
उद्या जगभरात रमदान ईद साजरी होणारेय.इस्लामी दिनदर्शिकेचा रमदान हा नववा महिना . याच महिन्यात मुहम्मद पैगंबरांनी खडतर भक्ती आणि अखंड साधना करून ईश्वराकडून पवित्र कुराणाची महती ऐकली असे मानतात !
रमदानचा अर्थ असा आहे की या महिन्यात जो निस्वार्थपणे ईश्वरभक्ती करतो त्याचे सारे पाप जळून खाक होतात . इस्लाम धर्मानुसार हा महिना खऱ्या अर्थाने आत्मचिंतनाचा एक मार्ग भक्तांना खुले करून देतो. केलेल्या चुकांवर विचार करून भविष्यात त्यांची पुनरावृत्ती टाळणे, संयम, त्याग , संवेदनशीलता , प्रेम , प्रामाणिकपणा असे गुण अंगी बाळगवणारा हा सण ! हा महिना सुरु होण्यापूर्वीच घराघरांत रमदानच्या स्वागतासाठी मुस्लिम बंधुभगिनिंची लगबग सुरु होते. घरे आणि अंगण यांची झाडून स्वच्छता केली जाते . पवित्र महिन्याचे रोजे म्हणजेच उपवास करताना वातावरण ही शुद्ध असलेच पाहिजे हा या मागचा उद्देश ! शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी सूर्योदयापूर्वीपासून सुरु होणारे उपवास म्हणजे रोजे, ते सूर्यास्तासोबत त्यांची सांगता होते .दिवसभरात पाण्याचा घोटही न घेता इतकेच काय , थुंकी देखील न गिळता जिव्हेवरचे नियंत्रण बरेच काही शिकवून जाते . दिवसांतून पाच वेळा नमाज पठाण , धर्मग्रंथांचे पारायण , ईश्वर चिंतन यांमुळे सगळीकडे आल्हाददायक पवित्र वातावरण असते .

आरोग्याच्या दृष्टीने चौरस आहार घेऊन केलेले रोजे खर तर बॉडी डिटॉक्सिफिकेशन चा एक उत्तम मार्ग आहे! सूर्योदयापूर्वी उपवास सुरु होण्याआधीची सेहरी ही महत्त्वाची . जितके पचायला हलके , फायबरयुक्त ताकद देणारे खाणे आणि भरपूर द्रव पदार्थ म्हणजे फळांचे रस, पाणी यांचे सेवन सेहरित करावे असे म्हटले जाते. ज्यामुळे पूर्ण दिवस शरीर उपवासाचा शीण झेलू शकते . सूर्यास्तानंतर रोजे सोडण्याची वेळ म्हणजे इफ्तारी ! लगेचच भरपेट खाण्यापेक्षा खजूर , एखादे फळ , चुटकीभर मीठ आणि पाण्याचे सेवन करून रोजे सोडण्यावर भर दिला जातो , मग थोडा वेळ थांबून निरनिराळे चविष्ट परंतु तितकेच आरोग्यास फायदेशीर खाद्यपदार्थ बनवून कुटुंबासोबत सेवन केले जातात . इस्लाम मध्ये इफ्तारी ही गोरगरिबांसोबत सुद्धा वाटून साजरी करावी असा संदेश दिला जातो , जेणेकरून या पवित्र महिन्यात सगळ्यांना पोटभर अन्न मिळावे असाच प्रामाणिक संदेश दिला जातो !

ईद म्हणजे आनंदाचा , परोपकाराची , बांधिलकीचा उत्सव. , सारे अवगुण मागे टाकून श्रेष्ठ गुणांना अंगी बाणवण्याचा संदेश देणारा हा सण सर्वांना सुखमय जावो हीच प्रार्थना !
आज तुमच्यासाठी रमदान विशेष रेसिपी – चिकन दम बिर्याणी !
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा


- ७५० ग्रॅम्स चिकन , मध्यम आकाराचे तुकडे करून, स्वच्छ धुऊन व साफ करून
- १ कप ताजी कोथिंबीर निवडून
- पाऊण कप ताजी पुदिन्याची पाने
- दीड इंच आल्याचा तुकडा
- १२ हिरव्या मिरच्या
- १२-१५ लसणीच्या पाकळ्या
- २ मोठे कांदे = २०० ग्रॅम्स लांब चिरून
- पाव कप = ३० ग्रॅम्स ओला नारळ खवून किंवा खोबऱ्याचे काप
- अर्धा कप = १२५ ग्रॅम्स दही
- पावणेदोन कप ( १ ३/४ ) = ३५० ग्रॅम्स लांब दाण्याचा बासमती तांदूळ
- २ तमालपत्र
- पाव टीस्पून हिरव्या वेलच्या
- १ चक्रीफूल
- १ टीस्पून शाही जिरे
- पाव टीस्पून लवंग
- अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
- मीठ चवीनुसार
- १/२ टीस्पून गरम मसाला पावडर
- १/४ टीस्पून जावित्री पावडर
- एका लिंबाचा रस
- १ टीस्पून केवडा जल
- तेल
- सर्वप्रथम आपण कांद्याचा बिरिस्ता बनवून घेऊ , म्हणजेच कांदा खरपूस कुरकुरीत करड्या रंगावर तळून घेऊ. त्यासाठी कांदा बुडेल इतपत कढईत तेल घालून मध्यम आचेवर कांदा तळून घेऊ. १५ मिनिटांत मंद ते मध्यम आचेवरकांदा खरपूस भाजला की गॅस बंद करून एका किचन टिश्यू पेपरवर काढावा .
- आता बिर्याणीसाठी हिरवं वाटण बनवून घेऊ . कोथिंबीर, अर्धा कप पुदिना ( बाकीचा पुदिना बिर्याणीच्या थरांसाठी बाजूला काढून ठेवावा ) , हिरव्या मिरच्या , लसूण, आले, खोबऱ्याचे तुकडे, लिंबाचा रस आणि अर्धा कप किंवा लागेल तसे पाणी घालून एकत्र बारीक वाटून घ्यावे .
- चिकनच्या मॅरिनेशनसाठी एका बाऊलमध्ये दही घेऊन चांगले फेटून घ्यावे . गुठळ्या राहू देऊ नयेत . त्यात गरम मसाला पावडर, हिरवे वाटण , चवीपुरते मीठ , अर्धा तळलेला कांदा हाताने चुरून घालावा . ३ टेबलस्पून तेल घालावे . शक्यतो कांदा ज्या तेलात तळला होता तेच तेल वापरावे . एकत्र नीट मिसळून घ्यावे .
- या मॅरिनेडमध्ये चिकनचे तुकडे घालून नीट मिसळून घ्यावेत . किमान २ तासांसाठी चिकन या मॅरिनेडमध्ये मुरू द्यावे . फ्रिजमध्ये ठेवण्यास विसरू नये .
- चिकन मॅरीनेट होऊन १ तास झाला की बिर्याणीचा भात शिजवण्याची तयारी करू. त्यासाठी तांदूळ स्वच्छ धुऊन पाण्यात ३० मिनिटांसाठी भिजवून ठेवावा. ३० मिनिटांनंतर एका कढईत २ लिटर पाणी उकळत ठेवावे . पाण्यात खडे गरम मसाले - लवंग, शाही जिरे , हिरव्या वेलच्या , चक्रीफूल, दालचिनी आणि तमालपत्रे , व १ टीस्पून तेल आणि मीठ घालावे . मीठ विसरल्यास बिर्याणीमध्ये भात फिका लागतो.
- पाण्याला उकळी आली की तांदळातील पाणी काढून टाकून भिजवलेला तांदूळ घालावा. मध्यम ते मोठ्या आचेवर भात ९० टक्के शिजेपर्यंत शिजवून घ्यावा . भाताचा एक कण कच्चा राहिला पाहिजे . भात चाळणीत काढून एका ताटात किंवा परातीत पसरून थंड होण्यास ठेवावा .
- चिकन २ तास मॅरीनेट झाले की फ्रिजमधून बाहेर काढावे . एका कढईत ३ टेबलस्पून तेल गरम करून त्यात चिकन मॅरिनेशनच्या मिश्रणासकट कढईत घालावे. झाकण घालून मध्यम आचेवर शिजू द्यावे. पाणी घालू नये . चिकनच्या अंगच्या पाण्यात आणि दह्याच्या मॅरिनेशन मध्ये चिकन शिजते . गरज लागली तरच पाणी घालावे. २० मिनिटे शिजल्यानंतर झाकण काढावे आणि मीठ गरज असल्यास चवीप्रमाणे अजून घालावे. परत झाकून मंद आचेवर शिजू द्यावे. साधारण ३५ मिनिटांत चिकन पूर्णपणे शिजते . गॅस बंद करावा .
- आता बिर्याणी दम वर शिजवण्यासाठी तिचे थर लावून घेऊ. भातामधून खडे गरम मसाले वेगळे काढून घेऊ जेणेकरून ते बिर्याणी खाताना दाताखाली येणार नाहीत! एका मोठ्या पातेल्यात किंवा हंडीत किंवा कूकरच्या भांड्यात ( शिटी काढून ) तळाला व भांड्याच्या बाजूंना तेलाचा हात लावून घेऊ. सगळ्यात पहिला थर हा चिकन रस्स्याचा असणार आहे . त्यावर थोडी जावित्रीची पावडर भुरभुरावी. तळलेला कांदा घालावा . दुसरा थर भाताचा लावून घ्यावा . त्यावर जावित्री पावडर, पुदिन्याची पाने , उरलेला कांदा आणि केवडा जल घालावे. पातेल्याला अल्युमिनिम फॉईल ने झाकून वर घट्ट झाकण घालावे.
- बिर्याणीचे पातेले मोठ्या आचेवर २ मिनिटे ठेवावे . वाफ बाहेर पडू नये यासाठी वरवंटा किंवा तत्सम जड वस्तू पातेल्यावर ठेवावी. एक लोखंडी तवा दुसऱ्या आचेवर चांगला तापवून घ्यावा. २ मिनिटांनंतर पातेले तव्यावर ठेवावे आणि आच मंद करावी. बिर्याणीला मंद आचेवर १० मिनिटे दम द्यावा.
- बिर्याणी १० मिनिटांनंतर गॅसवरून खाली उतरवावी . ५ मिनिटांनंतर गरम गरम वाफाळती बिर्याणी आवडीच्या रायत्यासोबत किंवा सालन सोबत वाढावी!
Leave a Reply