
“नभ उतरू आले , चिंब थर्थर वल ,अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात …” असच काहीसे दृश्य ! शनिवारची निवांत संध्याकाळ , बाल्कनीत हात बाहेर काढून पावसाचे थंडगार तुषार झेलत उभी मी ..
तेवढ्यात पार्टनर गरमागरम वाफाळत्या कॉफीचे दोन मग्स घेऊन हजर.. कसे कळते याला , कोणत्या वेळी माझ्या मनात काय विचार असतील.. कौतुकाने त्याच्याकडे पाहत कॉफीचे घुटके घेत माझे मन त्या पावसात चिंब भिजायला लागले. तसे पार्टनरला सगळे ऋतू आवडतात , त्याचे असे म्हणणे की ऋतूप्रमाणे स्वतःला ऍडजस्ट करून घेतले ना की सगळे छान वाटते. मला मात्र हा कोसळणारा पाऊसच जास्त लाडका .. त्याचे रौद्र रूप किती भयावह असते हे मुंबई पुण्यात झालेल्या पडझडींमुळे दिसून आलेय, आणि त्याचा खेदही वाटतो. परंतु पडणारा पाऊस मला खूप आनंदित करतो. बाल्कनीतली तुळस, पिवळा जासवंद आणि माझा गुलाब टवटवीत होऊन माझ्याकडे खुद्कन हसतात.

घराजवळच्या झाडांवर आणि कधी कधी माझ्या वळचणीलाही छोटे छोटे पक्षी आपले भिजलेले पंख फडफडवत नुसता कल्ला करतात . नकळत मनात सगळ्या आठवणींच्या, भावनांच्या लाटा उसळू लागतात .. पावसाची कितीतरी गाणी गुणगुणत मी तासनतास पाऊस न्याहाळत राहते . आशा भोसलेंच्या आवाजातले हे वरील गाणे सुद्धा माझ्या अगदी मनातले गाणे .. सुंदर प्रेम गीत ,, अंगावर रोमांच उभे करणारे ..

खांद्यावर पार्टनरने लाडिक टपली मारली आणि म्हणाला ,” चल ना काहीतरी चमचमीत खायला बनवू.. “पाऊसही थांबला होता , काय करावे खायला याचा विचार करत असतानाच सकाळी नाश्त्याला केलेल्या इडल्यांपैकी काही उरल्या होत्या फ्रिजमध्ये . नेहमीची साऊथ इंडिअन मसाला इडली बनवणार तेवढ्यात पार्टनरने नेहमीपेक्षा वेगळे असे चायनीज बनवूया का असा प्रस्ताव ठेवला. मग पटापट १० मिनिटांतच चिली इडली फ्राय तयार, आणि पावसाचा दुसरा राऊंड सुरु होतोय ना होतो तोवर आम्ही दोघे आमच्या चिली इडलीच्या ताटल्या घेऊन पुनःश्च बालकनीत हजर! त्यानंतर ज्या गप्पा रंगल्या त्या अंधार पडेपर्यंत .. परफेक्ट वीकएंड परफेक्ट वीकएंड काय असतो हो , हाच की तो ..
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ७ इडल्या
- १ मोठा कांदा = ९० ग्रॅम्स चौकोनी तुकड्यांत चिरून
- अर्धा कप पातीचा कांदा चिरून
- १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
- ३-४ हिरव्या मिरच्या मध्यभागी लांब चिरून
- दीड कप लाल,हिरवी,पिवळी भोपळी मिरची , चौकोनी तुकड्यांत चिरून
- ५-६ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
- दीड इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून
- दीड टीस्पून रेड चिली सॉस
- दीड टीस्पून ग्रीन चिली सॉस
- १ टीस्पून सोया सॉस
- अर्धा टीस्पून व्हिनेगर
- पाव टीस्पून काळी मिरी जाडसर कुटून
- मीठ चवीप्रमाणे
- ३ टेबलस्पून टोमॅटो केचअप
- तेल
- इडल्या ४ तुकड्यांत कापून घ्याव्यात . एका बाऊलमध्ये इडल्या घालून त्यात कॉर्नफ्लोअर घालून मिसळून घ्याव्यात .
- एका कढईत पुरेसे तेल तापवून घ्यावे. त्यात इडल्या तळून घ्याव्यात . कॉर्नफ्लोअरच्या आवरणामुळे इडल्या छान कुरकुरीत होतात आणि आतून अगदी लुसलुशीत.
- इडल्या बाहेरून हलक्या लालसर होईपर्यंतच तळाव्यात . एका ताटलीत किचन टिश्यू पेपरवर काढून घ्याव्यात .
- एका पसरट पॅनमध्ये ३ टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे. आच मोठी ठेवावी कारण ही इंडो चायनीज डिश आहे , चायनीज हे नेहमी मोठ्या आचेवरच बनवले जाते . आले आणि लसूण घालून चांगले खरपूस परतून घ्यावे. नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून ३० सेकंद परतून घ्यावा. नंतर पातीचा कांदा , भोपळी मिरचीचे तुकडे घालून १ मिनिट परतून घ्यावे. नंतर आच थोडी मध्यम करून झाकण घालून वाफेवर भाज्या शिजू द्याव्यात.
- भाज्या शिजण्यासाठी फक्त १ ते दीड मिनिट पुरेसा आहे कारण आपल्याला या भाज्यांमध्ये एक क्रन्च हवा आहे . भाज्या मऊ होईपर्यंत शिजवू नयेत.
- आता सॉसेस घालून घेऊ - रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचअप . नीट एकत्र करून घेऊ.
- १ मिनिट परतून घेतल्यानंतर त्यात इडलीचे तुकडे , काळी मिरी पावडर , आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेऊ.
- आता शेवटी व्हिनेगर घालून , ढवळून गॅस बंद करू.
- चिली इडली फ्राय तयार आहे. टोमॅटो केचअप किंवा शेजवान चटणीसोबत गरम गरम खायला द्यावे !
- उरलेल्या इडल्यांचे काय करायचे हा प्रश्न असतो. शिळ्या खाण्याला आम्ही उत्तेजन देत नाहीये ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगू इच्छिते. परंतु इडल्या उरल्याचं तर या रेसिपीसाठी शक्यतो वापराव्यात. ताज्या इडल्या असतील तर किमान अर्धा एक तास फ्रिजमध्ये ठेवून मग या रेसिपीसाठी वापराव्यात म्हणजे त्या थोड्या टणक होतात आणि तुटत नाहीत .
Leave a Reply