” आषाढाचे दिस गेले , श्रावणाचा मास सरे , भादवा आला ,
नवा साज ल्याईले मी, गौरीवाणी सजले मी , चांदवा ल्याला ….”
खरंच हा भाद्रपद महिना म्हणजे सणांची लयलूटच , वाजत गाजतच गणपतीबाप्पा वर्षभराच्या पाहुणचाराचा आनंद घेण्यासाठी आपल्या घरी विराजमान होतात! ते हुश्श म्हणतायेत ना म्हणतायेत , तोपर्यंत त्यांची गौरी माउली , लगोलग शंकराकडून आपल्या माहेरवासाला येण्याचा हट्ट पुरवून गणेशाचा मागोमाग येते . मग आई आणि मुलाची एकत्र सरबराई करायला यजमान सज्ज राहतात!
पुराणातल्या कथेप्रमाणे , देव आणि दानवांचे घनघोर युद्ध झाले . दानवांच्या क्रूरनीतीपुढे देवांची पिछाडी होऊ लागली . आणि देवलोकाचे अस्तित्व धोक्यात आलेले दिसता सारे देव भयभीत झाले . मग देव पत्नींनी एकत्र येऊन महालक्ष्मीची आराधना केली व तिच्याकडे मदतीची याचना केली ! शेवटी शक्तीचे रूप ते.. आपल्या पराक्रमाने दानवांचा दारुण पराभव करून तिने देवांचे राज्य राखले ! भाद्रपद सप्तमी ते नवमी , याच महालक्ष्मीला गौरीच्या रूपात पूजण्याची परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली ! ही गौरी सासुरवाशीण , लेकुरवाळी … शंकरुबाकडे माहेरी जाण्याचा हट्ट करून अगदी लगबगीने आपल्या माहेरी म्हणजेच घराघरांत पोचते ! मग माहेरवाशिणीचे कोडकौतुक ते काय , भाकरीच्या तुकड्याने तिची ओवाळणी करून तिला घरात प्रेमाने हाताने धरून पाटावर बसवली जाते . प्रवासात दमलेल्या आपल्या गौरी पुत्रीला मग न्हाऊ माखू घालून भरजरी साड्यांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते . तशी ही माहेरवाशीण साधीच , तिला फक्त आपले प्रेम आणि माया हवी , छानछोकीचा हव्यास नाही ! तिला साधा भाजीभाकरीचा नैवेद्य दाखवा किंवा पंचपंवांनाचा , ती आपल्या प्रेमाला भुकेली! म्हणूनच एका गरीब ब्राह्मणाच्या घरी एका म्हातारीच्या रूपात राहून त्याच्या सेवेने तृप्त होऊन त्याचे घर धनधान्यांनी भरून दिले , असे एका चातुर्मासाच्या कथेत माझ्या वाचनात आलेय . या धार्मिक प्रथा आपल्याला कर्मकांडापेक्षा जीवनात कस वागावे याचीच शिकवण देतात नाही की ?
या सणांमुळे आपण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येतो , नात्यांची रेशीमगाठ अजून मजबूत होते . म्हणूनच योगी जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलेही आहे , ” सण हे जीवनाचा भाग नसून , हे जीवनच एक उत्सव आहे !” गौरीच्या पूजनाचे अतिशय चपखल वर्णन करणारे एक मराठी चित्रपटातीळ गाणे मला राहून राहून आठवतेय, पहा किती छान शब्द गुंफलेत जगदीश खेबूडकरांनी ,

“घागर घुमूंदे घुमूंदे,
रामा, पावा वाजू दे
आला शंकरुबा शंकरुबा,
गवर माझी लाजू दे…
रुणझुणत्या पांखरा,
जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी तिला
लिंबलोण करा…
माझं माहेर सावली, उभी
दारात माऊली
तिच्या काळजात बाई
माया-ममतेचा झरा….
मला माहेरी पाठवा, मला
माऊली भेटवा
माझ्या आईच्या पंखात
मला मिळू दे उबारा……….
सौभाग्याचं लेणं,
गवर माझी लेवू दे
मोरपंखी चोळी
गवर माझी घालू दे…….
मला पुसते माऊली,
आले कोणत्या पाऊली
माझं गौराईचं पाय
माझा सोन्याचा उंबरा..
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे….
मी हो बहीण लाडकी,
पंचप्राणांच्या तबकी
दिली कुर्हाडीचीओवाळणी,
त्याचं भाव करा…
माया ममतेची ममतेची, आई
मला भेटू दे
माहेरपणाचं पणाचं सुख
मला लुटू दे
कशी माहेराला येऊ,
शिवंवरी उभा भाऊ
गेला दगड मातीनं
ओटी भरून माघारा
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
जीव लाऊन जिवाचा, टिळा
लाविते रक्ताचा
आता म्होरल्या जल्मात
नदी भेटु दे सागरा!”
