
” निसर्गाची करणी नी नारळात पाणी …” अवघ्या महाराष्ट्राचे श्रीफळ म्हणजे नारळ !. आमच्या कोकणात तर नारळावाचून पान हालत नाही . उसळी , पालेभाज्या , आमट्या , वरण , मासे , चिकन , मटण , अहो इतकेच काय गोडधोडाच्या पदार्थांत सुद्धा वेगवेगळ्या रूपांत खोबरे वापरले जाते .
कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. माझ्या ब्लॉगवरच तुम्हाला कोकणी पद्धतींनी बनवलेले माशाचे अनेक प्रकार वाचायला मिळतील . कधी ओल्या खोबऱ्याच्या कच्च्या वाटणातले मासे , कधी कांदा -लसूण-सुक्या खोबऱ्याचे वाटण तर कधी नुसत्या आले लसणाच्या फोडणीतले माशाचे खेंगट ,,अशा अनेक तऱ्हा ..

आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते . मी असे म्हणतेय खरं पण या रेसिपीत नारळाचे दूध वापरले जाते , आणि नारळाचं दूध काढणे हे नसे थोडके ! पन कोकनी बायगोच्या ह्यो रोजचा खेल , ह्ये पाट्यावर येवडा येवडा खोबरा वाटून टोपभर दूध गाळताय पटदिशी .. माडावरून आताच उतरलेल्या ताज्या नारळाच्या दुधात खाडीची पांढरी कोळंबी शिजवून दुपारी रापणीवरून परतलेल्या घरातल्या पुरुषमंडळींच्या ताटात लाल तांदळाचा मऊ गरम भात आणि त्यावर कोळंबीची ही मुरलेली जराशी आंबट , तिखट कढी वाढली की बायगो खुश , मग दुपारी बायगो टोपल्या घेऊन समोरच्या झिलग्याक बोलवून , चालली समुद्रावर कालवी गोळा करूक…
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ३५० ग्रॅम्स कोळंबी साफ करून , मधला काळा दोर काढून , स्वच्छ धुऊन
- २ मोठे कांदे = १५० ग्रॅम्स ( एक कांदा तुकडे करून , आणि एक कांदा चिरून )
- पाव कप ताजी कोथिंबीर
- ७-८ बेडगी सुक्या लाल मिरच्या
- तेल
- अडीच कप = २५० ग्रॅम्स ताजा खवलेला नारळ
- ५-६ कढीपत्ता
- १ टीस्पून जिरे
- पाव टीस्पून काळी मिरे
- १ टीस्पून धणे
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून तांदळाचे पीठ
- ५-६ कोकम
- मीठ चवीनुसार
- कोळंबीला हळद आणि मीठ चोळून १५-२० मिनिटे मुरायला ठेवावी .
- मिक्सरमधून किसलेला नारळ, कांद्याचे तुकडे, सुक्या मिरच्या , कोथिंबीर, लसूण ,आले , धणे , जिरे , काळी मिरे हे सगळे साहित्य १ ते दीड कप पाणी घालून बारीक वाटून घ्यायचेय . जितके बारीक वाटले जाईल तितके दूध दाटसर निघेल . फक्त मिक्सर फार वेळ फ्रीवू नये जेणेकरून तो गरम होईल . नाहीतर दुधात नारळाचा तेलकट अंश उतरतो .
- हा नारळाचा वाटलेला चव एका गाळणीवर स्वच्छ सुती कापड अंथरून त्यातून गाळून घ्यावा . साधारण २ कप दूध निघते .
- एका कढईत २-३ टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी . मग बारीक चिरलेला कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतून घ्यावा .
- त्यात मॅरीनेट केलेली कोळंबी घालून एकत्र करून घ्यावी . साधारण १ मिनिट मध्यम आचेवर कोळंबी शिजवून घेतली की आच मंद करून त्यात नारळाचे पिळलेले दूध घालून पटकन हलवून घ्यावे . मंद आचेवर शिजू द्यावे .
- तांदळाचे पीठ ३-४ टेबलस्पून पाण्यात सैल करून घ्यावे आणि या कढीत मिसळावे म्हणजे कढीला दाटपणा येतो .
- झाकण घालून कढी मंद आचेवर शिजू दयावे .
- ३-४ मिनिटांनंतर कोकमं घालून घ्यावीत . चवीपुरते मीठ घालून काही मिनिटे अजून कढी शिजू द्यावीत. कोणतयाही परिस्थतीत मोठ्या आचेवर कढी उकळू देऊ नये नाहीतर नारळाचे दूध फाटते .
- २ मिनिटांनी गॅस बंद करून , झाकण घालून कढी मुरू द्यावी . जराशी वाफ गेली की ऊन ऊन भातासंगे वाढावी .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Sundar
Thank You so much Kavita 🙂
Aajichi athavan Ali ashich mast kalvan bavun dete aaji mazi
किती छान आठवणी ना कविता , आजीची माया अशीच गोड
हो खरंच