
वैशाख – ज्येष्ठात तप्त भाजून निघालेली भात जमीन ! नदीवर जाताना हलकासा उतार.. पायातलया स्लिपरच्या आत त्या टोकदार ढेकळामुळे टोचणी लागून तोंडातून ” सलईईई आईईई ” असे उद्गार आपसूकच बाहेर पडायचे . मग नदीच्या आटलेल्या प्रवाहात बसून थंड पाण्यात आरामात पाणी उडवत खेळणे .
चोहोबाजूंनी कातळ , खडकाळ जमीन , चुकून जरी अनवाणी बाहेर पडले तरी कातळाचा टोकदार दगड किंवा सुकलेले गवताचे टोक, असे पायात रुतून बसायचे नी ते काढताना डोळ्यांत पाणी तरारायचे. या डोंगर माथ्यावर एकच लाल चिर्याचे बांधकाम केलेलं , माझ्या प्रभा आजीचे कौलारू घर – माझ्या आईची धाकटी मावशी ! डाव्या बाजूला कातकर्यांचा पाडा , उजव्या बाजूला भली मोठी खोल लाल चिऱ्यांची खाण …. वाकून बघितले तरी पोटात गोळा यायचा . त्या टोकदार कातळावर माझी मनीषा मावशी मात्र , भले मोठे तांब्याचे दोन हंडे आणि कमरेत कळशी असा जामानिमा घेऊन घराच्या खालच्या अंगाला , डोंगराचा उतार जिथे खाली भाताच्या शेताला आणि बांबूच्या रानात जाऊन मिळतो , तिथल्या विहिरीवर पाण्याला निघायची . अवघी सतरा वर्षांची कोवळी पोर , दिसायला चवळीची शेंग तरी कामाला वाघीण .. सणसन करीत खाचखळग्यांची वाट पार करत विहिरीवर पोचायची . तिच्यामागे आम्ही पोरे अक्षरशः धावत सुटायचो . पावसात ही विहीर तुडुंब भरली असायची कि तांब्याने पाणी काढावे लागायचे . परंतु अजून पावसाने हजेरी लावली नसल्याने विहिरीतील पाणी सहा फूट खाली गेलेले . ही विहीर निसर्गनिर्मित , मग ओबडधोबड दगडांवर पाय ठेवून आमची मनीमाऊ खाली विहिरीत उतरायची ! आम्ही मनीमाऊ च म्हणायचो तिला , आमची हाक ऐकून नाकातल्या जाड सोन्याच्या शिकलीला जीभ लावत हसायची . हे एवढाले हंडे नी कळशी घेऊन, चढायची ती वाट . त्या विहिरीच्या बाजूला बांधावर कधी उभे राहून , उन्हाची तिरीप टाळावी म्हणून डोळ्यांवर हाताचा तळवा आडवा ठेवून टेहळणी करायची . बांधापलीकडली शेतजमीन ही वाटणीची .. भाऊबंदकीतली !

कोणाच्या जमिनीच्या तुकडयांवर नांगर फिरतोय , कोणाकडे भाताचे कूळ आलेत बोलणी करायला , तर कोणाच्या जमीन तुकड्यांवर चोंढे पडलेत … सगळी इथंभूत माहिती आपल्या आईला नी भावांना द्यायची . आम्हा मुंबईकरांना काहीच कळायचे नाही. आम्ही पोरे हुंदडण्यात बिझी , नी प्रभा आजी माझ्या आजीला , तिच्या सख्ख्या बहिणीला म्हणायची , ” माई , गे चार दिसांनी कूळ येतील , कोंबडे बघ गे कोणतं , नी या पोरांसाठी मच्छीला अतल्या ला आंजर्ल्याला पाठवीन हो !” अचानक चार दिवसांनी घरात एकदम लग्नसराईचे वातावरण असल्यासारखे घर भरायचे . बऱ्याच बायका नी पुरुष ढोपरापर्यंत नेसणे ओढून शेताकडे जाताना दिसायचे . डोक्याला बांधलेली इरकली , कोणाचे प्लास्टिकचे तर कोणाचे बांबूच्या सुपासारखे , निळ्या – काळ्या रंगाची ! आम्हा पोरांना शेताकडे जायला त्या दिवशी बंदी … कारण चिखलच इतका गुढगाभर नी आमची उंची वीतभर ! कपडे खराब जाहले तर पोरांना आधी धपाटे नी बदाबदा बादल्या डोक्यावर ओतून अंघोळी , यात वेळ कोण घालवणार ? तरी गुपचूप आम्ही पोरे एका म्हाताऱ्या कुळाच्या मागनं ” द्या आजोबा , तुमची टोपली पकडतो ” असे मस्का मारीत गेलोच .
त्यानंतर ते पाहिलेले दृश्य आजतागायत मी विसरलेले नाही . रप रप करणारा पाऊस , चिखलात पटापट भाताची रोपे रोवणारे हात , मध्येच कोकणी मालवणी हेलात गायली जाणारी गाणी , जरासा आरडा ओरडा नी चिडवाचिडवी .. ते पाहून आम्ही उत्साहाने बांधावरून खाली चिखलात उड्या मारल्या नी तेवढ्यात कोण तरी कूळ आरडले , नी मागे वळून अरुण मामा धावत आमच्याजवळ येऊन खेकसला , ” तुमि इथं काय करताव , बेडकं चावतील ढुंगणाना तेव्हा कलल !” नी मग हनुमानासारखे आम्हा सगळ्या पोरांना पाठंगुळीला , कोणाला बगलेत पकडून वर घरात घेऊन आला . आजीने नंतर अंघोळ घालताना उत्तरपूजा बांधली ती वेगळीच ! त्यातूनही भोकांड पसरताना माझ्या तीन साडेतीन वर्षांच्या मावसभावाने चुगली केलीच , ” मिता ता बोयी जाऊया म्हिणून ..” त्याला मी डोळे वटारताना आजीचा एक धपाटा अजून खाल्ला.

अशी ही भात लावणीची लगबग मला पाहायला मिळाली हे मी माझे भाग्यच समजते . रोहिणी नक्षत्र लागले कि साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धुळीवाफेसाठी जमिनीचा तुकडा हेरून ठेवला जातो . हा जो चौकोन असतो त्यालाच चोंढे म्हणतात . धूळ आणि वाफ – अर्थ कळलाच असेल तुम्हाला !
जिथे माती कसदार आहे आणि सूर्याची उष्णता सुद्धा पोचेल असा चोंढा ! त्यात भाताचे बीज पेरणी झाली की रात्रीच्या दवांत भिजून भाताची रोपे उभारतात .
हा चोंढा फक्त रोपे तयार करण्यासाठी हां , तोपर्यंत शेतात दुसरीकडे पूजाअर्चना करून , नारळ वाढवून , लावणीसाठी जमीन नांगरली जाते . . मग येतोय येतोय म्हणण्याआधीच मिरगाचा ( मृग नक्षत्र ) पाऊस हजेरी लावतोच – थंडगार तुषारांसोबत ! नांगरलेल्या भागात तयार झालेली रोपे लावणी झाली ,की पाऊस वेगवेगळ्या नक्षत्रांतून- कधी हत्तीच्या सोंडेतून पडल्यासारखा मुसळधार , तर कधी गाढवासारखा लहरी झिरझीर करीत असतो. पावसाळी हवा आणि भातलावणीची मेहनत, कोकणी जिव्हेला कोंबडी रश्श्याची ओढ लागली नाही तरच नवल..!
कोकणात पावस ची स्वामी स्वरूपानंदाची पालखी आषाढीच्या निमित्ताने पंढरीला जाते . हे वारकरी आषाढी एकादशी झाली की परततात . आपापल्या गावात वारकऱ्यांनी शाकाहारी उपवास सोडला , बैलपोळ्याचा सण साजरा झाला की जो पहिला सामिष खाण्याचा दिवस उजाडतो, त्यादिवशी साजरी होते ” आखाडी “!
आखाडी नंतर जागेवाल्याची राखण, ग्रामदेवतेला नैवेद्य या कारणासाठी कोणी श्रीफळाचा किंवा मांसाहारी नैवेद्य करतात !
दिव्यांच्या अवसेच्या आधी चा खाण्याचा दिवस पकडून साजरी होणारी गताहारी अशा या ना त्या निमित्ताने झणझणीत कोंबडी सागोती नी त्यासोबत वडे किंवा आंबोळ्या हा बेत कोकणात आलटून पालटून वाडीत सगळ्यांकडे साजरा होतो.

सागोती या शब्दाचे मूळ आढळते पोर्तुगीज भाषेत ! ” xacuti ” ( उच्चार : शकुती ) या शब्दाचा हा कोकणी अपभ्रंश , ” सागोती ” किंवा “शागोती ”
गोव्यापासून तळकोकणापर्यंत बनवली जाणारी सागोती/सागुती/शागोतीत नारळाचा वापर तर होतोच परंतु त्या त्या भागांत आढळणारे जिन्नस वापरून , पाट्यावर वाटलेलया मसाल्याचा जो काही ताजेपणा सागोतीच्या तर्रीत उतरतो त्याला तोडच नाही ! काही ठिकाणी नारळाचे दूध वापरले जाते , तर पोर्तुगीज रेसिपीमध्ये व्हिनेगरचा वापर होतो , काही ठिकाणी चिंच सुद्धा वापरतात !

या सागोती सोबत गोवा , आणि मुख्यत्वे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेमस असलेले कोंबडी वडे आखाडाच्या चमचमीत जेवणासाठी केलेच जतात ! आमच्याकडे रत्नागिरी ला या वड्यांना ” भोकाचे वडे ” असे नाव आहे . चिकन मटणाचा रस्सा असो की काळया वाटाण्या चे सांबार सगळ्यांना आवडणारे वडे, तसेच तांदळाच्या घट्ट खीरीसोबत सुद्धा हे वडे भाव खाऊन जातात !
काही आठवणी या मनाच्या पटलावरून पुसलया जातच नाहीत मुळी , हा कोकणातला आखाड याला अपवाद नाही ! आज हे सगळे आठवताना , लिहिताना डोळ्यांत ते शेताच्या बांधावरच्या चाफ्याच्या पानांतून टपटपणारे पावसाचे मोती उभे राहिलेत !


- १ किलो पिठासाठी:
- अर्धा किलो लहान दाण्याचा तांदूळ ( कोलम, आंबेमोहोर इत्यादी )
- १५० ग्रॅम्स उडीद डाळ
- १०० ग्रॅम्स चण्याची डाळ
- ४ टेबलस्पून धणे ( २० ग्रॅम्स )
- पाव टीस्पून ओवा
- पाव टीस्पून मेथी
- १ टीस्पून काळी मिरी
- १ टीस्पून जिरे
- १ टीस्पून बडीशेप
- १ कप = १५० ग्रॅम्स कोंबडी वडे पीठ
- पाव कप = ४० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- अर्धा टीस्पून हळद
- अर्धा टीस्पून मीठ
- तेल
- १ किलो चिकन - धुऊन, स्वच्छ करून, मध्यम आकाराच्या तुकड्यांत कापून ,
- १ टीस्पून हळद ,
- १ इंच आल्याचा तुकडा + ५-६ लसणीच्या पाकळ्या ( आले लसणीची बारीक पेस्ट साधारण दीड ते दोन टेबलस्पून ),
- अर्धा कप = ५० ग्राम किसलेले सुके खोबरे,
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेलं ओले खोबरे,
- १०-१२ लसणीच्या पाकळ्या ,
- १ मोठा कांदा = १०० ग्रॅम्स लांब चिरलेला ,
- १ कप कोथिंबीर ,
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले ओले खोबरे,
- पाव टीस्पून खसखस,
- ३-४ लवंग ,
- दोन लहान जावित्रीच्या पाकळ्या ,
- ४-५ काळी मिरी,
- १ इंच दालचिनीचा तुकडा,
- १ मसाला वेलची ,
- पाव टीस्पून शहाजिरे ,
- २ तमालपत्रे .
- १ लहान कांदा = ५० ग्रॅम्स बारीक चिरलेला ,
- ५ टेबल्स्पून मालवणी मसाला ( तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार ) ,
- पाणी गरजेनुसार ,
- तेल
- सगळे गरम मसाले एका मागून एक मंद आचेवर हलके भाजून घ्यावेत . खूप काळपट रंगावर भाजू नयेत , जरासा सुवास सुटायला लागला कि काढावेत .
- थंड झाले की एका डब्यात तांदूळ , ज्वारी, डाळी आणि सगळे मसाले एकत्र करून घ्यावेत .