आपल्या गौरी पूजनासाठी मी तुमच्यासोबत कोकणातील पारंपारीक घारग्यांची पाककृती शेअर करणार आहे , हे घारगे लाल भोपळ्याचे ज्याला डांगर असेही म्हणतात किंवा तंवसे म्हणजे काकडीचे ही बनवतात ! चला तर पाहूया रेसिपी
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- १ कप= २०० ग्रॅम्स तांदळाचे पीठ
- पाव कप = ५० ग्रॅम्स गव्हाचे पीठ
- अर्धा कप = १०० ग्रॅम्स गूळ किसून किंवा बारीक चिरून
- २५० ग्रॅम्स लाल भोपळा
- १ टेबलस्पून तूप
- अर्धा टीस्पून वेलची पावडर
- चुटकीभर मीठ
- तेल तळण्यासाठी
- पाणी गरजेनुसर
- लाल भोपळयाची वैशिष्ट्ये :वरील सालीचा रंग तांबूस लाल, थोडा टणक आणि मांसल, चवीला गोडसर. महाराष्ट्रीयन गोड़ व्यंजनात याचा प्रामुख्याने वापर केला जातो जसे लाल भोपळ्याची खीर , घारगे यासारखे पदार्थ . या भोपळ्यांपासून बनवलेले भरीत देखील चवीला उत्कृष्ट लागते.
- भोपळा स्वच्छ धुऊन त्याच्या साली काढून घ्याव्यात . किसणीच्या मध्यम आकाराच्या छिद्रांनी भोळा किसून घ्यावा. भोपळ्याच्या साली काढल्यावर आणि किसल्यावर त्याचे वजन कमी होऊन साधारण दीड कप म्हणजे १५० ग्रॅम्स इतके होते. रेसिपीमधील बाकी घटक पदार्थाचे प्रमाण ही बाब लक्षात घेऊनच दिले आहे .
- एका कढईत १ टेबलस्पून गरम करून त्यावर किसलेला भोपळा मध्यम आचेवर मिनिटभर परतून घ्यावा. मग त्यात किसलेला गूळ घालून बारीक आचेवर वितळू द्यावा. हे घारगे नैवेद्यात खीरीसोबत वाढले जाणार आहेत , परंतु तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गुळ थोडा वाढवला तरी चालेल!
- साधारण ३ मिनिटांत गूळ वितळतो , परंतु गुळाचे पाणी भोपळ्याने पूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवावे . अजून ३-४ मिनिटांत मिश्रण चांगले मिळून येते . आता वेलची पावडर घालून एकत्र करून गॅस बंद करावा . मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे.
- एका मोठ्या बाऊलमध्ये , तांदळाचे पीठ , गव्हाचे पीठ व मीठ घालून एकत्र करून घ्यावे. गूळ भोपळ्याचे मिश्रण घालून पिठात नीट एकत्र करून घ्यावे.
- पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत. पाव कप गरम पाणी थोडे थोडे घालून पीठ पुरीसाठी आपण मळतो तसे घट्ट मळायचे आहे . गरम पाण्यामुळे घारगे छान खुसखुशीत होतात आणि तळताना तेलात चांगले फुगतात ! पीठ मळले की ते १५ मिनिटांसाठी झाकून मुरू द्यावे.
- १५ मिनिटांनंतर घारगे थापण्यास सुरुवात करूया. घारगे कधीही लाटले जात नाहीत , त्यांना थापण्यासाठी एका पोळपाटावर सुती पाण्यात भिजवून घट्ट पिळून अंथरावे. आपल्याला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावेत.
- हाताला पाणी लावून हे गोळे कापडावर चपटे करत गोल थापून घ्यावेत , घारगे जरासे जाडसरच थापावेत , पातळ थापले तर ते नीट फुगत नाहीत .
- अशाच प्रकारे ४-५ घारगे एकदम थापून घ्यावेत . तळण्यासाठी तेल कढईत चांगले तापवून घ्यावे . पिठाचा छोटा गोळा तळून पाहावा , जर तो लगेच तळून तेलाच्या वर तरंगू लागला , समजावे की तेल चांगले तापलंय . आच मंद करून कढईच्या कडेने एकेक घारगा तेलात सोडावा , आणि तो स्वतःहून तळून तेलावर येत नाही तोपर्यंत त्याला उलटू नये . घारगा तळून वर आला की उलटावा आणि झाऱ्याने हलके दाबून त्याला फुगू द्यावे.
- छान पैकी तांबूस कडा येईपर्यंत खरपूस तळून घ्यावे. अशाच प्रकारे सारे घारगे तळून घ्यावेत.
- टीप: तळताना आच मंद ते मध्यम ठेवावी, मोठया आचेवर घारगे तळले तर ते बाहेरून लगेचच तांबूस होतात परंतु आतपर्यंत शिजत नाहीत!
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply