
“किती सांगू मी सांगू कुणाला , आज आनंदी आनंद जाहला..” “जिस्का मुझे था इंतेझार , वो घडी आ गयी आ गयी… “
आज हमको मिले हैं लहानुले बांगडूले , अभी हमने बनाये उसके सुके….
शिजलेला बांगडा न तुटता अख्खाच्या अक्खा , अलगद ताटात , गरमागरम लाल भातावर मी गुणगुणतच वाढून घेतला . बाल्कनीत खुर्च्या टाकून पार्टनर आणि मी तब्बल १५ मिनिटे एकही अक्षर एकमेकांशी न बोलता खात राहिलो . खाऊन झाल्यावर बोटे चाटूनपुसून घशातून गर्र आवाज काढत पार्टनर तृप्तीचा ढेकर देऊन खुर्चीत मागे आरामात रेलला ! डोळ्यांच्या पापण्या आपसूकच जडावल्या , आणि त्यानंतरचे शास्त्र म्हणजे रविवारची वामकुक्षी टाळणे म्हणजे भयंकर प्पाप की हो !

या वरील सीन साठी आणि बांगड्यांच्या सुक्क्यासाठी मी साधारण दोन महिने माझ्या मासेवाल्याच्या डोक्याचा काटा काढला होता .. “अरे भावा बांगडूले आण ना… “असा सारखा धोशा लावला होता..” मग पाऊस–थंडी गेल्यावर काय रे मजा सुक्याची .. ” बांगडा सुका घालायचा ,नाचणीची भाकरी थापायची, नी लाल तांदळा चा भात रटरटवायचा .. नी मग बाहेर मुसळधार पाऊस बघत जेवायचे आणि वाकळ घेऊन मस्त गुडूप दोन तासांची वामकुक्षी!

माझी ही फूड fantasy ऐकुन माझ्या पार्टनर सकट मासेवाल्याने सुद्धा कपाळावर हात मारला. फोनवर लहान बांगडे आल्याचे सांगताना खीखी करत म्हणाला सुद्धा,, ” ताई आज forecast आहे पावसाचा, घेऊन जा बांगडूले ” ..वात्रट कुठला!
आताशा त्याची नी माझी चांगली गट्टी जमलीय . खेकडे, पापलेट फोन करून विचारून अगदी चांगले मोठ्ठाले बाजूला काढून ठेवतो . तर आज माझ्या वाचकांसाठी घेऊन आलेय , बांगड्यांचे सुके – तिखट , आंबट , एकदम एक नंबर ! त्यानंतरचा प्लॅन फॉललो करून पहा … १०० टक्के आनंदाची गॅरंटी माझी !


- कितीजणांना पुरेल : ४-५
- तयारीसाठी वेळ : १५ मिनिटे
- शिजवण्यासाठी वेळ : १५ मिनिटे
- साहित्य:
- ४०० ग्रॅम्स लहान आकाराचे बांगडे - बांगडुले , स्वच्छ धुऊन , साफ करून , दोन तुकडे करून घ्यावेत ( अगदीच लहान असेल तर अख्खा ठेवलात तरी चालेल )
- दीड इंच आल्याचा तुकडा
- १२-१५ लसणीच्या पाकळ्या
- ५-६ हिरव्या मिरच्या
- अर्धा कप कोथिंबीर
- पाव कप किसलेले ओले खोबरे
- १० बेडगी सुक्या लाल मिरच्या ( रंग उत्तम येतो )
- ८ कोकमं ( आंबटपणाच्या चवीनुसार कमी जास्त घ्यावीत )
- १० -१२ कढीलिंबाची पाने
- १ टीस्पून धणे
- पाव टीस्पून तिरफळे
- अर्धा पाव टीस्पून मेथी
- सव्वा टीस्पून हळद
- मीठ चवीनुसार
- तेल
- कृती:
- सर्वप्रथम बांगड्यांच्या तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ व्यवस्थित चोपडून घ्यावे . थोडी हळद वाटणासाठी बाजूला काढून ठेवावी . बांगडे हळद मिठात १५ मिनिटे मुरू द्यावेत .
- अर्धा कप गरम पाण्यात आमसुले/कोकमं भिजत घालावीत .
- इतर सगळे साहित्य ( कढीलिंब, तेल व मीठ सोडून ) मिक्सरमधून किंवा पाट्यावर थोडे पाणी घालून गंधासारखे बारीक वाटून घ्यावे . साधारण अर्धा कप पाणी मी वाटणात वापरले आहे .
- एका कढईत अडीच टेबलस्पून तेल गरम करून त्यात कढीलिंबाची फोडणी करावी . त्यात वाटलेला मसाला व मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून मिसळावे . हा मसाला तेलात चांगला शिजेपर्यंत झाकून शिजवावा . साधारण ८ मिनिटे लागतात .
- मसाला शिजला की त्यात पाव कप पाणी घालावे . हे सुक्के मसालेदार असते , म्हणून त्यात अति पाणी घालू नये . एकेक बांगड्याचा तुकडा या मसाल्यात नीट लावून घ्यावा . चमच्याने जोरजोरात हलवू नये नाहीतर मासे तुटतात . झाकून शिजू द्यावेत .
- साधारण ३ मिनिटांत मासे शिजत येतात . यात आता भिजवलेली कोकमं पाण्यात चुरून , त्या पाण्यासकट मिसळून द्यावीत . चवीपुरते मीठ घालावे . झाकून अजून दोन मिनिटे सुक्के शिजू द्यावे म्हणजे सगळ्या चावी एकत्र मिळून येतील .
- पूर्ण पाच मिनिटे शिजून आपले बांगड्यातले आमसुलातले सुक्के तयार आहे . झाकण घालून थोडा वेळ मुरल्यानांतरच हे वाढायला घ्यावे म्हणज अजून चविष्ट लागते .
- गरमगरम भात , नाचणी किंवा तांदळाची भाकरी यासोबत अप्रतिम लागते हे बांगड्याचे सुक्के !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Click to watch recipe video
Leave a Reply