
सकाळच्या घाई गडबडीत रोज नाश्त्याला काय बनवायचे ,मग दुपारच्या डब्याला आणि घरात लंच ला कोणती भाजी ,, संध्याकाळच्या नाश्त्याच्या डब्यात काय खाऊ आणि वर रात्री जेवणात काय मेनू ह्या सगळ्यांचे प्लँनिंग करणे हे नक्कीच ” खायचे काम नाही बुवा ” ! तसेच ते खाणे आरोग्यदृष्ट्या उपयुक्त असणे याकडे आजकाल सगळ्यांचा कल असतो , ही नक्कीच स्पृहणीय बाब आहे .
आमच्या घरी सकाळची न्याहारी कधीच टाळली जात नाही , अगदी पोट खराब असेल तेव्हा सुद्धा ताज्या फळांची फ्रुटप्लेट पार्टनर पुढ्यात ठेवतोच ! अजूनही न्याहारीत गरमागरम भाकऱ्या किंवा तेलावरची खरपूस पोळी आणि चहा किंवा जोडीला हळद मिरची घातलेली अंड्याची पोळी खाणारी पिढी आमची … तांदळाच्या किंवा रव्याच्या इडल्या , चण्याच्या पिठाची धिरडे , थालीपीठे ह्या आयटेम्स ना नाश्त्यात अगदी वरचे स्थान ! सकाळी सकाळी असे कमी तेलकट आणि घरी बनवलेली न्याहारी केली की गडी कामाचा रगडा उपसायला एकदम तयार !

कधी मग आप्प्याचा तवा खुणावायला लागतो मग दुसऱ्या दिवशी इडली बॅटरचे गोल गोल आप्पे , रव्याचे अप्पे व मिश्र डाळींचे आप्पे नाश्त्याच्या ताटात सजतात , कधी वीकएंड ला लहर आली की नजीकच्या हलवायाकडून गरमागरम जिलेबी आणि लुसलुशीत ढोकळा आणला जातो , अर्थातच त्या दिवशी डाएटचा चीट डे असतो हे सांगायला नकोच !

मला ढोकळा प्रचंड आवडतो , परंतु रोजच्या गडबडीत तो बनवायचा राहून जातो ,म्हणून त्याला पर्याय म्हणून मी इन्स्टंट रवा ढोकळा बनवते , एकदम हेल्दी आणि चविष्ट . हा ढोकळा बनतो देखील झटपट , याचे बॅटर आदल्या दिवशी बनवून फ्रिजमध्ये ठेवल्यास सकाळी त्यात फ्रुट सॉल्ट घालून तुम्ही झटपट वाफवून घेऊ शकता . हा मुलांच्या छोट्या सुटीच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम ऑप्शन आहे .

चला तर मग वेळ न घालवता पाहूया ही झटपट रेसिपी …


- १ कप = २०० ग्रॅम्स बारीक रवा ( बॉम्बे रवा )
- पाऊण कप = १८० ग्रॅम्स दही
- ४ हिरव्या मिरच्या
- अर्धा इंच आल्याचा तुकडा
- अर्धा टीस्पून मीठ
- अर्ध्या लिबचा रस
- दीड टीस्पून साखर
- पाव कप कोथिंबीर
- २ इनो रेग्युलर ( चवविरहित ) ) पाकीट ( ५ ग्राम प्रत्येकी )
- अर्धा टीस्पून मोहरी
- १ टीस्पून पांढरे तीळ
- चुटकीभर हिंग
- १० -१२ कढीपत्ता
- १ हिरवी मिरची बारीक चिरलेली
- पाव टीस्पून लाल मिरची पूड
- १-२ टेबलस्पून तेल
- पाणी गरजेनुसार
- आल्याचे तुकडे, मिरच्या आणि २ टेबलस्पून कोथिंबीर मिक्सरमधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी .
- एका बाऊलमध्ये दही , वाटलेला मसाला , मीठ , साखर आणि लिंबाचा रस घालून नीट फेटून घ्यावे , गुठळ्या राहू देऊ नयेत .
- अर्धा कप पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यावे . यात थोडा थोडा रवा घालून नीट एकत्र करून घ्यावे . १ टीस्पून तेल घालावे म्हणजे ढोकळा आतून लुसलुशीत बनतो . अजून पाव कप पाणी घालून एकत्र ढवळून घ्यावे . हे मिश्रण झाकून १५ मिनिटे बाजूला ठेवावे .
- एका प्रेशर कुकर मध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . ढोकळ्याच्या मिश्रणाला झाकून १५ मिनिटे झाली की कुकर च्या डब्याला आतून तेल लावून घ्यावं. मिश्रणात इनो घालून वरून १-२ टीस्पून पाणी घालावे . ऍक्टिव्हेट झालेले इनो मिश्रणात नीट ढवळुन घ्यावं , मिश्रणावर बुडबुडे दिसू लागतात ! वेळ न दवडता लगेच हे मिश्रण डब्यात ओतून घयावे . हा डबा कूकरमध्ये एका स्टॅण्डवर ठेवून कूकरचे झाकण लावून घ्यावे , शिटी काढून टाकावी . मोठ्या आचेवर २ मिनिटे वाफ बाहेर यूएईपर्यंत शिजवावे नंतर आच मंद करून १२ -१३ मिनिटे वाफवून घ्यावे .
- गॅस बंद करून कुकर जरा थंड झालयावर उघडावा . ढोकळा थंड झाला की डब्याच्या कडेने सूरी गोल फिरवून त्याच्या कांदा सैल करून घ्याव्यात आणि एका ताटात काढावा .
- लाल मिरची पूड वरून भुरभुरावी . आपल्या हव्या त्या लहान मोठ्या आकारात ढोकळा चौकोनी कापून घ्यावा .
- १ -२ टेबलस्पून तेल गरम करून त्यात तीळ खरपूस तळून घ्यावेत . नंतर त्यात मोहरी , हिंग , होरवी मिरची आणि कढीपत्ता घालून चरचरीत फोडणी करून घ्यावी . ही फोडणी ढोकळ्यावर घालावी . मस्त रव्याचा लुसलुसुशीत मऊ ढोकळा तयार !
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Leave a Reply