
शनिवार रविवारची मी आतुरतेने वाट पाहते.. ह्यातला एकच दिवस आमचा डाएट ला फसवण्याचा दिवस असतो ना.. आज रविवारची सकाळ , इतरांना आळसावलेली हवीहवीशी असते मला मात्र १२ हत्तींचे बळ आले आज . सकाळी सकाळी उठून पहिला चहा पिऊन( पार्टनर च्या हातचा ) , शुचिर्भूत होऊन गरमागरम कटवडा बनवला !
भारीच या कट वड्याने खुळे केले होते .. मागच्या आठवड्यात रत्नागिरीला गेले असताना भिड्यांच्या उपहारगृहात ला कट वडा खुणावत होता .. पण माझ्या बिचाऱ्या इवल्याश्या पोटाने ऑलरेडी ‘विठ्ठल’ मधली मिसळ सामावून घेतली होती आणि एक थोडासा .. जरासा.. मोट्ठा ग्लास मँगो लस्सी सुद्धा ,🙄मग फक्त भिड्यांकडे उगाचच डोकावल्या सारखे करून याचे फक्त दर्शन करून घेतले.. मागच्याच रविवारी कटवडा बनवायचा प्लॅन होता पण अचानक एका लग्नाला जाणे निघाले म्हणून राहून गेले.. मग आठवड्याचे रहाटगाडगे ओढत असताना आमचे एक फेसबुक स्नेही श्री. संतोष दादा म्हस्के , तमाम गॉगल धारी संघटनेचे मुखिया ( दिन हो या रात मैं मेरा गॉगल नहीं उतारुंगा,हे ज्यांचे ब्रीदवाक्य ) यांनी त्यांच्या पाक कुशल भार्येच्या सुंदर हातांनी बनवलेल्या कट वड्याचे अतिसुंदर फोटो टाकून तमाम खवय्यांच्या जिभेला अगदी महापूर आणला ..

मग मला जळी– स्थळी –काष्ठी –पाषाणी वडाच दिसू लागला.. एरवी जिमच्या ट्रेनरला दाताच्या कण्या करायला लावणारी मी, या गेल्या आठवड्यात रोज वर्कआऊट चे ३–३ sets स्वतःहून मारायला लागले..जसे अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसला , धावपटू ला फक्त फिनिशिंग लाईन दिसते तसे मला फक्त फक्त आणि फक्त लाल भडक कटात आनंदाने डूंबणारा वडाचं दिसत होता!
आणि आज अवतरला हो माझ्याकडे तो .. तेलात खरपूस तळलेला, मिश्र कडधान्यांच्या उसळीत लपेटला आणि वरून कटाची धार.. कांद्या– कोथिंबीर – लिंबाने वाढवली याची चव आणि ताज्या कुरकुरीत फरसाणाने झाला तयार शानदार कटवडा , सोबत बेकरीचे ताजे नरम पाव .. 😋😋
तळटीप: एकही फोटो कुठलाही फिल्टर लावलेला नाही. ही कमाल आहे मी घरी स्वतः , वक्खा विक्खी वुक्खू करीत मिक्सरमध्ये बनवलेल्या काश्मिरी आणि बेडगी मिरचीच्या पावडरीची..☺️😉

अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा

- तयारीसाठी वेळ : ६ तास
- शिजवण्यासाठी वेळ : ३० मिनिटे
- कितीजणांना पुरेल : ५-६
- बटाटेवड्यांसाठी लागणारे साहित्य :
- अर्धा किलो बटाटे ५०० ग्रॅम्स , स्वच्छ धुऊन , उकडून
- ६-७ हिरव्या मिरच्या
- १ टीस्पून जिरे
- दीड इंच आल्याचा तुकडा
- १२-१५ लसणीच्या पाकळ्या
- १०-१२ कढीपत्ता
- १ टीस्पून मोहरी
- ३-४ मेथी दाणे
- पाव टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- पाव टीस्पून साखर
- १ टीस्पून लिंबाचा रस
- मीठ चवीनुसार
- अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- तेल
- बेसनाच्या घोळासाठी :
- १ कप = १०० ग्रॅम्स बेसन
- २ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- अर्धा टीस्पून ओवा
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून मीठ
- पाणी गरजेनुसार
- उसळीचे आणि कटाचे साहित्य :
- पाव कप हिरवे मूग
- पाव कप मटकी
- पाव कप काळे चणे
- पाव कप पावटे
- पाव कप पांढरे वाटाणे
- पाव कप हिरवे वाटाणे
- वरील कडधान्ये आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घ्यावीत . एकूण पाव किलो ( २५० ग्रॅम्स ) मिश्र कडधान्ये घ्यावीत . या कडधान्यांना एकत्र किमान ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवावे .
- मसाल्याचे वाटण :
- २ मध्यम आकाराचे कांदे १०० ग्रॅम्स , तुकडे करून
- ८-१० लसणीच्या पाकळ्या
- १ इंच आल्याचा तुकडा
- अर्धा कप कोथिंबीर
- १ कप किसलेले सुके खोबरे ( ८० -१०० ग्राम )
- इतर साहित्य :
- १ लहान कांदा ( ५० ग्राम ) बारीक चिरून
- १ मोठा टोमॅटो ( १२५ ग्राम ) बारीक चिरून
- ५-६ कढीपत्ता
- १ टीस्पून मोहरी
- १ टीस्पून जिरे
- अर्धा टीस्पून हिंग
- १ टीस्पून हळद
- ४-५ टेबलस्पून काश्मिरी किंवा बेडगी लाल मिरची पूड
- दीड ते २ टेबलस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला
- मीठ चवीनुसार
- तेल
- बारीक शेव किंवा मिश्र गाठीचे व पापडीचे फरसाण
- एक पाव लादी किंवा ब्रेड
- कृती :
- सर्वप्रथम आपण भिजवलेल्या कडधान्यांतले पाणी काढून टाकायचे आहे . एका मोठ्या कढईत २-३ टेबलस्पून तेल तापवून घ्यावे . या गरम तेलात चिमूटभर हिंगाची फोडणी करावी आणि आच बारीक करून हळद घालावी म्हणजे हळद करपणार नाही आणि तिचा रंगही तेलात चांगला उतरेल . हळद जरा परतली की त्यात मिश्र कडधान्ये घालून १-२ मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावीत . असे केल्याने कडधान्यांचा जो एक प्रकारचा विशिष्ट वास असतो तो निघून जातो . नंतर अंदाजे १ ते सव्वा लिटर पाणी ( ४-५ कप ) घालून थोडे मीठ सुद्धा घालावे . पाण्याला मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी . नंतर आच मंद करून झाकण घालून ही कडधान्ये पाण्यात शिजू द्यावीत .
- आता आपण मसाल्याचे वाटण करायला घेऊ . एका कढईत किसलेले सुके खोबरे मंद आचेवर खरपूस लालसर रंगावर भाजून घ्यावे . भाजताना रंग एकसारखा बदलेल याची दक्षता घ्यावी नाहीतर खोबरे करपले तर वाटणाची चव जाते . भाजेलेलं खोबरे एका थाळीत काढून घ्यावे . त्याच कढईत २ टेबलस्पून तेल घालून आल्याचे बारीक तुकडे व लसणीच्या पाकळ्या घालाव्यात . लसूण छान गुलाबी व्हायला लागली की त्यात तुकड्यांत चिरलेला कांदा घालून अगदी खरपूस लाल रंगावर तळून घ्यावा. कांदा परतला की त्यात कोथिंबीर घालून तेलात चांगलं परतून घ्यावी म्हणजे वाटणाला कोथिंबिरीचा सुगंध येतो . मग भाजलेले खोबरे घालून फक्त एकदा मिसळून घ्यावे . गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावे . थंड झाल्यावर साधारण पाऊण कप पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यावे . झाले आपले वाटण तयार !
- साधारण ३० मिनिटे कडधान्ये पाण्यात शिजतात . त्यांना एका चाळणीत काढून त्यांचे पाणी बाजूला काढावे , हे पाणी चुकूनही फेकून देऊ नये , कारण यात कडधान्यांचा अर्क उतरलेला असल्याकारणाने कट एकदम चविष्ट बनतो .
- कट बनवण्यासाठी:
- एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून त्यात कढीपत्ता व पाव टीस्पून हिंगाची फोडणी करावी . त्यात आच मंद करून २ टेबलस्पून अगदी भरून लाल मिरची पूड तेलात घालून पटकन २०-३० सेकंद हलवून घ्यावी . करपू देऊ नये . तेलात मिरचीपूड घातल्यानेच कटा ला रंग चांगला येतो .केलेल्या वाटणाचे ३ भाग करावेत . एक तृतीयांश भाग वाटण तेलात घालून चांगले परतून घ्यावे . हा कट जरासा पातळ आणि तर्रीदार असतो . म्हणून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतावा . नंतर त्यात कडधान्यांचे उरलेले पाणी व अर्धा कप शिजलेले कडधान्ये घालावीत .अजून पातळ करण्याची गरज वाटल्यास १ कप गरम पाणी घालावे , म्हणजे कटाची चव बदलत नाही . रस्श्याला उकळी आली की त्यात अर्धा टेबलस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला घालावा ,व चवीपुरते मीठ घालून मंद आचेवर हा कट थोडा वेळ शिजू द्यावा . कटाचे पाणी आटू देऊ नये . जशी तर्री वर कटावर चढू लागली की थोडी चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा आणि झाकण घालून ठेवावे .
- उसळ बनवण्यासाठी :
- एका दुसऱ्या कढईत २ -३ टेबलस्पून तेल गरम करावे . त्यात मोहरी, जिरे , हिंग यांची फोडणी करावी . मग बारीक चिरलेला कांदा घालून तो जरासा मऊ होईपर्यंत परतून घ्यावा . कांदा नरम झाला की त्यात अडीच टेबलस्पून लाल मिरची पूड घालावी व उरलेले वाटण घालावे . छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे . आता यात शिजवलेले कडधान्ये आणि टोमॅटो घालावा . मसाल्यात एकत्र करून घ्यावे. ही उसळ जराशी घट्टच ठेवावी म्हणून त्यात २ ते अडीच कप पाणी गरम करून घालावे . दीड टेबलस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला व चवीपुरते मीठ घालून बारीक आचेवर झाकण घालून ही उसळ शिजू द्यावी . कढधान्य शिजले असल्याकारणाने जास्त वेळ लागत नाही उसळ शिजायला , साधारण १० मिनिटांत होते . गॅस बंद करून झाकण घालून ठेवावे .
- बटाटेवड्यांची कृती :
- सर्वप्रथम आपण एक पण गरम करून त्यात बेसन भाजून घेऊ . बेसनाचा रंग बदलू देऊ नये , म्हणून ते मंद आचेवर फक्त १ ते २ मिनिटे भाजून घ्यावे . खमंग सुवास दरवळला की गॅसवरून उतरवून एका ताटलीत काढावे .
- टीप : बेसन भाजल्याने त्याची चव खुलते आणि पदार्थ खुसखुशीत होतो.
- बेसन थंड झाले की एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात तांदळाचं पीठ , ओवा, हळद, १ टीस्पून मीठ घालून एकत्र करून घ्यावे. त्यात १ टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून मिसळावे .
- टीप: गरम तेलाचे मोहन घातल्याने वड्याचे आवरण कुरकुरीत बनते .
- एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा घोळ बनवून घ्यावा . जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावा. चमच्यावर पातळ थर बसेल इतक आवरण सरसरीत असावे, त्यासाठी मी १ कप पाणी वापरले आहे . हे बेसनाचे मिश्रण चांगले ७-८ मिनिटे फेटून घ्यावे. मग ते किमान १५ मिनिटांसाठी झाकून ठेवावे .
- बटाटे सोलून त्यांना किसणीने किसून घ्यावेत . असे केल्याने बटाटे एकसारखे किसले जातात व त्यातील जर टणक भाग राहिला असेल तर तो बाजूला काढून टाकता येतो. यामुळे बटाटेवड्यांना एक स्मूथ टेक्सचर येते .
- मिक्सरमधून हिरव्या मिरच्या, लसूण ,आले आणि जिरे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
- बटाटेवड्यांचे सारण बनवण्यासाठी एका कढईत दीड टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, मेथी , कढीपत्ता , हिंग यांची फोडणी देऊन १-२ मिनिटे परतून घ्यावे. त्यात हिरवा मसाला घालून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावा.
- आता हळद व थोडी चिरलेली कोथिंबीर घालून १-२ मिनिटे तेलात परतावी.
- किसलेले बटाटे , साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट एकत्र करून घ्यावे . हे मिश्रण २-३ मिनिटे परतावे. आता लिंबाचा रस , उरलेली कोथिंबीर घालून ढवळून गॅस बंद करावा. हे सारण थंड होऊ द्यावे.
- बटाट्याच्या सारणाचे आपल्याला हव्या त्या आकाराचे गोळे बनवून गोल वडे बनवून घ्यावेत.
- वडे तळण्यासाठी कढईत तेल मध्यम आचेवर चांगले तापवून घ्यावे. तेल तापले की बटाटेवडे बेसनाच्या घोळात नीट बुडवून कढईच्या कडेने अलगद तेलात सोडावेत . मंद ते मध्यम आचेवर २-३ मिनिटे दोन्ही बाजूंनी खरपूस तळावेत.
- कट वडा वाढण्यासाठी :
- एक खोलगट ताटलीत सर्वप्रथम उसळ वाढावी . मध्यमभागीं एक वडा ठेवावा त्यावर परत उसळीचा थर लावावा आणि वरून तर्रीदार कट घालावा . वडा पूर्ण डुंबला पाहिजे उसळीत . वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शेव किंवा फरसाण घालून पावासोबत खायला द्यावा !
Leave a Reply