
रत्नांग्रीच्या भिवबाची काल तिन्हीसांजेला रापण पडली… ही भली मोठ्ठी इसवण गावली..
बंदरावर बोट खेचून होतेय तोवर “रापण इली रे .. इनोदा, अरे बसलंस काय तंगड्या पसरून , वैनी कडन पिशवी घेस नी पल , येकदा इस्वण टोपलीत ग्येली की उद्या मंगे बाजारातच मिलुची” , असं म्हणत बाबाचा बालसवंगडी मधू काका पाठीला आलेले बाक सांभाळीत, सत्तरीतले काटक शरीर घेऊन १०० मीटर शर्यत लागल्यासारखा पुढे पळतो!

कवाडीच्या बाहेर ग्रामपंचायतीने बांधलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर रस्त्यावरची मजा बघण्यात गुंग झालेला बाबा मग जांभई आवरत , बाबाच्या उत्तराची वाट न बघता पुढे धावणाऱ्या काकाच्या पाठमोऱ्या आकृतीला ” इलय रे… ” म्हणतो .. कवाड न उघडताच आपल्या सणसणीत आवाजात आईला आतून पैसे नी माशाची खास बारीक चौकडीची पिशवी आणून देण्यास सांगतो ! पुढे लगबगीनं चार हात लांब असलेल्या बंदरावर पोचतो , नी फडफडीत चांगली दीड फुटी ताजी सुरमई विकत घेऊन घरी येतो!

आज पडला मंगळवार , शुध्द शाकाहाराचा दिनु! सुरमई व्यवस्थित साफ होऊन फ्रिझर मध्ये जाते.. उद्याच्या बुधवार साठी! आता सकाळी बाजारात जायची घाई नाही मग जरा उशिरापर्यंत ताणून देता येईल या खुशीत बाबा मनात मांडे खाऊ लागतो, परंतु तोंडाला सुटलेले पाणी काय गप्प बसू देत नाही ! बाबा हळूच आईला म्हणतो, ” शारदे , सकाळी सुरण नी वांगा घेतलस ना, कापा तळशील काय, कोकमाच्या साराला दूध दीताय मी गाळून तुका..” तिन्ही सांजेची दिवाबत्ती नुकतीच करून आई सुद्धा वाटण घाटण करायचा त्रास वाचला म्हणून एक निःश्वास टाकते.

हे असे कधीही केव्हाही एखाद्या कोकणी घरात घडू शकते हां.. शाकाहार हा कोकणी माणसाला तितकाच प्रिय.. आणि त्या सोबतचे कॉम्बिनेशन सुद्धा ठरलेले.. ही फळभाज्यांची आणि कंदांची कापच पाहा ना! वांग्याचे, सुरणाचे, बटाट्याचे, नीर फणसाचे, कच्च्या केळ्याचे , कच्च्या पपई चे , नानाविध प्रकार! वरण भात, आमटी भात, कोकम सार भात. चिंच सार भात ,या सोबत तर कापांचा फडशा पडतोच , पण मी जेव्हा शाळा– कॉलेजात डब्यात पोळी सोबत घेऊन जायचे तेव्हा पोळ्या आल्या पावली घरी परत नी फक्त कापे माझ्या मित्र मैत्रिणींच्या पोटात गट्टम् !

तळताना त्यांचा जो सुगंध दरवळतो ना , त्यानेच सगळ्यांच्या स्वयंपाक घरातल्या वाऱ्या वाढतात . गरम गरम काप पळवणाऱ्या बाबा वर किंवा पार्टनर वर लटका राग , दाखवून एकेक लहान तुकडा मी सुद्धा मांजरीसारखा मटकावतेच.
म्हटले तर साधं जेवण , त्याचा आनंद मात्र आभाळाएवढा.. थोर माणसं म्हणून गेलीत ना – ” GOOD FOOD IS VERY OFTEN, EVEN MOST OFTEN SIMPLE FOOD!”

Prep time:
Cook time:
Total time:
Serves: 3-4

- वांग्याचे काप
- साहित्य :
- १ मोठ्या आकाराचे वांगे - धुऊन , अर्धा ते एक सेंटिमीटर च्या जाडीच्या चकत्या कापून
- १ टीस्पून मीठ
- १ टीस्पून हळद
- २ टीस्पून लिंबाचा रस
- ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- दीड टेबल्स्पूनन रवा
- ३ टेबलस्पून मालवणी मसाला
- तेल
- सुरणाचे काप
- साहित्य :
- अर्धा किलो सुरण - साल काढून , स्वच्छ धुऊन . मध्यम जाडीचे तुकडे करून
- ६ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- ४ टेबल्स्पून मालवणी मसाला
- १ टीस्पून चिंच - ३ टेबलस्पून गरम पाण्यात भिजवून
- चवीपुरते मीठ
- तेल
- कृती : वांग्याचे काप
- वांग्याचे काप काळे पडू नयेत म्हणून एका पाण्याने भरलेल्या भांड्यात मीठ घालून त्यात दहा मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत .
- एका ताटलीत हळद व लिंबाचा रस एकत्र करून घ्यावा . वांग्याच्या प्रत्येक चकतील नीट चोळून लावावा . असेच दहा मिनिटांसाठी बाजूला मुरत ठेवावे .
- पिठाच्या मिश्रणासाठी तांदळाचे पीठ , रवा , मालवणी मसाला आणि मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावे . यातले लागेल तेवढेच मिश्रण आपण वापरणार आहोत , नाहीतर सगळे मिश्रण ओलसर होते.
- वांग्याची एकेक चकती दाबून या पिठात दोन्ही बाजूंनी घोळवावी .
- पसरट तव्यावर किंवा काहिलीवर तेल चांगले तापवून घ्यावे . मंद आचेवर तव्यावर अलगद कापे पसरवून दोन्ही बाजूंनी चुरचुरीत होईपर्यंत तळावीत .
- ही कापे बेकरीच्या लुसलुशीत पावात घालून सुद्धा अतिशय छान लागतात , अर्थात मी माझी आवड सांगितली बरं का !
- कृती : सुरणाचे काप
- एका कढईत १ ते दीड लिटर पाणी आणि १-२ टीस्पून मीठ घालून उकळत ठेवावे . त्यात सुरणाचे तुकडे घालून साधारण १० मिनिटे उकडून घ्यावेत . अति नरम होऊन तुटेपर्यंत शिजवू नयेत .
- शिजलेले सुरणाचे तुकडे एका ताटलीत काढून घ्यावेत . त्यांना चिंचेचा कोळ लावून घ्यावा आणि १५ मिनिटांसाठी मुरत ठेवावेत .
- तांदळाचे पीठ , मालवणी मसाला आणि मीठ एकत्र मिसळवून घ्यावे . त्यात हे तुकडे व्यवस्थित दाबून घोळवून घ्यावेत .
- तव्यावर तेल चांगले तापवून नंतर मंद आचेवर सुरणाचे काप दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत .
- हे सुरणाचे काप म्हणजे श्रावणात मत्स्याहार वर्ज्य असताना खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अतिशय उत्तम !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply