
मला माझे बरेच मित्रमैत्रिणी , आप्तेष्ट विचारतात की, तुला जेवण बनवण्याचाच छंद का लागला , कारण जे मला अगदी जवळून ओळखतात त्यांनी माझे निरनिराळे छंद अगदी जवळून पाहिलेत!
जसे की मराठी साहित्य वाचन , नृत्य आणि मुख्य म्हणजे अभिनयाची आवड! खरं सांगू का ,जर १० वर्षांपूर्वी मला कोणी एखाद्या ज्योतिषाने जरी म्हटले असते, की मी आयटीची लठ्ठ पगाराची नोकरी सोडून या क्षेत्रात नशीब अजमावणार आहे तर मी हसून पुढे गेले असते! मलाच या गोष्टीची अगदी तसूभरही कल्पना नव्हती! जेवण बनवणे ही एक माझ्यासाठी काळाची गरज ठरली. नोकरीला लागल्यावर पहिल्या एका महिन्यातच ,मेसमधून येणाऱ्या डब्यातलया एकाच चवीच्या भाज्या खाऊन मला होम सिक व्हायला लागले. असच एकदा रात्री कोरड्या थंड झालेल्या पोळीचा घास गिळताना आईला फोन लावला ! विचार केला आईशी बोलता बोलता ते बेचव जेवण खाणे सोप्पे होईल. पण कसचे काय, आईचा प्रेमळ आवाज ऐकला आणि हुंदका आवरला नाही! मी रडत रडतच आईला विचारले , ” आई मला तुझ्या हातची चव कधी ग खायला मिळणार, मला तर काही सुद्धा बनवता येत नाही !मला मासे खायला इतके आवडतात , ते पण आता मला हवे तेव्हा खाता येणार नाहीत !” मला असे वाटले कि आई सुद्द्धा आता थोडीशी भावूक होईल आणि माझे लाड लाड करून सांत्वन करील!
अहो पण धीर देणार नाही ती माउली कुठली ! अगदी सफाईने आपल्या आवाजातला कंप जाणवू न देता मला तिने स्वतः स्वयंपाक करायला शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं ! आईचे ते बोल आणि मासे खायची प्रचंड आवड हीच मुख्य कारणे होती माझ्यात स्वयंपाकघराची ओढ निर्माण करायला !

तर असे हे माझे मत्स्यप्रेम .. माझ्या ब्लॉग वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेल वर मी बऱ्याच गोवन , मालवणी, कर्नाटक, आणि केरळातल्या प्रसिद्ध माशांच्या पाककृती अपलोड केल्या आहेत. एके दिवशी नेहेमीप्रमाणे माझ्या दर्शकांच्या कंमेंट्स ना प्रतिसाद देताना एक छानशी कंमेंट वाचण्यात आली, ती होती माझ्या ब्लॉगच्या वाचक जयश्री ताईंची ! जयश्री ताईंनी खूप मनमोकळेपणे माझ्या रेसिपींची तारीफ करत माझ्याकडे प्रेमळपणे एका रेसिपीची रिक्वेस्ट केली ” माशांचे खेंगट” !
कोकणात मालवणी भाषेत याला खेंगाट असेही म्हटले जाते. ही इतकी सरळ साधी रेसिपी आहे आणि ती मुख्य म्हणजे कोकणी घरांतच बनवली जाते . त्यांची कंमेंट वाचल्यावर माझे आठवणींचे गलबत अगदी मला माझ्या जन्मभूमीत म्हणजे रत्नागिरीत घेऊन गेले. आम्ही जेव्हा सुट्ट्यांमध्ये कोकणात जायचो ना तेव्हा माझी काकू रापणीवर मिळालेल्या ताज्या माशांचे खेंगाट करून खायला घालायची. या खेंगटाचे वैशिष्ट्य म्हणजे यात फार मोठे मासे जसे सुरमई, पापलेट, बांगडे नाही वापरले जात! खेंगाटाला खरी चव येते ती लहान माशांमुळे. जसे की मोदक, मांदेली , छोटे बोंबील, करंदी आणि जर अजून कुठले छोटे बोटांएवढे मासे असतील तर क्या बात ! हे सगळे मासे एकत्र करून खेंगट बनवले जाते , हा रस्सा थोडा घट्ट केला तर भाकरीबरोबर आणि पातळ केला तर कोकणातल्या हातसडीच्या आंबेमोहोर तांदळाच्या भाताबरोबर अप्रतिम लागतो. माझ्या आईला तर फार आनंद झाला की साता समुद्रापार राहणाऱ्या माझ्या दर्शकांना हे खेंगट बनवून खावेसे वाटतंय!
मला ठाऊक होते की माझ्या मासेवाल्याकडे हे छोटे मासे मिळणार नाहीत. मग एका रविवारी मी आणि पार्टनर ने थेट गाठले पुण्यातल्या खडकीचे मासळी बाजार! तिथलया कोळीण काकूंना थोडासा त्रास देऊन जेवढ्या पद्धतीचे लहान मासे होते तितके उचलून आणले. काय झक्कास खेंगटाचे कालवण झाले म्हणून सांगू , भरपूर ओरपले भाताबरोबर!
आज ही रेसिपी माझ्यावर प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या जयश्री ताईंसारख्या वाचकांसाठी खास !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- आपल्या आवडीप्रमाणे लहान मासे घ्यावेत . मी खालील मासे घेतले आहेत .
- ओले छोट्या आकाराचे बोंबील - १०० ग्रॅम्स ( धुऊन , लहान तुकडे करून )
- मोदक किंवा बिलज्या मासे - १०० ग्रॅम्स
- लहान मांदेली - १०० ग्रॅम्स
- चिंगळ्या मासे - १०० ग्रॅम्स
- लहान कोळंबी - १०० ग्रॅम्स ( करंदी मिळाली तर उत्तमच )
- १०-१२ कढीपत्ता
- ५-६ लसूण पाकळ्या सालीसकट
- १/४ टीस्पून हळद
- २-३ टेबलस्पून मालवणी मसाला ( आपल्या तिखट चविनुसार कमी - जास्त घालावा )
- ५-६ कोकम
- मीठ
- तेल
- १ १/२ इंच आल्याचा तुकडा
- १५-१८ लसणीच्या पाकळ्या
- १ कप कोथिंबीर
- सर्वप्रथम आपण मसाला वाटून घेऊ. एका मिक्सरच्या भांड्यात आले,लसूण आणि कोथिंबीर घालून पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. वाटण्यासाठी मी अर्धा कप पाणी वापरले आहे आणि मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप पाणी घालून मसाल्याचे वाटण एका वाडग्यात काढून घेतले आहे .
- एका कढईत ३ टेबलस्पून तेल तापवून घ्यायचे आहे. कढीपत्ता घालून ज्या लसणीच्या पाकळ्या सालीसकट आहेत त्या चेचून फोडणीत घालाव्यात . लसूण गुलाबी रंगावर परतून घ्यावी.
- आता मसाल्याचे वाटण आणि हळद घालून परतून घ्यावे. मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मालवणी मसाला आणि मीठ घालून मिसळून घ्यावे. हा मसाला एकत्र चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा. कोरडा होत असल्यास थोडे थोडे पाणी घालून झाकण घालून परतावा.
- ५ मिनिटे आपण मसाला झाकण घालून परतला आहे , छान तेल सुटू लागले आहे. आता त्यात जेवढे घट्ट किंवा पातळ कालवण हवे असेल तेवढे पाणी घालू कारण यात मासेही शिजणार आहेत. म्हणून मी २ कप पाणी घातले आहे. चवीपुरते मीठही घालून घेऊ. मोठ्या आचेवर एक उकळी येऊ देऊ.
- उकळी आल्यावर आच मंद करू आणि मासे घालून घेऊ. झाकण घालून शिजू देऊ.
- ६ मिनिटे मासे शिजवले आहेत , कालवण ही थोडे घट्ट झाले आहे. या उप्पर मासे जास्त शिजवले तर ते तुटून त्यांचा गोळा होतो. आता कोकम घालून बस २ मिनिटे कालवण शिजवायचे आहे जेणेकरून कोकमाचा रस उतरेल. कोकम नसेल तर १-२ टेबलस्पून चिंचेचा कोळ घालावा.
- २ मिनिटांनंतर गॅस बंद करावा आणि झाकण घालून कालवण थोडे मुरू देऊन मग वाढावे. हे तांदळाच्या/नाचणीच्या/ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा मऊ भातासोबत खूपच छान लागते .
God bless you my dear. I read your this article to my dear husband and he was very much pleased. I have well noted this recipe and will try it soon.
Once again my special thanks to your lovely Mom, Aunt, Aaji and last but definitely not least to you dear. Wish you all the success into your food industry. I said FOOD INDUSTRY, got it. I have full confidence in you, what I gathered throughout your writings, that you’re a one heck of a woman who can succeed in any endeavors in life that you put your mind into.
All the best to you.
Jayashri Tai,, I have no words to express how ecstatic I am right this moment ! You and people like you , whom I met in this Internet’s world are my real assets ,you motivate me, you appreciate me and you help me to improve! What else we expect from our family ! My confidence is really really high now after reading your comment ,you indeed built our morals high ! Thank you so much , and just be with us 🙂 We are really blessed with your positivity ! 🙂
You bet Smita!