- हे सगळे पीठ चक्कीवरुन जाडसर दळून घ्यावे .
- एका मोठ्या खोलगट भांड्यात वड्याचे पीठ , गव्हाचे पीठ , हळद, मीठ आणि १ टीस्पून तेल एकत्र करून घ्यावे . पुरीच्या पीठाप्रमाणे घट्ट मळून घ्यावे . पीठ मळताना त्यात गरम पाण्याचा ( साधारण पाव कप ) वापर करावा. हा पिठाचा गोळा अर्ध्या तासासाठी झाकून ठेवावा .
- अर्ध्या तासानंतर पिठाचा गोळा पुन्हा एकदा चांगला दाब देऊन मळून घ्यावा . मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत .
- पोळपाटावर पाण्याने भिजवून घट्ट पिळलेले सुती कापड पसरवून घ्यावे . हाताच्या तळव्याच्या खालील भागाने दाब देत गोल पुऱ्यांचा आकार द्यावा . जरासे वडे जाडसर असू द्यावे.
- तेल कढईत मध्यम आचेवर चांगले गरम करून घ्यावे .
- एकेक वडा असा बनवून गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर चांगले दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यत तळावेत .
- काळ्या वाटाण्याच्या सांबारासोबत किंवा चिकन , मटणाच्या रश्श्यासोबत अप्रतिम लागतात !
- एका खोलगट भांड्यात चिकन घेऊन त्यात हळद, आले लसणाची पेस्ट लावून चांगले एकत्र चोळून घ्यावे .
- एका कढईत २-३ टेबलस्पून तेल घालून गरम होऊ द्यावे . त्यात चिकन घालून मोठया आचेवर २ मिनिटे परतून घ्यावे .
- दोन मिनिटांनंतर मंद आच करून झाकण घालून चिकनला १० मिनिटे स्वतःच्याच पाण्यात शिजू द्यावे . अगदीच गरज लागली तर पाव कप पाणी घालावे .
- चिकन शिजतेय तोपर्यंत वाटण बनवून घेऊया . तव्यात मंद आचेवर सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे . एका ताटलीत काढून घ्यावे .
- त्याच तव्यात २ टेबल्स्पून तेल घालून लसूण परतून घ्यावी . लसूण गुलाबी रंगावर आली कि त्यात कांदा घालावा . चांगला परतून घ्यावा . मग त्यात कोथिंबीर जरा परतून घ्यावी . त्यात ओले खोबरे घालून हलके भाजून घ्यावे , खूप लालसर करू नये . नंतर हा भाजलेला जिन्नस तव्यात एका बाजूला करून मध्ये सगळे खडे गरम मसाले घालावेत आणि साधारण सुगंध येई पर्यंत ३० सेकंड ते १ मिनिट भाजून घ्यावेत . हा भाजका मसाला गॅसवरून उतरवून आता थंड होऊ द्यावा .
- एकदा मसाला भाजताना मध्ये चिकन शिजली कि नाही ते पाहूया . १० मिनिटे चिकन ५० टक्क्यांपर्यंत शिजते आणि छान पाणीसुद्धा सोडते . हा स्टॉक अगदी चविष्ट लागतो .
- मसाला थंड झाला कि पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये चांगले बारीक वाटून घ्यावे .
- कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . तमालपत्र घालावे . बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होऊ द्यावा . आता मालवणी मसाला घालावा . करपू नये म्हणून १-२ टेबलस्पून पाणी घालावे .
- नंतर वाटलेला मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घयावा . बाहेर उडू नये म्हणून मंद आचेवर झाकण घालून परतून घयावा .
- आता शिजलेले चिकन व चिकनचे पाणी घालून नीट मसाल्यात एकत्र करून घ्यावे . ३ कप गरम पाणी घालावे . आणि रस्सा जरा मध्यम आचेवर उकळू द्यावा .
- एक उकळी फुटली की आच मंद करून झाकण घालून चिकन पूर्ण शिजू द्यावे .
- चवीपुरते मीठ घालावे .
- गॅस बंद करावा . मालवणी चिकन रस्सा म्हणजेच कोंबडी सागोती वड्यां सोबत किंवा आंबोळीसोबत वाढावी .
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply