
कोकणी शाकाहारी जेवण हे सांबार ( दक्षिण भारतीय नव्हे ), उसळी, सुक्या भाज्या, तव्यात तेलावर परतलेल्या ताज्या भाज्या, लंगडी मध्ये शिजवलेल्या मिरच्यांच्या फोडणीवरच्या पालेभाज्या , फळभाज्या तसेच कंदांची कापे, तळलेली भरली मिरची, वड्या, दह्याच्या कोशिंबिरी, आंबट गोड चटण्या अशा नानाविध प्रकारांनी समृद्ध! मला ठाऊक आहे , काही ना काही मी नक्कीच विसरले असेन, वरील वर्गवारीत!
तर.. सांगायचा मुद्दा असा की कोकणात मिश्र भाज्या हा प्रकार सुद्धा आवडीने बनवल्या आणि खाल्ल्या जातात.

कोबीच्या कांदा – लसूण विरहित उपकरीत चणा डाळ हवीच.. न्हायतर आमचा पद्या मामा कोणाची पंगत जेवून आल्यावर करवादायचा , ” कसली ती कोबीची भाजी. नुसती sss उग्रट, चव ना ढव! “
कधी आई डब्यात कोबीची मालवणी मसाला घालून झणझणीत भाजी द्यायची , व त्यात हिरवे ताजे वाटाणे घालायला विसरायची नाही. एरवी कोबी न खाणारे माझे इंजिनिअरिंग चे मित्र माझा डब्बा चाटून पुसून गुपचूप माझ्या दप्तरात ठेवून द्यायचे. आज काय .. वालाचे बिरडे , मग आजीच्या बाजार पिशवीतून पडवळाचे नळकांडे बाहेर डोकावयाचेच! अळसांडे आणि भोपळ्याचे मिलन , आमची सावंत आत्या वारंवार करायची! ताजी फडफडीत फरसबी नी मोड आलेली मटकी ही हातोहात , कढई चाटून पूसून लख्ख !

तसेही कोकणी माणसाचं काळया वाटाण्यांवर अतोनात प्रेम! लांबलचक मोड आलेल्या काळया वाटाण्याचे सांबार , काळ्या वाटाण्याची कोरडी उसळ , याशिवाय ताजी फडफडीत गवार घालून काळया वाटाण्याची रस्सा भाजी , अगदी आवडीने खाल्ली जाते! श्रावण– भादवात मत्स्यआहार, मांसाहार बंद असताना मत्स्यगोत्रीं कोकणी माणसाच्या जिभेला चव आणण्याचे काम तर हे भाजी करतेच परंतु पितृपक्षात पितरांना खाऊ घालण्यात येणाऱ्या वाडीत ( पितरांच्या नैवेद्याचे ताट ) पाच ताज्या भाज्यांचा समावेश होतो . त्यात ही गवार काळ्या वाटाण्याची मिश्र भाजी बनवली जाते . पितरांच्या कर्तृत्वाने राखलेल्या जमिनी , घर , इस्टेट यांमुळे पुढच्या पिढीचे जीवन सुखकर होते , आणि त्याचमुळे धरतीत पिकलेल्या ताज्या भाज्या या वाडीत आवर्जून शिजवल्या जातात , अशी धारणा आहे .
आज खास तुमच्यासाठी ही गवार काळ्या वाटाण्याची भाजी मी आणलीय , नक्की करून पहा , आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका !


- कितीजणांना पुरेल : ३ ते ४
- तयारीसाठी वेळ : ८ ते १० तास ( वाटाणे भिजवण्यासाठी )
- शिजवण्यासाठी वेळ: ४५ मिनिटे
- साहित्य:
- १ कप = २०० ग्रॅम्स काळे वाटाणे मोड काढून
- चवीनुसार मीठ
- अर्धा कप = ५० ग्रॅम्स किसलेले सुके खोबरे
- तेल
- ७-८ लसणीच्या पाकळ्या
- २ लहान कांदे = १०० ग्रॅम्स लांब चिरलेले
- अर्धा कप ताजी कोथिंबीर
- पाव टीस्पून हिंग
- ८ -१० कढीलिंबाची पाने
- १ टीस्पून हळद
- ३ टेबलस्पून मालवणी मसाला
- २५० ग्रॅम्स गवारीच्या शेंगा , धुऊन अर्धा इंचाचे तुकडे करून
- १०० ग्रॅम्स टोमॅटो प्युरी
- २ टीस्पून गूळ
- कृती:
- काळे वाटाणे २ कप पाण्यात १ टीस्पून मीठ घालून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्यावेत .
- सुके खोबरे एका कढईत खरपूस भाजून घ्यावे . त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्यावे . त्यात लसूण घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावी .
- चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा . नंतर कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यावी. भाजलेले खोबरे घालून नीट एकत्र करून घ्यावे . गॅस वरून उतरवून थंड होऊ द्यावे . साधारण पाऊण कप पाणी वापरून वाटण बारीक करून घ्यावे .
- कढईत ३ टेबल्स्पून तेल घालून गरम करावे . त्यात हिंग , कढीलिंबाची फोडणी करावी . नंतर ;हळद, आणि मालवणी मसाला घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे . वाटण घालून अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे .
- मसाला शिजला की त्यात गवार घालून १ कप गरम पाणी घालावे . झाकून शिजू द्यावी .
- दहा मिनिटानंतर शिजलेले काळे वाटाणे घालून एकत्र करून घ्यावेत . टोमॅटो प्युरी घालावी , अर्धा कप गरम पाणी घालावे . झाकून मंद आचेवर शिजू द्यावे .
- भाजी शिजत आली की त्यात गूळ आणि चवीपुरते मीठ घालावे .
- गरमागरम घडीची पोळी , फुलके , तांदळाची / नाचणीची भाकरी, वडे किंवा भातासोबत उत्कृष्ट लागते !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply