आठवड्याच्या मधला कुठलातरी वार , नक्की आठवत नाही ! परंतु ती गोड संध्याकाळ मी नाही विसरू शकत! अर्ली मॉर्निंग शिफ्ट करून आल्यावर सहजच तासभर डुलकी काढली आणि स्वतःसाठी चहाचे आधण ठेवले.
अजून तितकासा पाऊस सुरु नाही झालेला, परंतु आकाश मात्र संध्याकाळी ५ वाजताच ढगांच्या काळ्या रजईखाली दडलेले! इतका छान वारा सुटलेला ,रेडिओ चालू करून , चहाचे घुटके घेत जरा बाल्कनीतच फतकल मारून बसले. असा निवांत वेळ मिळणे आयटीच्या २४*७ सपोर्ट जॉबमध्ये अंमळ कठीणच ! मनातल्या मनात रात्रीच्या जेवणाचे आणि उद्याच्या तयारीचे वेळापत्रक आखणी चाललेच होते. बॅकग्राऊंड मध्ये रेडिओ वर रेखा भारद्वाजच्या आवाजातले ” ससुराल गेंदा फूल ….” वाजत होते. माझी अत्यंत आवडती गायिका आणि इतके सुरेख भावपूर्ण गाणे ! ऐकताच माझी कळी खुलली! हे गाणे ना मला खूप आपले आपलेसे वाटते , तसे ते प्रत्येक सासुरवाशिणीसाठी अगदी तंतोतंत लागू पडते. कोकणात जन्मलेली ही मुंबईची मुलगी , मूळच्या उत्तर प्रदेशातील रजपूत कुटुंबात सून म्हणून प्रवेशली! नाही म्हटले तरी राहण्यासाह्ण्याच्या सवयींपासून ते चालीरीतींपर्यंत स्वतःला ऍडजस्ट करत घर आणि नोकरी सांभाळणे ही माझ्यासाठी तारेवरची कसरतच होती. मागे वळून बघताना या लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षांची गोळाबेरीज करताना , मला खरंच असे जाणवतेय , की जे घडते ना ते चांगल्यासाठीच घडते, फक्त माणसाचं मन ते स्वीकारू शकत नाही त्या त्या वेळेला! नोकरीमुळे घरापासून दूर , रूममेट्स बरोबर राहताना , एक शिस्त आणि चांगल्या सवयी लागल्या. आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा नाही , स्वतःची कामे स्वतः करावीत, हे आईचे बोल कामी आले. ह्याच बाण्यामुळे माझा कामाचा उरक वाढला , जो मला लग्नानन्तर फारच उपयोगी पडला.
लग्नानंतर काही दिवसांतच माझ्या हे लक्षात आले की माझ्या आणि सासरच्या मंडळींच्या खाण्यापिण्याच्या सवयी कितीतरी वेगळ्या आहेत. दोन भिन्न प्रकारच्या खाद्यसंस्कृती, एक कोकणी आणि दुसरी पार टोकाची उत्तर प्रदेशातली ! एकीकडे मासे म्हणजेच सुख असे मानणारी मी , आणि दुसरीकडे मुर्गा आणि शिकार ( म्हणजे मटण ) यांच्याशिवाय तारखेचे पान न उलटणारे माझे सासर! “मोहरीचे ( सरसों का तेल ) तेल म्हणजे फक्त आजीच्या करकर वाजणाऱ्या गुडघ्यांना हिवाळ्यात मालिश करण्यासाठी वापरतात ते तेल होय ” , अशी व्याख्या माहित असलेली मी , जेव्हा सासूबाईना प्रत्येक भाजीत आणि चिकन,मटणाच्या रश्श्यात मोहरीचे तेल घसाघसा ओतताना पाहून डोळे विस्फारले.
तसे माझ्या सासूबाई आणि नवरोबा हे खाद्यप्रेमी! आणि महाराष्ट्रीयन सून मिळाली म्हणून सासूबाई पण खुश होत्या कारण अख्खी जिंदगी त्यांची डोंबिवलीत आगरी बांधवांच्या सान्निध्यात गेलीय. खूप सारे महाराष्ट्रयीन शेजारी आणि मैत्रिणी यांमुळे त्या खाण्याच्या बाबतीत अगदी मनमोकळ्या आहेत . परंतु माझे सासरे मुंबई पुण्याच्या घाई गर्दीत , दूर आपल्या गावची शुद्ध ताजी हवा आणि तिथल्या संस्कृतीची पाळंमुळं आजही धुंडाळताना मला आढळतात . गावच्या आठवणी मला सांगताना त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक येते , आणि एरवी स्वभावाने शांत असलेले माझे सासरे अचानक लहान बागडणाऱ्या मुलाप्रमाणे खेळकर होऊन खूप गप्पा मारतात . सासर्यांचे जिभेचे चोचले फार नाहीत , त्यांना फक्त दोन वेळेस साध्या जेवणाची आवड! बरं काही नवीन वेगळे बनवले तर निमूटपणे पानात जे पडेल ते खातात , आणि पहिले काही दिवस हे पाहून मी खूप गोंधळात पडले होते. नक्की यांना आवडले कि नाही , मग माझ्या सासूबाईनी मला एकदा समजावले की तू छानच बनवतेस सगळे , परंतु कधी त्यांच्याकडून अभिप्राय किंवा कौतुक आले नाही तर वाईट वाटून घेऊ नकोस! त्यानंतर मीही हळूहळू सवय लावून घेतली.
संध्याकाळच्या चहासोबत माझे सासरे कुरमुऱ्यांचा चिवडा किंवा सासुबाई त्यांच्या बनारसकडली प्रसिद्ध “चुडा मटर ” असे काहीसे हलके खाणे खातात . पण मला ही पावसाळी हवा गप्प बसू देईना , का कोण जाणे नकळत मी वडे तळण्याचा घाट घातला . आणि ते ही साबुदाणा वड्यांचा ! म्हटले कोणी खाल्ले तर ठीक आहे , नाहीतर फ्रिजमध्ये सारण डब्यात ठेवून देता येईल! पण आताची ही वेळ जाता कामा नये, आपल्या जिभेच्या रसवंतीला नको मुरड घालायला !
माझे वडे तळून होईपर्यंत सासरे संध्याकाळचा फेरफटका करून आले , नेहमीप्रमाणे त्यांना चहा दिला आणि त्यांना हवं की नको न विचारताच वाफाळलेले वडे , नारळाच्या दह्यातल्या गोड चटणीसोबत बशीत आणून ठेवले. पहिल्यांदा त्यांनी थोडेसे “नको आता नको , जेवणासोबत खाईन “, वगैरे म्हटले , पण मी ही त्यांना थोडी गळ घातली. ते वडे खाल्ल्यानंतर माझ्या सासर्यांनी दिलेली प्रतिक्रिया आजतागायत किंबहुना आयुष्यभर मी कधीच विसरणार नाही ! त्यांनी स्वतःहून मला म्हटले ” बेटा , वडे बहुत अच्छे बनायें थे !” हे त्यांचे बोल ऐकून मी किती खुश झाले म्हणून सांगू …. शाळेत नाही का अचानक ध्यानीमनी नसताना , धावण्याच्या शर्यतीत आपण पहिले येतो तेव्हा जसा आनंद होतो ना अगदी तस्साच ! माझा तो दिवस आणि ती संध्याकाळ आठवणींतल्या गावात जाऊन वसलीये , हे तुम्हाला सांगायला नकोच !
नकळतच तोंडातून ” ससुराल गेंदा फूल” चे शब्द गुणगुणले गेले ,
“छोड़ा बाबुल का अंगना
भावे डेरा पिया का, हो …!”
अन्य मराठी पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी इथे click करा
Rating

- साहित्य:
- १ कप = २०० ग्रॅम्स साबुदाणे
- ६ मध्यम आकाराचे बटाटे = ४५० ग्रॅम्स , उकडून, साली काढून
- १/२ कप = १०० ग्रॅम्स शेंगदाण्याचा भाजून, साली काढून जाडसर कूट
- ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
- १ टीस्पून जिरे
- २ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
- मीठ
- तळण्यासाठी तेल
- ३/४ कप = २०० ग्राम दही
- १/२ कप = ५० ग्राम खवलेला ओला नारळ
- २ टीस्पून साखर
- मीठ
- १ हिरवी मिरची
- साबुदाणे ३-४ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन मगच भिजत घालून ८ ते १० तासांसाठी किंवा कमीत कमी ३-४ तासांसाठी ठेवावेत . साबुदाणे भिजवताना फक्त ते बुडतील इतकेच पाणी घालावे जेणेकरून ते पाणी पूर्ण शोषून घेतील. जास्त पाणी घातले तर ते चिकट आणि बुळबुळीत होतात .
- एका मोठ्या भांड्यात भिजवलेले साबुदाणे आणि उकडलेले बटाटे नीट लगदा करून एकत्र करून घ्यावे. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरच्या, जिरे , मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालून एकत्र गोळा करून घ्यावा.
- वड्यांचे मिश्रण तयार आहे . आपल्याला आवडतील त्या आकाराचे लहान मोठे गोळे करून त्यांना हलक्या हाताने दाबून चपटे वडे बनवून घ्यावेत.
- वडे तळण्यासाठी कढईत तेल तापवून घ्यावे. तेलात वडे पूर्ण बुडतील एवढेच तेल घालावे. तेल चांगले तापले की मंद ते मध्यम आचेवर वडे चांगले सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यावेत.
- आप्पे पात्रात कमी तेल घालूनसुद्धा वडे चांगले बनतात . आप्पे पात्र तापवून घेतले की आच मध्यम करून त्यात वड्यांचे मिश्रण चमच्याने घालून घ्यावे . त्याआधी पात्राला तेलाचा हात जरूर लावावा . चमच्याने फिरवून घेत वडे खरपूस टाळून घ्यावेत.
- चटणी बनवण्यासाठी ओले खोबरे आणि मिरची मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी. एका भांड्यात दही , साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून नीट फेटून घ्यावे. दह्यात गुठळ्या राहू देऊ नये. त्यात वाटलेला मसाला घालून नीट ढवळून घ्यावी . ही चटणी थोडी पातळ असते कारण त्यात वडे बुडवून खायला फार चविष्ट लागतात ! म्हणून मी अर्धा कप पाणी हळूहळू घालून चटणी थोडी पातळ करून घेतली आहे.
- गरमागरम साबुदाणा वडे नारळाच्या दह्यातल्या चटणीसोबत वाढावी !

विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा
Dear Smita, your in-laws and you are lucky to have each other.
I read this article and had goosebumps all over my body.
Don’t forget your niceness credit also goes to your parents. God bless you all.
Hi JayashriTai , how are you ? Long time .. thank you so much for your lovely comment ! And let me tell you that I am very fortunate to have people like you who appreciate and love my work . Your blessings are with me always , thank a lot Tai 🙂