- ७-८ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या ,
- १० -१२ कढीपत्ता बारीक चिरलेल्या ,
- अर्धा टीस्पून जिरे ,
- अर्धा टीस्पून हिंग ,
- मीठ चवीपुरते
- सगळ्या डाळी , तांदूळ आणि मेथी दाणे स्वच्छ धुऊन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे . रात्रभर शक्य नसेल तर किमान ४-५ तासांसाठी भिजवावे . सकाळी पाणी काढून बारीक वाटावे . मी वाटण्यासाठी अर्धा कप पाणी वापरले आहे .
- या पेस्टमध्ये पालक , कांदा, हिरव्या मिरच्या , कढीपत्ता , जिरे , आणि हिंग घालीन एकत्र करून घ्यावे .
- पाव कप पाणी आणि चवीपुते मीठ घालून पीठ जरासे सरसरीत करावे . खूप पातळ नको . चमच्याने घालता येईल इतके घट्ट ( स्पून ड्रॉप consistency )
- आप्पेपात्र माध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यावे . त्या छिद्रांत तेल घालावे . नंतर मिश्रण या छिद्रांत घालावे . आच मंद करून झाकण घालून शिजू द्यावे .
- साधारण ४ मिनिटानंतर खालच्या बाजूने आप्पे हलक्या करड्या रंगावर आले की उलटावे . उलटण्यापूर्वी थोडे तेल वरून घालावे .
- दुसऱ्या बाजूने थोडे कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- गरमागरम आप्पे चटणीसोबत किंवा टोमॅटो केच अप सोबत वाढावेत.
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply